অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलांचे नंदनवन केले

उच्च शिक्षित स्वाती शिंगाडे यांची शेतीत आश्‍वासक वाटचाल

जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम व शिक्षण या गोष्टींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोणत्याही क्षेत्रात यश सहज शक्‍य असते. हे सिद्ध केले आहे बारामती तालुक्‍यातील (जि. पुणे) सोनकसवाडी येथील स्वाती अरविंद शिंगाडे यांनी. माळरान जमिनीवर दोन दशकांपूर्वी जिथे कुसळदेखील उगवत नव्हते तेथे पॉलिहाऊसमध्ये त्यांनी फुलशेती फुलवली आहे. एक उद्योग म्हणूनच शेती करायची व एखाद्या कंपनीप्रमाणे त्याचे व्यवस्थापन ठेवायचे हा हेतू ठेवूनच त्यांनी आपली वाटचाल यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली आहे. 
बारामती तालुक्‍यातील सोनकसवाडी येथील सौ. स्वाती शिंगाडे 2007 मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाल्या. नाशिक येथे त्यांनी सहा महिने नोकरीही केली. मात्र एम.एस्सी (ऍग्री) झालेल्या स्वातीताईंचे मन शेतीकडेच ओढ घेत होते. त्यांचे पती अरविंद शिंगाडे व दीर मिलिंद इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर असून ते पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे घरची शेती पाहण्यासाठी कोणीच नव्हते. अशावेळी स्वातीताईंनी आपल्या पतीसोबत चर्चा करून पूर्णवेळ शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामाही दिला. 
त्यांची एकूण शेती 25 एकर, त्यातील 14 एकर क्षेत्रावर ऊस, मका, ज्वारी, गहू आदी पिके आहेत. अडीच एकर क्षेत्रावर पॉलिहाऊस आहे. उर्वरित क्षेत्र पडीक आहे. स्वातीताईंनी पारंपरिक पिकांच्या शेतीपेक्षा पॉलिहाऊसमधील म्हणजे हाय टेक शेतीला प्राधान्य दिले. सुरवातीला 10 गुंठ्यांवर पॉलिहाऊस उभारून कार्नेशन फुलशेती 2009 मध्ये सुरू केली. त्यातून आत्मविश्‍वास येत गेला. फुलशेतीत जम बसत गेला. त्यानंतर आता कार्नेशनची प्रत्येकी 10 गुंठ्यांची नऊ पॉलिहाऊस युनिट आहेत. मागील वर्षी एक पॉलिहाऊस गुलाबाचे सुरू केले आहे. त्याचा विस्तार यंदा करणार आहे. तसेच यंदा जरबेरा व पुष्पगुच्छात (बुके) वापरल्या जाणाऱ्या फिलरचे उत्पादनही सुरू केले जाणार आहे. पॉलिहाऊस उद्योगातून स्वातीताईंनी सुमारे तेरा महिला व सहा पुरुष अशा एकूण 19 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 
सन 2009 मध्ये उभारलेल्या पॉलिहाऊस युनिटसाठी सुमारे सतरा लाख रुपये खर्च आला. यापैकी बारा लाख रुपये बॅंकेचे कर्ज काढले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळाले.

पाणी व्यवस्थापन

नीरा कॅनॉल लगत पणदरे हद्दीत एक एकर जमीन घेऊन विहीर खोदली आहे. पॉलिहाऊस असलेल्या शेतालगत एक विहीर, एक बोअरवेल व पाणी साठवणुकीसाठी दोन टाक्‍या बांधल्या आहेत. कॅनॉल लगतच्या विहिरीचे पाणी पंपाद्वारे उचलून दुसऱ्या विहिरीत टाकले जाते. आवश्‍यकतेनुसार टाक्‍यांत पाणी साठवून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फुलशेतीला दिले जाते. 
शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शिंगाडे कुटुंबीयांना 18 एकर जमीन विकत घेणे शक्‍य झाले आहे. सध्या पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. 
कृषी पर्यवेक्षक पी. एस. पडारे यांचे सहकार्य स्वातीताईंना लाभले आहे. त्यांनी पॉलिहाऊस प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. तीन- चार दिवसांच्या प्रशिक्षणात फुलशेती व्यवस्थापन, बॅंकेकडून कर्ज उपलब्धता, कृषी विभागाची अनुदाने आदी गोष्टी शिकविल्या जातात. प्रशिक्षणार्थींसाठी निवासाची सोय आहे.

फुलांचे अर्थशास्त्र

कार्नेशन- (प्रति 10 गुंठ्यांसाठी)
  • लागवडीनंतर सुमारे अडीच ते तीन महिने उत्पादन सुरू राहते.
  • 10 गुंठ्यांत सुमारे 20 हजार झाडे असतात.
  • एक दिवसा आड या पद्धतीने फुलांची काढणी
  • प्रति झाड 10 ते 12 फुले मिळतात.
  • वर्षाला एकूण सुमारे दोन लाख फुलांचे उत्पादन अशा रीतीने मिळतात.
  • हंगामात सर्वाधिक दर म्हणजे प्रति फुलास 13 रुपये मिळतो. बिगर हंगामात हाच दर दोन ते सव्वा दोन रुपयांपर्यंत असतो.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारीत दर चांगले मिळतात. एप्रिलमध्ये ते घसरतात. मेमध्ये चांगले मिळतात.
  • वर्षाला सरासरी दर साडेतीन रुपये मिळतो.
  • वार्षिक एकूण उत्पन्न साडेसहा लाख ते सात लाख रुपये मिळते.
  • खर्च वजा जाता 10 गुंठ्यांतून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये नफा मिळतो.
  • तिसऱ्या वर्षी उत्पादन तुलनेने कमी मिळते. त्यामुळे तेथे हे अर्थशास्त्र लागू होत नाही
गुलाब- 10 गुंठे पॉलिहाऊस
  • मार्केटमधील मागणीनुसार जातींची निवड
  • लागवडीनंतर सुमारे सात वर्षे उत्पादन सुरू राहते.
  • एक दिवसाआड या पद्धतीने फुलांची काढणी
  • गुलाबाचे अर्थशास्त्र कार्नेशनच्या तुलनेत फार वेगळे नसते.
  • सुरवातीच्या काळात वर्षाला सुमारे एक लाख फुले मिळतात.
  • दर वर्षी उत्पादन मात्र त्याहून वाढत जाते.
  • गुलाबाला तशी वर्षभर मागणी राहते.
  • प्रति बंच (प्रति 20 फुलांचा) 80 ते 100 रुपये दर मिळतो.
  • वार्षिक एकूण उत्पन्न पाच ते साडेपाच लाख मिळते.
  • खर्च वजा जाता 10 गुंठ्यांतून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये नफा मिळतो.

फुलांचे मार्केट

फुले पॅकिंग करून पुणे, मुंबई येथील मार्केटला पाठविली जातात. येथील व्यापाऱ्यांशी कायम संपर्क असतो. त्यावरून फुलांना कोठे, किती दर आहे याची माहिती होते. व्यापारी निश्‍चित केले असल्याने त्यांच्याकडून चांगले दर मिळण्याची खात्री व विश्‍वासार्हता असते. स्वातीताईंना फुले निर्यात करण्याचीही इच्छा आहे. मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनाअभावी ते शक्‍य नसल्याचे त्यांनी सांगितले. 

'ऍग्रोवन'मधील यशकथांनी दिला फायदा

स्वातीताई ऍग्रोवनच्या नियमित वाचक आहेत. त्यातील शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्या यशकथा त्या आवर्जून वाचतात. त्यातूनच नवे तंत्रज्ञान आपल्याला माहीत होते. त्या आधारे आपल्या शेतात कोणकोणते प्रयोग करता येतील ते अभ्यासून नियोजन करता येते. "ऍग्रोवन'मधील यशकथा आपल्यासाठी प्रेरणादायक ठरल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 
संपर्क - स्वाती शिंगाडे, 9763143333 
छायाचित्र : सोनकसवाडी (ता. बारामती) : येथील उच्च शिक्षित महिला शेतकरी स्वाती शिंगाडे यांचे पॉलिहाऊस व फुले. 

शेती व्यवस्थापनातील काही मुद्दे

  • ठिबक सिंचन युनिट, पॅकिंग हाऊस यांची सुविधा
  • पॉलिहाऊसमध्ये पूर्वी संपूर्ण फॉगर सिस्टिम व्यक्तीमार्फत चालवली जायची. आता स्वयंचलित यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे मजूरबळ कमी झाले आहे.
  • ठिबक सिंचनासाठीही स्वयंचलित पद्धत एक एकरासाठी वापरली जात आहे. त्यामुळे विद्राव्य खते देणे सोपे झाले आहे.
  • शेतीतील व्यवस्थापन सांभाळण्यासाठी कृषी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती.
  • कृषी विद्यापीठाच्या रावे उपक्रमांतर्गत औद्योगिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतात.

स्वातीताईंकडून शिकण्यासारखे...

  • पिकाचे काटेकोर व्यवस्थापन करण्यावर भर
  • शेतीत दररोज लक्ष
  • मार्केटचा अभ्यास चांगला हवा
  • शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन
  • शेतीतील वार्षिक जमा-खर्च वा ताळेबंद चोख ठेवला जातो.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate