অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्रा बागेतून वळले शाश्‍वत उत्पादनाकडे


नवीन पीक लागण्याचे थोडेसे धाडस, कष्ट आणि नियोजनातून देहरे (ता. जि. नगर) येथील शेतकरी रघुनाथ करंडे यांनी संत्रा बाग यशस्वी केली आहे. त्यांच्या यशातून प्रेरणा घेत त्या परिसरामध्ये सुमारे 250 एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लागवड दिमाखात उभी आहे.

नगर-मनमाड रस्त्यावर नगर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर देहरे गाव. आठ वर्षांपूर्वीपर्यंत या गावामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके घेतली जात. या देहरे गावामध्ये रघुनाथ गंगाधर करंडे यांचे 60 एकर क्षेत्र आहे. तेही पारंपरिक पिके घेत असत. मात्र दर वर्षी पिके करायची मोडायची, या ऐवजी शाश्‍वत आणि कमी पाण्यावर येणारी बहुवर्षायू पिकाकडे वळले पाहिजे, असे वाटू लागले. बाजारामध्ये त्यांनी चौकशी सुरू केली. त्यामध्ये संत्रा पिकाविषयी माहिती मिळाली. थोडेसे धाडस करीत रघुनाथ करंडे यांनी 2006 मध्ये साडेचार एकर क्षेत्रावर 14 फूट बाय 14 फूट अंतरावर संत्र्यांची लागवड केली.

शेतीची धुरा नव्या पिढीच्या हाती...

रघुनाथ करंडे यांचे वय 70 वर्षे आहे. तरीही शेतीतील प्रत्येक बाबींमध्ये त्यांचे लक्ष असते. त्यांना बाळासाहेब, राजेंद्र आणि हरिदास अशी तीन मुले आहेत. त्यापैकी बाळासाहेब हे डॉक्‍टर, तर राजेंद्र हे एमसीएम झाले आहेत. नोकरी करताना शेतीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावनेतून राजेंद्र यांनी 2003 मध्ये नोकरी सोडली. ते आता पूर्ण वेळ शेती करीत आहेत. हरिदास हे सात जर्सी गायींचे संगोपन करतात. थोडक्‍यात, शेतीची धुरा हळूहळू पुढील पिढीकडे गेली असली तरी रघुनाथ यांच्या अनुभवांचा फायदा होत असल्याचे राजेंद्र यांनी सांगितले.

काटेकोर व्यवस्थापन...

चार एकर क्षेत्रामध्ये 14 फूट बाय 14 फूट या अंतरावर नागपुरी संत्र्यांची लागवड केली. एकरी 375 एवढी रोपे बसली.

  • चांगला दर मिळत असल्याने मृग बहराला त्यांच्या प्राधान्य असते. या काळातील बहराची फळे फेब्रुवारी- मार्चमध्ये विक्रीसाठी येतात. त्याचे नियोजन करण्यासाठी 20 एप्रिलनंतर बागेला ताण दिला जातो. 15 मेपासून मशागत व बेड बांधणी करून, खते देऊन पाणी सोडले जाते.
  • एकरी चार ट्रॅक्‍टर शेणखत लागते. साधारणतः प्रति झाड चार घमेले शेणखत, 10ः26ः26, युरिया, पोटॅश अशी खते एकूण दोन किलो, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक यासारखी खते दोन किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये असे मिश्रण दिले जाते. झाडाची वाढ झालेली असल्याने झाडाच्या खोडापासून दोन फूट अंतरावर खते दिली जातात.
  • गरजेनुसार मावा, तुडतुड्यासाठी फवारणी केली जाते. त्यातही कळ्या व फळ निर्मितीच्या अवस्थेमध्ये, फळे लिंबाच्या आकाराची असताना योग्य त्या कीडनाशकांची व अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते. फळांचा आकार वाढण्यासाठी त्याचा उपयोग होऊन फळांचा दर्जा सुधारतो.
  • लागवडीनंतर पहिली चार वर्षे करंडे यांनी संत्रा बागेसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. आता झाडे मोठी झाली असून, फळ धरण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची अधिक गरज लागते. त्याची पूर्तता करण्यासाठी अनेक वेळा बेड पद्धतीने पाणी दिले जाते. अर्थात, पाण्याची उपलब्धता लक्षात घेतली जाते.

उत्पादनात केली वाढ

रघुनाथ करंडे यांना चार एकर क्षेत्रातून 2010 पासून उत्पादनाला सुरवात झाली. 2011 मध्ये वीस टन, 2012 मध्ये साठ टन, 2013 मध्ये 65 टन तर 2014 मध्ये 75 टन संत्र्याचे उत्पादन निघाले आहे.

  • पहिल्या वर्षी त्यांनी संत्र्याची नगर, शिर्डी, राहुरी येथेच विक्री केली. आता उत्पादनात वाढ झाल्याने ते पुणे, मुंबईत विक्री करतात.
  • एका कॅरेटमध्ये अ दर्जाची फळे सुमारे 90 ते 100 फळे बसतात. त्याला

यंदा त्यांना पंचवीस रुपये प्रति किलो असा सरासरी दर मिळाला आहे.

चार एकर संत्र्याचा ताळेबंद

  • शेणखत - 80 हजार
  • रासायनिक खत - 25 हजार
  • इतर खते - 20 हजार
  • फवारणी व औषधे - 30 हजार
  • मशागत - 40 हजार
  • माल वाहतूक इतर खर्च - 25 हजार
  • एकूण खर्च - 2 लाख 20 हजार

चार एकर मधील उत्पादन - 75 टन.
मिळालेला सरासरी दर - 25 रुपये प्रति किलो.
एकूण उत्पन्न - 18 लाख 75 हजार रुपये.

आंतरपिकाला प्राधान्य

संत्रा बागेमध्ये पहिल्या तीन वर्षांत आंतरपीक म्हणून सोयाबीन व कांद्याचे उत्पादन घेतले आहे.

  • यंदा लागवड केलेल्या डाळिंबात आंतरपीक म्हणून कांदा लावला आहे.
  • उसाची चार फुटी पट्टा पद्धतीने लागवड केली असून, कांदा बेड पद्धतीने लावला आहे.

पन्नास लाख लिटरचे शेततळे

रघुनाथ करंडे यांच्याकडे सहा विहिरी व एक बोअरवेल असून, फळबागेसह सर्व शेती सिंचनाखाली आणली आहे.

  • अनेक वेळा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडते. हे टाळण्याकरिता त्यांनी शेतामध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे.
  • या शेततळ्याचे पाणी उन्हाळ्यात फळबागेसाठी वापरले जाते. या शेततळ्यामुळेच गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळामध्ये बागा जगवणे शक्‍य झाल्याचे राजेंद्र यांनी सांगितले.

फळबागेकडे वळू लागले शेतकरी....

रघुनाथ करंडे हे देहरे गावातील पहिले संत्रा उत्पादक. त्यांनी नियोजन व व्यवस्थापनातून संत्र्यांची शेती यशस्वी केल्याने देहरे व परिसरातील शेतकरीही संत्रा पिकाकडे वळले आहेत. गावपरिसरामध्ये सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर संत्रा बागेची लागवड झाली आहे. त्याच प्रमाणे अनेक शेतकरी डाळिंबाकडेही वळत आहेत.

  • त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्याला रघुनाथ करंडे यांनी कधी विन्मुख पाठवले नाही. रघुनाथ करंडे यांच्या या योगदानाबद्दल देहरे गावकऱ्यांनी त्यांचा गावामध्ये सत्कार केला आहे.
  • 2014 मध्ये या वर्षी जिल्हा परिषदेनेही त्यांचा प्रगतिशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

दृष्टिक्षेपात करंडे यांची शेती

  • संत्रा -चार एकर, या वर्षी 2 एकर 10 गुंठे क्षेत्रावर नवी संत्रा लागवड केली आहे.
  • डाळिंब - दोन एकर, वाण भगवा. या वर्षी दोन एकरची आखणी केली आहे.
  • ऊस - 20 एकर.
  • कांदा - 15 एकर.
  • गहू - 10 एकर.

संपर्क - राजेंद्र करंडे, 9860410756

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत- अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate