অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलली शेती आणि जीवनही

सिंचन प्रकल्पाची वानवा असलेल्या विदर्भात संरक्षित सिंचनाचा छोटासा स्रोतही उत्पादकता वाढीचा मोठा पर्याय ठरत आर्थिक स्थैर्याचे निमित्त ठरू शकतो, याचा अनुभव वाशीम जिल्ह्यातील मुंगळा येथील शेतकरी "याचि देही याचि डोळां' घेत आहेत. गावालगत वाहणाऱ्या नाल्यावर कधीकाळी पंतप्रधान पॅकेजमधून बांधबंदिस्ती करण्यात आली. आज त्यात संकलित झालेल्या पाण्याने अनेकांची शेती व जीवनही फुलविले आहे. मालेगाव तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर मुंगळा हे सुमारे आठ हजार लोकवस्तीचे गाव. आज गावाचा कायापालट कृषी विभागाच्या पुढाकारातून पंतप्रधान पॅकेजमधून घेण्यात आलेल्या सिमेंट नाला बांध व तत्सम कामांमुळे झाला आहे. गावापासून वाहणाऱ्या शेळकी व अन्य गावतलावांवर हे सिमेंट बांध घेण्यात आले. त्यात साठलेल्या पाण्यामुळे गावकुसातील पाण्याची पातळी वाढली. शेतीसाठीही या पाण्याचा उपयोग होत उत्पादकता वाढीचा अनुभव येथील शेतकरी घेत आहेत. शेळकी नाला हा पावणेचार किलोमीटर क्षेत्रातून वाहतो. त्यावर साखळी पद्धतीने तब्बल 17 बांध बांधत पाणी अडविण्यात आले. गावतलावावरदेखील साखळी बंधाऱ्यांचा पॅटर्न असून, त्याअंतर्गत सुमारे पाच बांध घेण्यात आले. गावतलाव, तसेच शेळकी नाल्यावरील हे साखळी बांध घेण्याकामी सुमारे 60.38 लाख रुपयांचा खर्च त्या वेळी झाला. एकूण 22 बांधांच्या माध्यमातून दर वर्षी सुमारे 109.79 टीएमसी पाणी साठविले जाते. त्याचा विनियोग नाल्याकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी करीत आपल्या पीक उत्पादकता वाढीचे प्रयत्न चालविले आहेत. नाल्याच्या काठावर असलेल्या सुमारे 40 शेतकऱ्यांमार्फत डिझेल इंजिनच्या माध्यमातून या पाण्याचा उपसा केला जात आहे. संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी तूर व हरभरा या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढविण्यास सुरवात केली आहे.

थोडेसे प्रयत्न आणि मोठे क्षेत्र सिंचनाखाली

विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांची दखल घेत पंतप्रधानांनी या भागातील शेती क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी लक्षावधी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्याअंतर्गत जल 2006-2009 या कालावधीत कृषी विभागाच्या पुढाकारातून मुंगळा येथे सिमेंट नाला बांध घेण्यात आले. विदर्भातील अनेक ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसल्याच्या परिणामी, तर कोठे भ्रष्टाचाराचे पाणी मुरल्याने या सिमेंट बांधांचे अस्तित्व अल्प काळापुरतेच होते. मुंगळा येथील बांधाच्या कामाचा दर्जा योग्य राहिल्याने आजही त्यात पाणी साठत त्याचा उपयोग शेतकऱ्यांद्वारा केला जातो. उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी अधिकारी लक्ष्मण सावंत यांनी या पाण्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. एकट्या सिमेंट नाला बांधातील पाणीउपशामुळे आजमितीस सरासरी 122.37 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

शेततळ्यातूनही संपन्नतेकडे

गावातील लता रामदास वायकर, इंदिराबाई तहकीक, गोपाल लाटे, श्रीहरी दत्तात्रेय नाईक यांनी शेततळे खोदून संरक्षित सिंचन बळकटीकरणाचे प्रयत्न केले. शेततळ्याकरिता शंभर टक्‍के अनुदानाची तरतूद शासनाने केली आहे. गावकुसात 49 विहिरी असून, त्यातील बहुतांश या नाल्याच्या काठावरच असल्याने या विहिरींतील पाण्याच्या पातळीतही वाढ नोंदविण्यात आली. गावातील 16 शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 50 टक्‍के अनुदानावर पाणीउपशाकामी डिझेल-केरोसीन पंप वितरित करण्यात आले.

मुंगळ्याचा "क्रॉप पॅटर्न'

पावसाच्या पाण्यावर आधारित पीक पद्धती असल्याने मुंगळा भागात सोयाबीन व तुरीचे पीक घेतले जाते. मात्र रबी हंगामात ज्यांचे गहू घेण्याचे नियोजन असते ते सोयाबीनमध्ये तूरीचे आंतरपीक घेत नाहीत. गावाचे भौगोलिक क्षेत्र 2972.02 हेक्‍टर असून, त्यातील वहितीखाली 2270 हेक्‍टर आहे. सरासरी 200 हेक्‍टरवर संत्र्यांचीदेखील लागवड या भागात होते. गावालगत लघू प्रकल्पाचे, तसेच विहिरीसारख्या संरक्षित सिंचनाचे पर्याय पिकांना पाणी देण्यासाठी उपयोगी आणले जातात. शासकीय योजना प्रामाणिकपणे राबविल्यास त्याचे दूरगामी चांगले परिणाम अनुभवता येतात. याचाच आदर्श मुंगळा येथील उदाहरणावरून दिसून येतो.

प्रतिक्रिया..


""माझी शेळकी नाल्याच्या काठावर अडीच एकर शेती आहे. या नाल्यावर सिमेंट बांध घेण्यात आल्याने पाणी साठते. नाल्याच्या पाण्यामुळे शेततळ्याला आधार होईल, या भावनेने वीस बाय वीस मीटर आकाराचे शेततळे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून घेतले. नाल्यामध्ये जलसंचय झाल्याने माझ्या शेततळ्यातही पाण्याची पातळी वाढते, असा प्रत्येक वेळचा माझा अनुभव आहे. नाल्यातील पाण्याचाही संरक्षित सिंचनकामी उपयोग केला जातो. त्यामुळे हरभऱ्याची उत्पादकता दर वर्षीच्या एकरी पाच क्‍विंटलवरून आठ क्‍विंटलपर्यंत पोचली आहे. पिकाला आवश्‍यकता असेल त्या वेळी पाण्याची सोय करता आली तर हे शक्‍य होते.''- मधुकर विश्राम तहकीक, मुंगळा
""शेळकी नाल्याच्या काठावर माझी साडेपाच एकर जमीन आहे. त्यात दर वर्षी जिरायती पिके घेण्याशिवाय पर्याय नव्हता. शेतात विहीर असूनही विजेचा पर्याय नसल्यामुळे त्यातील पाण्याचा उपसा शक्‍य होत नव्हता. विहीरदेखील एकदा उपसा केल्यानंतर तळ गाठायची. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन जेमतेम एकरी तीन क्‍विंटल मिळायचे. बांधामुळे नाल्यात पाणी साठू लागले. परिणामी, विहिरीची पातळी वाढली. त्यातील पाण्याचा उपसा करण्याऐवजी नाल्यातील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला आहे. आता पिकाची उत्पादकता योग्य व्यवस्थापनातून तीन क्‍विंटलवरून सात क्‍विंटलवर गेली आहे. संरक्षित सिंचनामुळे हे शक्‍य झाले. पाणीउपसाकामी लागणारे डिझेल इंजिन आम्ही शेतकरी आवश्‍यकतेनुरुप एकमेकाला देतो. तासाला सरासरी एक लिटर डिझेल पाणीउपसा करतेवेळी खर्च होते. हा खर्च वाढीव उत्पादकता व त्यातून होणाऱ्या अर्थार्जनाच्या तुलनेत जास्त नाही.'' 
- गोविंदा ग्यानुजी वायकर
""शेळकी नाल्यालगत माझी साडेतीन एकर जमीन आहे. या क्षेत्रावर रब्बी हंगामात गहू, खरिपात तूर यासारखी पिके घेतो. संरक्षित सिंचनाकरिता मी कृषी विकास योजनेतून शेततळे घेतले आहे. नाल्यालगत शेती असल्याने या शेततळ्यातील जलसंचय उपशानंतरही कमी होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या पाण्याची सोय करणे शक्‍य झाले. पिकाच्या एका संरक्षित सिंचनाची सोय झाल्यास उत्पादकता वाढते, असा माझा अनुभव आहे. सरासरी दोन ते तीन क्‍विंटलची उत्पादकता गरजेच्या वेळी पाणी दिल्यास निश्‍चित वाढीस लागते.'' 
- बबन पवार
संपर्क ः 
- संतोष वाळके - 9422921090 
तालुका कृषी अधिकारी
- लक्ष्मण सावंत - 9404960066 
कृषी सहायक
लेखक : विनोद इंगोले

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate