অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सचिनने केले शेतीतच करिअर

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील सचिन सारडा यांच्यावर पडलेली शेतीची जबाबदारी ते वडिलांइतकीच प्रयोगशीलतेने पार पाडत आहेत. पारंपरिक शेतीमध्ये प्रयोगाअंती काही बदल करत, केळी, हळद यांसारख्या नव्या पिकाची जोड दिली आहे. त्यातून नोकरीइतकेच किंबहुना अधिक उत्पन्न मिळवणे शक्‍य असल्याचे या युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.

- विनोद इंगोले 

शिरपूर जैन (ता. मालेगाव जि. वाशीम) येथील रहिवासी दामोदर सारडा कुटुंबीयांची दहा एकर वडिलोपार्जित विहीर बागायत शेती आहे. त्यांची दोन मुले सचिन व सतीश. सचिनचे शिक्षण बी.कॉम., तर सतीशचे बी.ए.पर्यंत झालेले. मात्र, सतीश हे जन्मतः पोलिओमुळे अपंग असल्याने, विद्युत व भेटवस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळतो. त्यातच दामोदर सारडा यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्याने शेतीची जबाबदारी सचिनच्या खांद्यावर आली. सचिननेही नोकरी शोधत बसण्याऐवजी शेतीलाच आपले करिअर मानले. वडिलांच्या प्रयोगशील शेतीचा वारसा तो चालवत आहे.

पारंपरिक पिकात केले हळूहळू बदल

शेती करायला सुरवात केल्यानंतर सचिन यांनी एका विहिरीवर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये विंधनविहीर घेऊन शेतात सर्वत्र पाइपने पाणी फिरवले आहे. वडील पूर्वी सोयाबीन, हरभरा आणि तूर या सारखी पिके घेत असत. त्यात काही बदल करत, किंवा नवीन पिकांची लागवड त्यांनी केली आहे. वडील दरवर्षी नुसते सोयाबीन पीक घेत. त्यात तुरीचे आंतरपीक घेतले आहे. त्यासाठी सचिन यांनी चार ते सात तासानंतर तूर लावून प्रयोग केले. आता ते सोयाबीनच्या सहाव्या तासानंतर तुरीचा एक तास ठेवतात. साधारणतः सोयाबीनपासूनचा तुरीचा हा तास पाच फुटांवर राहतो. तुरीचे उत्पादन एकरी सरासरी चार क्‍विंटल मिळते.

सोयाबीन पिकाचे अर्थशास्त्र


  • 2010-11 या वर्षी सोयाबीनचे एकरी नऊ क्‍विंटल उत्पादन झाले. शिरपूर बाजारपेठेत 2200 रुपये प्रतिक्‍विंटल दराप्रमाणे 19 हजार 800 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून उत्पादनखर्च आठ हजार रुपये झाला.
  • 2011-12 मध्ये चार एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. एकरी उत्पादन दहा क्‍विंटल मिळाले असून, 2500 रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. त्यातून एकरी 25 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना झाले. उत्पादनखर्च एकरी दहा हजार रुपये इतका झाला.
  • 2012-13 मध्ये सोयाबीन लागवड पाच एकरवर केली. उत्पादन एकरी नऊ क्‍विंटल मिळून चार हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने 36 हजार रुपये एकरी मिळाले. या वर्षी उत्पादनखर्च एकरी 11 हजार रुपये झाला.

हळदीचा ताळेबंद


  • 2010-11 मध्ये सरी वरंबा पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली. त्यापासून वाळलेल्या हळदीचे एकरी 20 क्‍विंटल उत्पादन मिळाले. हिंगोली बाजारपेठेत आठ हजार रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. एक लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. बेण्यांच्या खरेदीसह पिकाच्या खत व कीड नियंत्रणावर एकरी 40 हजार रुपये खर्च झाला. हा खर्च वजा जाता एकरी एक लाख 20 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.
  • 2011-12 या वर्षी दोन एकर क्षेत्रामध्ये गादी वाफ्यावर हळदीची लागवड केली. त्यापासून एकरी साडेबावीस क्‍विंटल उत्पादन झाले. उत्पादित हळदीचे सात हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराप्रमाणे एक लाख 57 हजार 500 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून एकरी 45 हजार रुपयांचा खर्च वजा जाता एकरी एक लाख 12 हजार 500 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.
  • 2012-13 या वर्षी दोन एकर क्षेत्रावरील हळदीपासून एकरी 23 क्‍विंटल उत्पादन मिळाले. त्याला सहा हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळून एक लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. त्यातून एकरी 45 हजार रुपयांचा खर्च वजा जाता 93 हजार रुपयांचा नफा मिळाला.

केळीतून संपन्नता

महालक्ष्मी जातीच्या बेण्यांची लागवड ते करतात. जळगावमधून दहा रुपये प्रती नगाप्रमाणे केळी बेण्यांची खरेदी केली जाते. एकरी 1700 केळीच्या झाडांची संख्या आहे. केळी लागवडीपूर्वी सात बाय सात फूट अंतरावर बळिराम नांगराच्या साहाय्याने सरी काढण्यात येतात. एक फूट खड्डा खोदत त्यात सेंद्रिय खत टाकले जाते. केळीचा कंद ठेवून खड्डा बुजविण्यात येतो. ठिबकच्या साहाय्याने दर महिन्याला शिफारसीत खतांची मात्रा दिली जाते. जून-जुलै महिन्यात लागवड केल्यानंतर या पिकाला ठिबकद्वारे पाणी व खताचा पुरवठा केला जातो. लागवडीनंतर सरासरी महिनाभराने खत देण्यास सुरवात होते. केळीवरील कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार फवारण्या घेतल्या जातात. पिकाच्या व्यवस्थापनात मालेगावचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह कृषी सहायक एस.पी. चवरे यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे सचिन यांनी सांगितले. 
केळीला माल धरल्यानंतर 100 रुपये प्रती झाड याप्रमाणे विक्री करण्यात आली. त्यातून एक लाख 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यासाठी 40 हजार रुपये उत्पादनखर्च आला.

  • 2011-12 या वर्षात दीड एकरावर त्यांनी केळीची लागवड केली होती. एकरी 1700 झाडे संख्या होती. त्याची विक्री 150 रुपये प्रतिझाड याप्रमाणे केली. दोन लाख 55 हजार रुपयांचे उत्पन्न झाले तरी उत्पादनखर्चात वाढ होऊन तो 60 हजार रुपये झाला.
  • 2012-13 या वर्षी देखील एकरी 1700 झाडापासून दीडशे रुपये दराने प्रतिझाड या प्रमाणे दोन लाख 55 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पीक व्यवस्थापनावर 67 हजार रुपये खर्च झाला.

बाजारपेठेवर लक्ष ठेवून करतात विक्री...

सारडा यांचा जळगाव येथील व्यापाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क असतो. हंगामामध्ये दरदिवशीचा दराचा आढावा ते घेतात. हाच पॅटर्न हळद दराबाबतही राबविला जातो. हिंगोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून हळदीच्या दराची माहिती घेतली जाते. दर कमी असल्यास वाशीम येथील गोदामामध्ये हळद उत्पादन तारण ठेवून आवश्‍यक कर्ज रकमेची उचल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयोगशीलतेचा वारसा

सचिन यांचे वडील दामोदर सारडा हेही शेतीत प्रयोग करत पारंपरिक पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करत होते. त्यांना 1997 मध्ये अकोला जिल्हा परिषदेतर्फे शेतीमित्र पुरस्कार मिळाला होता. तसेच ते सहयोग स्वयंसहाय्यता या शेतकरीगटामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयोगशीलतेचा वारसा सचिनही जपतो आहे.

शिकण्याजोगे काही...

1) कृषी विभाग व करडा कृषी विज्ञान केंद्राच्या सातत्याने संपर्कात. सर्व कार्यशाळांना उपस्थिती. 
2) वाशीम जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटत नव्या पिकाकडे वाटचाल. 
3) ठिबकचा वापर वाढवण्याचा मनोदय. सध्या केळी व हळद पिकांकरिता करतात वापर. 
4) सेंद्रिय खत पुरवठ्यासाठी शेणखताचा वापर. 
5) बाजार दर कमी असल्यास विकण्याऐवजी हळद ठेवतात तारण. 

संपर्क -  सचिन सारडा, 9960833921

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate