অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सणांच्या मागणी शेवंती शेती

गावातून दिवाळी, दसरा या सणांदरम्यान सुमारे 10 ते 12 टन शेवंती फुले मुंबई व हैदराबाद येथे पाठवली जातात. गावात या फुलपिकातून सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते.
डोंगराळ भाग असलेल्या हंगा (ता. पारनेर, जि. नगर) येथील राजाराम व विनायक नवले या बंधूंनी वडिलोपार्जित असलेल्या शेवंती पिकाची शेती विस्तारित करून त्यातून आपल्या कुटुंबाचे अर्थकारण बदलवले आहे. दरवर्षी सुमारे चार ते सहा एकरांवर या पिकाचे नियोजन करून बाजारपेठ व सणासुदीचा व विशेष दिनांचा (मार्गशीर्षातील गुरुवार) विचार करून दोन हंगामांत त्यांनी लागवडीचे केलेले नियोजन महत्त्वाचे ठरले आहे.
नगर जिल्ह्यात हंगा (ता. पारनेर) गावचे पर्जन्यमान सरासरी 550 मिलिमीटर आहे. डोंगराळ भाग असल्याने मृद्‌संधारणाची कामे तशी कमीच झालेली आहेत. त्यामुळे विहिरीची पाणीपातळी कायमच कमी असते. 
पूर्वी गावात ज्वारी, हरभरा आदी पारंपरिक पिके केली जायची, मात्र त्यातून म्हणावा तसा आर्थिक फायदा व्हायचा नाही. मात्र शेवंती हे फूलपीक गावासाठी वरदान ठरले आहे. कमी पाण्यात चांगले उत्पादन व उत्पन्न देणारे पीक म्हणून येथील गावकऱ्यांनी या पिकाला अर्थकारण घडवणारे पीक म्हणून पसंती दिली आहे.

नवले बंधूंकडे वडिलोपार्जित शेवंती पीक

गावातील राजाराम व विनायक नवले बंधू यांची वडिलोपार्जित सुमारे 22 एकर शेती आहे. त्यात ते विविध पिके घेतात. फ्लॉवर, भेंडी, झेंडू, कांदा ही पिके असतातच. पण दरवर्षी किमान चार ते सहा एकरांवर शेवंतीचे पीक असतेच. नवले बंधूंकडे हे पीक वडिलोपार्जित घेतले जाते. पूर्वी ते काही गुंठ्यांवर असायचे. आता त्याचे क्षेत्र वाढत गेले आहे. ज्या वर्षी दुष्काळी परिस्थिती येते त्या वेळी शेवंतीला टॅंकरने पाणी देऊन व त्यासाठी पैसे खर्च करून हे पीक जगवले जाते. मात्र पिकाचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ दिले जात नाही. शेवंती पीक हे या शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक कणाच झाले आहे.

लागवडीसंबंधी महत्त्वाचे...

नवले बंधू दरवर्षी दोन हंगामांत शेवंतीची लागवड करतात. मार्चमध्ये केलेल्या लागवडीपासून फुले गणेशोत्सव, दिवाळी या काळात विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर जुलैच्या सुमारास केलेल्या लागवडीची फुले डिसेंबरमध्ये विक्रीस येतात. या काळात ख्रिसमस, तसेच मार्गशीर्षातील गुरुवार या सणांना लक्ष्य केले जाते. त्या काळात फुलांना चांगली मागणी असते. 

पाणी व्यवस्थापन

पाण्याची टंचाई असलेला हा भाग असल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागते. गेल्या वर्षी दुष्काळात टॅंकरच्या पाण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये नवले यांनी खर्च केले. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन तर केले आहेच. प्रत्येक ड्रीपरजवळ याप्रमाणे एकरी सुमारे 22 हजार काश्‍यांची लागवड केली आहे.

फर्टिगेशनद्वारेही पिकाचे पोषण

लागवडीपूर्वी एकरी सुमारे एक ते दोन ट्रक शेणखताचा वापर होतो. त्यानंतर निंबोळी पेड एकरी 150 किलो दिली जाते. डीएपी, कोंबडी खत यांचा वापर होतो. शेवंतीला कळी येण्याच्या अवस्थेत विद्राव्य खते ठिबकद्वारे दिली जातात. शेवंती पिकावर प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडीचा उपचार केला जातो. कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायमेथोएटची फवारणी गरजेनुसार केली जाते.

पिकाचा ताळेबंद

लागवडीनंतर सुमारे सहा महिन्यांनी काढणीचा हंगाम सुरू होतो. गणेशोत्सव, दिवाळी या काळात फुलांना चांगले दर मिळतात. किमान दर किलोला 40 रुपये, तर 60, 80 रुपये असा वाढत जाऊन तो कमाल 120 रुपयांपर्यंतही जातो. करंडीत व्यवस्थित पॅकिंग करून फुले हैदराबाद, मुंबई (वाशी मार्केट) व पुणे येथे विक्रीसाठी पाठविली जातात. हैदराबादला अन्य बाजारपेठांपेक्षा चांगला दर मिळत असला तरी वाहतुकीच्या दृष्टीने ते परवडत नाही. त्यापेक्षा मुंबईलाच 60 ते 80 रुपये दर घेणे परवडते. खर्च वजा जाऊन एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती पडते.

गावासाठीच शेवंती ठरली लाभदायक

पाणी कमी असल्याने खरबूज आणि मिरचीची लागवड करण्याचे नियोजन आहे. उन्हाळ्यात ते विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, त्याला चांगला दर मिळण्याची नवले यांची अपेक्षा आहे. प्लॅस्टिक मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही विचार आहे. नवले म्हणतात, की पाण्याची गरज कमी असलेले पीक असून, त्याने आमचे अर्थकारण सुधारले आहे. अनेक शेतकऱ्यांना या पिकातील उत्पन्नापासून ट्रॅक्‍टर, पीक-अप व्हॅन, ठिबक संच आदी गोष्टी घेणे शक्‍य झाले आहे. गावात घरटी किमान दहा गुंठे तरी शेवंतीचे पीक पाहण्यास मिळतेच. 
त्यामुळे सामूहिकरीत्या विक्री करणे सोपे होते. हंगामात प्रति दिवशी चार ते पाच गाड्यांची वाहतूक सुरू असते. 
दसरा-दिवाळी हंगामासाठी गावरान राजा वाणाची निवड केली जाते. या पांढऱ्या रंगाच्या फुलाला अधिक मागणी असते. डिसेंबरमधील फुले शक्‍यतो पिवळी असतात.

शेवंती घेणारे हंगा गाव

हंगा गाव कायम दुष्काळी असल्याने शेतकऱ्यांना दर वर्षीच पाण्याची टंचाई भासते. गावाची लोकसंख्या सुमारे सात ते साडेसात हजार आहे. येथे रोजगाराचा दुसरा पर्याय नसल्याने अनेक शेतकरी कमी पाण्यावर विविध पिके घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सर्वाधिक शेतकरी शेवंती घेतात. सध्या गावात सुमारे 100 ते 150 शेतकरी त्याची शेती करतात. त्याची विक्रीही सामूहिकपणे करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून चांगला दर घेणे शक्‍य होते. परिसरात काही गावांनीही हंगा गावाचा आदर्श घेत या पिकाकडे आपला कल दाखवला आहे.

अधिक संशोधनाची अपेक्षा

आगामी काळात शेवंतीपासून चांगले उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठांकडून अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. दरवर्षी विद्यापीठे, कृषी प्रदर्शने, मेळावे, फुलांसंबंधित विविध संस्था यांना भेटी देऊन अधिक माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे बाजारात शेवंतीचे कोणते नवे वाण आले आहे हे समजते. त्यानुसार शक्‍य त्याचा वापर करून उत्पादनवाढ घेण्याचा प्रयत्न राहतो, असेही नवले बंधूंनी सांगितले. 
------------ 
विनायक नवले, 9881867309

लेखक : संदीप नवले

माहिती संदर्भ : - अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate