অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाघोले बंधूंची फुले

फुलशेतीबरोबर सजावटीचा शोधला व्यवसाय


दारुंब्रे (ता. मावळ, जि. पुणे) येथील ज्ञानदेव विठ्ठल वाघोले यांची सुमारे 18 एकर शेती असून, गेल्या सोळा वर्षांपासून ते फुलशेती करतात. झेंडू, ऍस्टर, बिजलीसारखी त्यांची फुले मुंबई बाजारात जात. मात्र विक्री आणि मिळणाऱ्या पट्ट्या या दरात तफावत व्हायची. व्यापाऱ्यांशी सातत्याने वाद करूनही फरक पडत नव्हता. बाजारपेठेचा अभ्यास करून लिलीच्या फुलांना वाव असल्याचे दिसले. डहाणू येथून 45 हजार कंद 35 पैसे प्रति कंद प्रमाणे दोन एकरात लावले. 

जीवनाला वळण देणारा प्रसंग घडला

-एके दिवशी तीन हजार लिली गड्ड्यांची विक्री चार रुपये प्रति गड्डी प्रमाणे झाल्यानंतर पट्टी मात्र तीन रुपयांनी केलेली दिसली. पुन्हा 10 टक्के कमिशन कापले गेले. आपण स्वतः माल विकू शकत नसल्याने तीन हजार रुपयांचे नुकसान झालेले दिसले. 
-2010 मध्ये पिंपरीत भाजीपाला बाजारात फुलांची विक्री सुरू केली. शहाजी राक्षे या फूल उत्पादकाबरोबर भागीदारीत व्यवसाय होता. लहान बाजार होता, विक्री सुलभ नव्हती. आता मात्र व्यापाऱ्यांची कमिटी स्थापन होऊन ज्ञानदेव यांना विक्रीचा परवाना मिळाला आहे. 
-परिसरातील 10 शेतकऱ्यांची फुलेही ते विकतात. 

फुले सजावट व्यवसायाचा प्रारंभ

पुणे शहराचा भाग असलेले हिंजवडी हे "आयटी' उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील विविध कंपन्यांकडून फुलांचे बुके, हार, फुलांच्या सजावटीला मागणी असल्याचे ज्ञानदेव यांना समजले. त्यानुसार 2011 मध्ये हिंजवडीत गाळा घेऊन हार बनविणारा कारागीर बरोबर घेत या व्यवसायाला सुरवात केली. 

व्यवसायाचे स्वरूप व रचना

- ज्ञानदेव यांच्याकडे फुलांचे बुके, हार, लग्नासाठी मंडप, फुलांच्या रांगोळ्या यांच्या ऑर्डर येतात. 
- त्यासाठी हरितगृहातील डच गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, ऍन्थुरिअम अशा विविध फुलांचा वापर होतो. 
- पिवळी डेझी, पासली पाला, स्प्रिंगेरी तसेच विविध प्रकारची पाने "फिलर' म्हणून वापरली जातात. 
- जरबेरा फुलांच्या पुरवठ्यासाठी 11.5 गुंठे क्षेत्रावर हरितगृह आहे. त्यासाठी साडेसात लाख रुपये बॅंकेचे कर्ज व स्वतःची साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक आहे. हरितगृहाचे व शेतीचे नियोजन बंधू कैलास करतात. 
-ऑर्डर पुरविण्यासाठी हार बनविणाऱ्या व सजावट करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढवली आहे. कायमस्वरूपी आठ कारागीर दुकानात असतात. लग्नसराईमध्ये आणखी मागवले जातात. व्यवसायवृद्धी करताना 2012 मध्ये हिंजवडीत मोठा गाळा साडेबारा हजार रुपये प्रति महिना भाड्याने घेतला आहे. 
- फुलांच्या वाहतुकीसाठी गाडी खरेदी केली आहे. 

फुलांची मागणी स्वतःच्या शेतातून अशी होते...

- तीन एकर लिली 
- 11.5 गुंठे हरितगृह (जरबेरा) 
- 30 गुंठे पासली पाला 
- 30 गुंठे डेझी व स्प्रिंगेरी यांची लागवड 

अन्य शेतकऱ्यांचाही होतो फायदा

- ज्ञानदेव स्वतःच्या फुलांबरोबरच अन्य 10 शेतकऱ्यांच्या फुलांची व फिलरचीही विक्री करतात. त्यांच्याकडून सहा टक्के कमिशन घेतले जाते. मात्र त्यांचीही फुले अधिक दराने विकली जावी यासाठी ते प्रयत्न करतात. 
- काही वेळा सजावटीसाठी आवश्‍यक विविध फुले अन्य व्यापाऱ्यांकडून घ्यावी लागतात.

सजावटीला मागणी

- हिंजवडी येथील सात "आयटी' कंपन्या व चार हॉटेलकडून काही ऑर्डर कायमस्वरूपी. 
-तत्कालीन कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप ऑर्डर. 
-बुके, गुच्छ व विविध सजावटीसाठी मागणी. 

-लग्नासाठी मंडपाच्या फुलांच्या सजावटीला पुणे परिसरातील सर्व मंगल कार्यालयांतून मोठी मागणी असते. या सजावटीला कापडी सजावट, प्रकाश योजना यांची जोड दिली तर त्यानुसार दर बदलतात. समारंभाच्या संकल्पनेनुसार योग्य फुलांचा समावेश सजावटीत होतो. 
-सजावटीचे चाळीस हजारांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत दर आहेत. 

कॅप्शन

- लग्नामध्ये नवरा- नवरीला नेण्यासाठी गाडी सजविली जाते. त्याचे फुलांनुसार चार हजारांपासून ते 60 हजार रुपयांपर्यंत दर ठरतात. लग्नसराईत दररोज आठ ते दहा गाड्या सजवल्या जातात. 
- लग्नासाठी फुलांचे बाशिंग, दोन मोठे हार व फुले असा एकत्रित दर 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत असतो. 
ग्राहकांच्या फुलांच्या मागणीनुसार ते बदलतात. गुलाब पाकळ्यांचे हार पाच हजार रुपये प्रति नग असतात. 
- साधे हारही (आकार व गरजेनुसार) प्रति नग दहा रुपयांपासून दोन हजारांपर्यंत विकले जातात. त्याचे दररोजचे ग्राहक ठरलेले आहेत. 

या व्यवसायातील फायदे- तोटे -

- नुसत्या फुलविक्रीच्या तुलनेत खर्च वजा जाता 40 टक्के अधिक फायदा होतो. 
- मागणी कालावधीमध्ये फुलांचे दर चढे असतात. अधिक गुंतवणूक करावी लागते. सर्व व्यापाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावे लागतात. 
- फुले नाजूक व नाशवंत असल्याने खराब फुले, हारांचा खर्च अंगावर पडतो. 
- लग्नसराईत सजावट कारागीर कमी पडतात. लग्नसराई नसताना फुलांची मागणी कमी होते. सजावटींनाही मागणी कमी असते. या कालावधीत कारागीर सांभाळावे लागतात. 
- दुकानाचे स्थिर खर्च चालूच असतात. त्यांचेही वर्षाचे नियोजन करावे लागते. 
-ज्ञानदेव यांना 2011 मध्ये शेतीतील योगदानाबाबत क्रांतिगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

लग्नसराईच्या कालावधीत फूल सजावटीचा व्यवसाय रात्रीही सुरू असतो. अशावेळी अन्य ठिकाणचे कारागीर कामासाठी आणले जाते. काही वेळा रात्री दीड वाजताही शेतात जाऊन स्प्रिंगेरी, जरबेराची तोडणी गाडीच्या प्रकाशात केली आहे. दृष्टीला मोहून घेणारी फुलांची सजावट आपोआप तुमच्या कामांची जाहिरात करते. ग्राहक तुमच्यापर्यंत चालत येत असल्याचा अनुभव येतो. प्रत्येकाला आपल्या घरातील लग्न सुंदर, वेगळे व्हावे असे वाटते. त्यामुळे या व्यवसायाला वाव आहे. मात्र नियोजन व कष्ट यांची सांगड घालावी लागते. 

- ज्ञानदेव वाघोले 

ज्ञानदेव वाघोले, 9850565446 
कैलास वाघोले, 9850763062

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate