অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची !

सफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची !

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख आणि राज्याचे माहिती संचालक (माहिती व वृत्त) शिवाजी मानकर यांच्या रत्नागिरी दौऱ्‍यात मी परवा होतो. सकाळी थोडावेळ होता, म्हणून रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला भेट देण्याचे ठरविले. नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.पी.बी.सानप यांनी आमचे स्वागत केले. भाट्ये परिसरात असणारे हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. रत्नागिरीला पर्यटनासाठी जातांना अन्य ठिकाणं जेव्हा आपण पाहतो तसे हे ठिकाण शेतीप्रेमींनी आवर्जुन पहावे असे आहे.

नारळ समुद्रकिनारा आणि लगतच्या भागात वाढणारे ताड कुळातील वृक्ष आहे. सर्वसाधारणपणे नारळ लागवडीसाठी एक वर्षाची रोपे निवडली जातात. पाच ते सहा पाने असलेली झाडे सहजपणे जगतात. दोन झाडांमधील अंतर 7.5 मिटर एवढे असते. ठेंगू जातीसाठी हेच अंतर 6.5 मीटर एवढे असते. नारळाच्या प्रमुख दोन जाती एक तर उंच आणि ठेंगू. यानुसार संकरीत जातींची विभागणी केली जाते. उंच जातीत वाणवली, लक्षदीप ऑर्डिनरीमध्ये चंद्रकल्पा, प्रताप, फिलीपाईन्स ऑर्डिनरी यांचा समावेश आहे. तर ठेंगू जातीमध्ये ऑरेंजडार्फ, ग्रीनडार्फ आहेत. संकरीतमध्ये टीडी केरासंकर, टीडी चंद्रसंकर याचा समावेश होतो.

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात आता लाखीबागेचेही व्यवस्थापन होते आहे. अननस, मसाले पदार्थ या सोबत चिकू, पेरुचे उत्पादन होतांना दिसते. केंद्र सरकारच्या ऑल इंडिया कोकोनट रिसर्च प्रोजेक्ट (ICAR) अंतर्गत या प्रादेशिक संशोधन केंद्राला अनुदान मिळते. या संशोधन केंद्राने आत्तापर्यंत नारळाच्या अनेक उत्तम जाती विकसित केल्या आहेत. प्रताप, कोकण भाट्ये, केरा संकर, केरा बस्तर, गोदावरी गंगा यांचा समावेश आहे. कोकण विद्यापीठानेही यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे.

सर्वसाधारणपणे भारतात 2140.50 हजार हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड केली जाते. इंडोनेशिया आणि फिलीपाईन्स नंतर उत्पादनात भारताचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 28.10 हजार हेक्टरमध्ये नारळ लागवड आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात नारळ लागवड क्षेत्र आहे. गेल्याचार वर्षात या भागात मोठी वाढ झाली आहे. नारळ बागेतच आता अंतरपीक घेतले जात असल्याने शेतकरी याकडे वळू लागले आहेत. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधनाबरोबरच शेतकऱ्‍यांना मार्गदर्शनही केले जाते.

कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार कोकण विभागात नारळबाग करण्यासाठी विशेष अनुकुल हवामान आहे. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामुळे अनेक नवनव्या प्रजाती पुढे आल्या. त्याचे विविध पद्धतीने संशोधनही होतांना दिसते. या संशोधनाचा मोठा लाभ शेतकऱ्‍यांना होतो आहे. नारळ बागेचे संवंर्धन करण्याच्या विविध पद्धती आहेत.

महाराष्ट्र शासनाने 1990 नंतर रोजगार हमी योजनेंतर्गत नारळबाग विकसित करण्यास मान्यता दिल्याने हेक्टरी क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 62 वर्षापासून नारळ संशोधन केंद्रातील संशोधन म्हणजे महाराष्ट्रातल्या नारळासाठी एक पथदर्शक प्रकल्प ठरला आहे.

एक तास संशोधन केंद्रात फेरफटका झाला. उन्हाचा त्रास जाणवू लागला होता. ताज्या शहाळ्याने तहान भागली. संशोधन केंद्राच्या कार्यालयात आल्यावर डॉ.वैभव शिंदे अत्यंत उत्साहाने माहिती देत होते. आमच्या मनातील प्रश्नांची उत्तर मुद्देसुदपणे मिळत होती. एका प्रश्नाला डॉ.शिंदे म्हणाले “नारळाच्या पाण्यात 4 टक्के शर्करा असते, 0.10 टक्के प्रथिने, 0.10 फॅटस्, लोह, स्फूरद, चुना याचे प्रमाण अल्प असते.”

नारळ रोपांची निगा, पूर्वमशागत, छाटणीच्या पद्धती, महत्त्वाच्या किडी व त्याचा बंदोबस्त, उपाययोजना यावर चर्चा झाली. पुढच्या भेटीची वेळ जवळ आल्याने आम्ही निरोप घेतला. कोकण कृषी विद्यापीठ, केंद्र सरकारच्या मदतीने सुरु असणाऱ्‍या रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला पुन्हा भेट देण्याचे ठरवून मार्गस्थ झालो.

लेखक: डॉ.गणेश व.मुळे

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate