অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिरची उत्पादनात सातत्य

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नंदुरबार जिल्ह्यातील अवर्षणप्रवण बामळोद येथील दशरथभाई व त्यांचे चिरंजीव कैलासभाई पटेल यांनी मिरचीची शेती उत्कृष्ट व्यवस्थापनातून यशस्वी केली आहे. चिकाटी, शिकाऊ वृत्ती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व अविरत कष्ट यांतून त्यांनी चांगल्या उत्पादनात सातत्य ठेवले आहे. नंदुरबार शहरापासून सुमारे 11 किलोमीटरवर अवघे 400 लोकवस्तीचे बामळोद हे अवर्षणप्रवण गाव. पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष. फक्त यंदाचे वर्ष अपवादात्मक ठरले. पावसाची सरासरी 1000 मि.मी.च्या वर गेली; अन्यथा दर वर्षी फेब्रुवारीनंतर पिके सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत ठरलेली असते. आता ठिबक सिंचन तंत्रामुळे मात्र बागायती पिके घेणे शक्‍य होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत समस्त जिल्ह्याला किंवा अशा भौगौलिक परिस्थितीला आदर्श ठरेल असे मिरची पिकाचे व्यवस्थापन सलग सहाव्या वर्षी यशस्वी करण्याची किमया बामळोदचे दशरथभाई व त्यांचे चिरंजीव कैलासभाई पटेल यांनी केली आहे.

पटेल यांचे एकूणच मिरची व्यवस्थापन अभ्यासण्यासारखे आहे ते असे.


1) उंच गादीवाफा-धुऱ्यावर रोपांची लागवड ः 
कैलासभाई आपल्या यशातील मुख्य घटकांमध्ये या घटकाचा समावेश करतात. रोपलागवडीसाठी जमिनीपासून दीड फूट उंचीचे गादीवाफे तयार करतात. दोन गादीवाफ्यांत पाच फूट, तर दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवले जाते. या पद्धतीद्वारा एकरी सुमारे 5900 रोपे लागतात. उंच गादीवाफ्यामुळे पावसाळ्यातही वाफसा सातत्याने टिकून राहतो. पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते. यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होते. मर, मूळकूज, बुंधासड आदी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टळतो.
2) योग्य कालावधीत रोपांची लागवड ः
लाल मिरचीचे जास्त तोडे मिळावेत या दृष्टीने लागवड जूनच्या 20 तारखेपर्यंत होते. पुढे मार्चनंतर तापमान बऱ्याचदा 40 अंश से.च्या वर जात असल्यामुळे फुलगळ, तसेच पीकपोषणाच्या समस्या उद्‌भवतात. कोणत्याही मिरचीच्या वाणात सुरवातीला झाडाच्या चांगल्या वाढीसाठी हिरव्या मिरचीचे दोन तोडे होणे आवश्‍यक असतात. जूनमध्ये लावलेल्या मिरचीच्या हिरव्या तोड्यांनाही दर चांगले मिळतात.
3) वाण ः कोणत्याही एका वाणावर अवलंबून न राहता, कैलासभाई गुणात्मक वैशिष्ट्य, मागणी व अभ्यासानुसार दोन-तीन वाणांची लागवडीसाठी निवड करतात.
4) संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन ः कैलासभाईंच्या यशाचे हे मूलभूत गमक आहे. साधारणतः सप्टेंबरपासून तोड्यास प्रारंभ होऊन ते मे महिन्यापर्यंत सुरू राहतात. तोड्याच्या अनुषंगाने मिरचीला खते दिली जातात. त्यातील काही नियोजन असे-
* रोपेलागवडीच्या 8-10 दिवस आधी- एकरी 8 ट्रॉल्या शेणखत, चार गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट, एक गोणी म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून गादीवाफे तयार केले जातात.
-रोपेलागवडीनंतर 10-15 दिवसांनी 19ः19ः19 द्वारा फर्टिगेशनची सुरवात. 
-लागवडीच्या तिसऱ्या आठवड्यापासून युरिया व 19ः19ः19 एकत्रितपणे. 
-लागवडीच्या 4 आठवड्यानंतर युरिया सोबत 12ः61ः00, म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून फर्टिगेशन. 
-युरियाचा वापर दोन महिन्यांपर्यंत. त्यानंतर युरियाऐवजी अमोनियम सल्फेट दिले जाते. 
-सूक्ष्म अन्नद्रव्ये फर्टिगेशनद्वारा पिकाच्या परिस्थितीनुसार तिसऱ्या महिन्यापासून दिली जातात. सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असलेली ग्रेड एकरी 2 लिटर दोनदा दीड महिन्यांच्या अंतराने दिली जाते. पुढे पिकाच्या गरजेनुसार अर्धा किलो चिलेटेड जस्त, चिलेटेड फेरस व 250 ग्रॅम बोरॉन फर्टिगेशनद्वारा पुनश्‍च दिली जातात. 
-हिवाळ्यात दर 8-10 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, गंधक आलटून पालटून देण्यात येतात. 
-तोडे संपण्याच्या दीड महिन्याआधी स्फुरदयुक्त खते बंद केली जातात. नत्र, पालाशयुक्त खते देणे तोडणी संपण्याच्या 15 दिवस आधी थांबवली जातात

सुनियोजित पाणी व्यवस्थापन


-वाफसा स्थिती राखली जाते. 
-सुरवातीला रोपेलागवडीनंतर ताशी चार तास पाण्याचा डिस्चार्ज असलेल्या ड्रिपर्सद्वारा मध्यम प्रतीच्या जमिनीत दररोज 10 मिनिटे पाणी दिले जाते. 
-पावसाळ्यात कोरडा काळ जाणवला, तर एक महिन्याच्या पिकाला किमान अर्धा तास पाणी दिले जाते. 
-उन्हाळा सुरू झाल्यानंतर दररोज तीन तास पाणी दिले जाते.

रोग व कीड नियंत्रण

फुलकिडे, लाल कोळी, मावा, पाने व फळे पोखरणाऱ्या अळ्या, तसेच रोगांमध्ये भुरी व करपा आदींचा प्रादुर्भाव होतो. वातावरणानुसार संभाव्य रोग व किडींच्या प्रादुर्भावाचे आकलन करून दर 10-12 दिवसांनी नियमित कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. 
-सुरवातीला रोपलागवडीनंतर त्वरित 8-10 दिवसांनी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड व ह्युमिक ऍसिडची आळवणी केली जाते. यानंतरही मर आढळत असेल तर पहिल्या आळवणीनंतर आठ दिवसांनी मेटॅलॅक्‍झील + मॅंकोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची आळवणी होते. कोणत्याही बुरशीनाशक व कीटकनाशकाचा वापर लागोपाठ केला जात नाही.

काढणीचे नियोजन


तोडे जितके वेळेवर तेवढी मिरची पिकात नवीन फुले व लाल मिरच्या वजनाला चांगल्या येतात. ओल्या लाल मिरचीच्या तोड्यांची सुरवात रोपलागवडीनंतर सुमारे 90-100 दिवसांनी होते. सरासरी दर 12-15 दिवसांत मिरचीचे तोडे होत राहतात. प्रतितोड्याला 12-15 मजूर सहजगत्या 12-15 क्विंटल प्रतिएकर मिरचीची तोडणी करतात. उत्पादन खर्च प्रतिएकर सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत जातो; परंतु तोडे व विक्री सातत्याने सुरू राहत असल्याने, एवढा खर्च करण्यास कोणती अडचण येत नाही.

कैलाशभाईंच्या मिरची शेती यशाचे गमक


* उत्कृष्ट मशागत. 
* 20 जूनच्या आत रोपांची लागवड. 
* उंच गादीवाफ्याचा वापर. 
* फर्टिगेशन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीत नियमितता. 
* रोग व किडींच्या आकलनानुसार नियमित बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या फवारण्या. 
* ओल्या लाल मिरचीचे नियमित तोडे. 
* मजूर व्यवस्थापनाचे अप्रतिम कौशल्य.

मिरची पिकाचा ताळेबंद


येथे चौकट आहे
पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा दशरथभाईंनी लाल मिरचीचे एकरी उच्चांकी 300 क्विंटल उत्पादन घेतले होते. त्या वर्षी ऍग्रोवनमध्ये त्यांचा प्रयोग प्रसिद्ध झाल्यानंतर नंदुरबार, तसेच अन्य जिल्ह्यांमधून पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली. आजही अनेक शेतकरी त्यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन घेत असतात. दशरथभाईंना कृषी विभागाकडून कृषिभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दशरथभाईंच्या यशात नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राचा वाटाही मोलाचा राहिला आहे. हे केंद्र जणू तांत्रिक मार्गदर्शनाचे भक्कम माहेरघर, असा ते अभिमानाने उल्लेख करतात.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)
संपर्कः दशरथभाई पटेल. 
-कैलास पटेल-9763587673 
-प्रा. आर. एम. पाटील- 9850768876

लेखक : आर. एम. पाटील

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate