অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सहकार्यातून शाश्‍वत शेती विकास

सहकार्यातून शाश्‍वत शेती विकास

गेल्या २२ वर्षांत भारत आणि इस्रायलमधील व्यापार संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांतील कृषी संशोधन संस्था तसेच शेतकरी एकमेकांच्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करताहेत. यातून दोन्ही देशांतील कृषी क्षेत्राच्या विकासाला निश्‍चितपणे चालना मिळालेली आहे.

इरिटा मिलर

भारतीय शेतीला एक परंपरा आहे. पूर्वीपासून येथील समाजजीवन आणि उद्योग क्षेत्र हे शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे शेतीमधील सुधारणा या निश्‍चितपणे समाजाच्या विकासाला अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. संशोधन, शिक्षण आणि विस्ताराच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्यापर्यंत कृषी विद्यापीठे, तसेच संशोधन केंद्रातील तंत्रज्ञान पोचत आहे. भारतीय शेतकऱ्यांनी हरितक्रांती आणि श्‍वेतक्रांतीच्या माध्यमांतून स्वयंपूर्णता मिळवली; परंतु बदलत्या काळाप्रमाणे शेतीसमोरील प्रश्‍नही बदलत आहेत. जागतिकीकरण व हवामान बदलाचे परिणाम शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर दिसू लागले आहेत. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पौष्टिक अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांच्यावर आहे. भारतामध्ये एकीकडे दिवसेंदिवस अन्नधान्यांची मागणी वाढते आहे, हवामान बदलाचा धान्योत्पादनावर परिणाम होत आहे, तर दुसऱ्या बाजूला लागवडयोग्य क्षेत्र, पुरेसा पाणीपुरवठा आणि मजुरांची समस्याही पुढे येत आहे. इस्रायली शेतकऱ्यांपुढेही याच समस्या आहेत, त्यामुळे दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नातून कृषी क्षेत्रातील अडचणींवर निश्‍चितपणे मार्ग काढणे शक्‍य आहे. गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांतील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांच्यामध्ये देवाण-घेवाण वाढली आहे. दोन्ही देशांतील कृषी तज्ज्ञ एकमेकांच्या देशांना भेटी देऊन अडचणींवर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल, याबाबत प्रयत्न करीत आहेत.

१९९२ मध्ये भारत आणि इस्राईल सरकार दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. गेल्या २२ वर्षांत हे संबंध विविध पातळ्यांवर दृढ होत गेले. गेल्या २१ वर्षांत कृषी क्षेत्र विकास हाच सहकार्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्याला गती देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये विविध सामंजस्य करार झाले आहेत, पुढील काळातही होत राहतील. या करारांमध्ये प्रामुख्याने पीक उत्पादकता वाढ, पाणी व्यवस्थापन आणि ऊर्जा हे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही देशांच्या समन्वयातून कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन आणि उद्योजकता विकासाला गती देण्यात येत आहे. एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांच्या सहकार्याने कृषी क्षेत्राचा विकास हे सूत्र आम्ही ठेवले आहे. या माध्यमातून दोन्ही देशांतील व्यापार सहा दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत पोचला आहे. दोन्ही देशांच्यामध्ये ‘फ्री ट्रेड अॅग्रीमेंट’बाबत चर्चा सुरू आहे, त्यामुळे येत्या काळात हा व्यापार सुमारे १५ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या पुढे जाईल, यात शंका नाही.

गेल्या काही वर्षांत भारतातील कृषी तज्ज्ञ तसेच शेतकरी इस्राईलमधील संशोधन संस्था, उद्योग समूहांना भेटी देत आहेत. इस्राईलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भारतातील विविध राज्यांतून शेतकरी, कृषी संशोधक, कृषी अधिकारी, राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. या दौऱ्याच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना जगभरातील कृषी संशोधन आणि कृषी क्षेत्रात होणारे बदल, जागतिक बाजारपेठेची मागणी याचा अंदाज निश्‍चितपणे आला असेल. त्याचबरोबर आम्ही दर वर्षी भारतातील विविध राज्यांत "अॅग्रीटेक आशिया' या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनास सुरवात केली आहे. या माध्यमातून ज्यांना इस्राईलमधील प्रदर्शनांना भेट देणे शक्‍य झाले नाही, त्या शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान भारतातमध्ये पाहायला मिळत आहे.
२००६ मध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यामातून भारतातील आठ राज्यांत २८ कृषी विशेष क्षेत्रांची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी चार केंद्रांची उभारणी महाराष्ट्रात होत आहे. केंद्राच्या उभारणीबरोबर इस्राईलमधील तज्ज्ञ संबंधित विभागातील केंद्रावर कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, तसेच शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनातील नवतंत्र समजावून सांगणार आहेत. या संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनाही इस्राईलमधील कृषी संशोधन केंद्रामध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण, संशोधन विषयातील देवाण-घेवाण केवळ तज्ज्ञांपर्यंत मर्यादित न राहता कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनाही इस्राईलमधील संशोधन संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनाची संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही वर्षांत इस्राईलमधील संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होत आहे.

भारतीय खंडाचा विचार केला, तर येथील शेतीमध्ये प्रचंड जैवविविधता आहे. वेगवेगळे हवामान विभाग, जमिनीचा प्रकार, पिकांच्या जातींची विविधता आहे. त्याचबरोबरीने इस्राईलपेक्षा लागवड क्षेत्रही मोठे आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत हीच एक मोठी बाजारपेठ आहे. निर्यातीचा विचार करायचा झाला, तर आखाती देश, पूर्व आशियाई देशांची बाजारपेठेमध्ये भारतीय शेती उत्पादनांना चांगली संधी आहे. दोन्ही देशांची बलस्थाने लक्षात घेता सहकार्याच्या माध्यमातून दोन्ही देशांना येत्या काळात चांगली संधी आहे. पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने क्षारपड जमीन विकास, पाण्याचा पुनर्वापर, पीक उत्पादकता वाढीच्या दृष्टीने विद्राव्य खतांचा वापर, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब ही काळाची गरज आहे.

येत्या काळात भारतातील शेतमालाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी भाजीपाला आणि फळांच्या दर्जेदार उत्पादनाच्या दृष्टीने कीड-रोगमुक्त रोपवाटिकांचा विकास, हरितगृहातील शेती, फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी काटेकोर पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड-रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, छाटणी तंत्राचा अवलंब, हवामान बदलामध्येही टिकणाऱ्या आणि अधिक उत्पादनक्षम जातींची निर्मिती, संकरित बियाणेनिर्मिती याबरोबरच फळबागांसाठी योग्य खुंटाच्या निवडीबाबत संशोधनाला गती द्यावी लागणार आहे. काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाचा अवलंब ही भारतासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. या तंत्रज्ञानातून शेतमालाचे होणारे नुकसान कमी होईल, शेतमालाच्या साठवणुकीचा कालावधी वाढेल, ताजे आणि गुणवत्तापूर्ण अन्न ग्राहकांना मिळेल. या दृष्टीने भारतातील कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

इस्राईल सरकारतर्फे सकल राष्ट्रीय उत्पनापैकी ४.८ टक्के रक्कम ही नवसंशोधन आणि विकासासाठी खर्च केली जाते. नावीन्यपूर्ण संशोधनाबाबत इस्राईल आघाडीवर आहे. शेतीचा विचार करताना पीक उत्पादकता वाढ ही महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने दर्जेदार बियाणे, खते आणि पाण्याचा काटेकोर वापर, एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापनावर भर असायलाच हवा. त्यासाठी दर्जेदार आणि सर्वोत्तम पायाभूत सुविधा आम्ही विकसित केल्या. उदाहरण द्यायचे झालेच तर इस्राईलमधील तज्ज्ञांनी चेरी टोमॅटो, घट्ट गर असलेल्या टोमॅटोच्या जाती विकसित केल्या. वाळवंटी प्रदेशातही दर्जेदार उत्पादन देणाऱ्या रंगीत ढोबळी मिरची, स्ट्रॉबेरीच्या जाती विकसित झाल्या. या जाती इतर देशांतील हंगामाच्या अगोदर तयार होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध पर्याय उपलब्ध झाले. या नवसंशोधनामुळेच युरोपची बाजारपेठ इस्रायली शेतकऱ्यांनी मिळविली आहे.

इस्राईलमधील कृषी विकासाचे महत्त्वाचे कारण म्हणजे कृषी संशोधन आणि विकास संस्था, प्रयोगशील शेतकरी, कृषी उद्योग समूह आणि कृषी विस्तार यंत्रणांच्या मध्ये सहकार्य करार झाले आहेत. या करारांच्या माध्यमातून इस्रायलच्या शेतीला एक नवी दिशा मिळालेली आहे. उत्पादित शेतमालावर जास्तीत जास्त प्रक्रिया करून पुढे होणारे नुकसान कमी केले जाते. पूर्णतः व्यावसायिक आणि शास्त्रीय दृष्टीनेच इस्रायलचा शेतकरी शेती करतो.

भारत आणि इस्राईलमधील साम्य म्हणजे दोन्ही देशांना प्राचीन संस्कृती आहे. त्याचबरोबर पुढारलेली लोकशाही व्यवस्थाही आहे. दोन्ही देशांना जैवविविधता, सहनशीलता आणि उद्योगशीलतेचा इतिहास आहे. यामुळेच दोन्ही देशांमधील लोकांच्या मध्ये सहकार्याची भावना आहे. हेच नैसर्गिक बंध दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक घट्ट करण्यास मदत करताहेत.
(लेखिका मुंबईस्थित इस्राईलच्या वाणिज्य दुतावासामध्ये वाणिज्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate