অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सावरा गाव - कंपोष्ट खत

सावरा गाव - कंपोष्ट खत

अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यात सावरा गाव आहे. यावर्षी पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सावरा गावाची निवड झाली, गावातील ग्राम पशुपालक मंडळाच्या सहभागाने गावात 165 शेणखत उर्किडयाचे बेड तयार करण्यात आले आहे. यातून सुमारे 22 लाख रुपयांच्या बायोडायनॅमिक कंपोष्ट खताची निर्मीती झाली आहे या उपक्रमामुळे गावात उर्किडे राहली नसुन गांव स्वच्छ व सुंदर झाले आहे. ही एक मोठी उपलब्धी असून ‘गाव करी ते राव न करी’ ही म्हण ख-या अर्थाने सार्थक झाली आहे.

सावरा हे एक सधन गांव म्हणून ओळखले जाते. या लहानशा गावांतील मुलांनी अमेरीका, इंग्लंड सारख्या देशात नावलौकीक मिळवला आहे.अशा या गावची पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सावरा गावाची निवड झाली. पशुसंवर्धन आयुक्त एकनाथराव डवले यांच्या दुरदर्शी संकल्पनेतून या योजनेची सुरुवात 2012-13 मध्ये झाली. अकोला जिल्हयात या योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी सुरु असून योजनेतील उपाय योजनांचे महत्व पशु पालकांना आता समजू लागले आहे. ग्राम पशुपालक मंडळानेही यात अत्यंत हिरिरीने सहभाग घेतला आहे.

गुरांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच शेत-जमिनीच्या सुपिकतेसाठी जनावरांच्या वाया जाणा-या शेण-मलमुञाचे नियोजन म्हणजेच बायोडानॅमिक कंपोष्ट हा कार्यक्रम सर्वाना आकर्षित करु लागला आहे. सावरा गावच्या सरपंच सौ. सुचीताताई राजेंद्र सपकाळ आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पुंडकर यांनी याकामी अथक परिश्रम घेतल्यामुळेच आज या गावात घरोघरी आणि शेतात सुध्दा शेणखत उकीडर्याचे बायोडायनॅमिक पध्दतीने कंपोष्ट तयार झाले आहे.

नुकतेच सावरा येथे शेतकरी प्रशिक्षण आयोजन केले. त्यात उपस्थित शेतकरी, पशुपालकांना वाळलेले शेणखत,त्यातील सोयाबीनचे वाळलेले काड,तणांचे बी आणि हरवलेली गुणवत्ता यांच्या पासून होणारे नुकसान समजावून सांगितले. शेणखत  40-45 दिवसात बायोडायनॅमिक पध्दतीने दर्जेदार कंपोष्ट करण्याचे प्रशिक्षण गावांतच देण्यात आले. यासाठी प्रशिक्षणापूर्वी 5दिवस अगोदरपासुन 10 शेणखत ढिगांना व्यवस्थित 15 फुट लांब, 5 फुट रुंद आणि 4 फुट उंचीचा आकार देऊन 6-7 वेळा हलके हलके ओले करण्यात आले. कार्यक्रमाच्या दिवशी एस-9 हे बायोडायनॅमिक कल्चर प्रत्येकी ढिगासाठी 1 किलो 13लिटर पाण्यात एक तास घोळूनढिगांवर एक-एक फुट अंतरावर 1 फुट खोल छिद्र करुन टाकण्यात आले आणि शेण काल्याने ढिग लिपून घेतले.

पशुपालक मंडळाने साधारण: 15 दिवसानंतर कुतूहल म्हणुन हे ढिग थोडे उकरुन पाहले असता उकीडर्याचे रुपांतर कंपोष्ट मध्ये होत असल्याचा बदल त्यांना दिसला आणि येथून मग बायोडायनॅमिक कंपोष्ट तयार करण्याची स्पर्धाच सुरु झाली. शेणखत उर्किडे ओले करण्यासाठी वेळप्रसंगी पाणी देण्याचे सहकार्य सौ. सुचीताताई सपकाळ या करत आहेत.

" हा मोठा बदल कामधेनू योजनेमुळे घडला आहे. आता प्रत्येक पशुपालकाकडे शेणखत उकीर्डा लिपून तयार आहे. अहो मी सुध्दा बायोडायनॅमिक कंपोष्ट केले आहे . अहो माझे पाच डेपो लागले. आणि मी तर तयार झालेले खत भाजीपाल्यासाठी वापरले सुध्दा. बायोडायनॅमिक कंपोष्ट करणे तर फारच सोपे आहे. याला वेळही फार कमी लागतो आणि एका ढिगासाठी आणलेले 1 किलो एस-9 तर सर्वात् स्वस्त आहे. "

या बोलक्या प्रतिक्रिया दररोज ऐकावयास मिळतात सावरा गावच्या सरपंच सौ. सुचीताताई सपकाळ यांना. ग्रामस्वच्छता आणि अशा प्रकारचे खत हे दुहेरी यश पाहून सपकाळ यांना फार समाधान वाटते. कोणतेही विशेष अभियान नसतांना या योजनेमुळे हे गाव अती सुंदर झाल्याचे ते सांगतात .

या गावात या योजनेच्या सहभागातून साकारलेल्या उकीर्डा बायोडायनॅमिक कंपोषटचे आर्थिक मुल्य समजून घ्यावे लागेल. आतापर्यत 70 शेतक-यांनी शेणखत उकीडर्याचे 164 डेपो तयार केले.एका डेपोतून 1 मेट्रीक टन म्हणजे 10 क्विंटल खत तयार होत आहे. अर्थात यातुन 40 किलो वजनाचे 25 पोते होत आहेत. बाजारातील सेंद्रीय खताचे भाव 500 रुपये ते 900 रुपये पोते पर्यत आहेत.

164 डेपोमधून 500 रुपये पोते या भावाप्रमाणे आतापर्यंत 20 लाख 50 हजार रुपये किंमतीचे खत आज त्यांच्या घरी तयार आहे. आणि हे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरुच आहे. वाढलेल्या रासायनिक खतांच्या किंमतीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतक-यांना उकीडर्याचे महत्व समजले आहे त्यातून ग्रामस्वच्छता, रोगराईला प्रतिबंध आणि शेतजमीनीच्या सुपीकतेसाठी भक्कम आधार या कामधेनू योजनेतून मिळला आहे.

या पध्दतीने पुढाकार घेणारे सावरा हे गांव विदर्भातील पहिले गांव आहे. म्हणूनच परिसरातील गावकरी हे काम पाहण्यासाठी येथे भेट देत आहेत. डॉ. सलीम जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी जि.प. अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कामधेनु दत्तक ग्राम योजनेला या गावांत आता लोक चळवळीचे स्वरुप आले आहे. सौ. सरलाताई सपकाळ उपसभापती पंचायत समिती अकोट, श्री गजानन पुंडकर सदस्य जि.प., पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि गावांतील सर्व शेतकरी यांच्या सहभागामुळे आज सावरा गांव सर्वात पुढे गेले आहे.

येथील उत्साही शेतक-यांशी संपर्क करुन गांव इतर शेतकरी सुध्दा जाणून घेऊ शकतो की, कसा घडला हा बदल ?चला तर मग सावरा गांव अपल्या भेटीच्या प्रतिक्षेत आहे!


लेखक :
नितीन डोंगरे, अकोला

स्त्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate