অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जिरायतीकडून बागायतीकडे

जिरायतीकडून बागायतीकडे

ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन 472 विहिरींची पाणी पातळी उंचावली

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्‍यातील लोणारवाडी, भाटवाडी, वडगाव, बेलांबा सिन्नर आणि टेंभुरवाडी ही पाच गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत राहिली. सिन्नरच्या युवामित्र संस्थेच्या प्रयत्नांतून या भागातील देव नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारे व त्यावरील पाटपाण्याची व्यवस्था पुनरुज्जीवित झाली आहे. परिणामी, ही गावे बारमाही पिकांची झाली आहेत. त्यातूनच आधुनिक शेतीचे विविध प्रयोग उभे राहिले आहेत.

दुष्काळ हटविण्याच्या प्रयत्नांना यश

 • देव नदीवर एकूण 20 बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन प्रस्थापित
 • आतापर्यंत पाच बंधाऱ्यांची कामे पूर्ण
 • येत्या दोन वर्षांत उर्वरित बंधारे पूर्ण करण्याचे नियोजन
 • कार्यक्रमांतर्गत परिसरात 15 एकरांवरून 500 एकरांवर ठिबक सिंचन
 • 917 हेक्‍टर प्रत्यक्ष व 1200 हेक्‍टर अप्रत्यक्ष अशी 2117 हेक्‍टरपर्यंत सिंचनवाढ
 • रब्बी हंगामात शेतीची शाश्‍वती तयार झाली.
 • उन्हाळ्यात जनावरांसाठी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय झाली.
 • पीक पद्धती बदलली
 • 22 शेडनेट हाऊस उभी राहिली.
 • परदेशी भाजीपाला पिकवण्यास प्रारंभ
 • टॅंकरपासून मुक्तता
 • सिन्नरमधून वाहणारी एकमात्र देव नदी या तालुक्‍याची जीवनवाहिनी आहे. तिचा उगम सिन्नरपासून 26 किलोमीटरवर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेवरील औंढेपट्टा या डोंगररांगेतील धोंडबार या गावातून होतो.
  पाणी आले; पीक पद्धती बदलली!

  देव नदीवरील पाटांच्या आणि पाटसारण्यांच्या पुनर्जीवनामुळे गेल्या वर्षी 2013 मध्ये वडगावच्या 95 विहिरींपैकी 80, भाटवाडीतील 77 पैकी 65, लोणारवाडीच्या 170 विहिरींपैकी 114 व सिन्नर बेलांबे पाटाखालील 130 विहिरींपैकी 106 विहिरी चार दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच पाण्याने काठोकाठ भरल्या. परिणामी, भाटवाडी, वडगाव, सिन्नर व लोणारवाडी गावांतील 750 हेक्‍टर क्षेत्र कितीतरी वर्षांनी पहिल्यांदाच भिजले गेले. मागील वर्षी देव नदी नेहमीप्रमाणे नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच कोरडी झाली, परंतू बंधाऱ्यांचे पाणी पाटाच्या माध्यमातून भाटवाडी व वडगावच्या शिवारात फिरल्याने फेब्रुवारी 2014 पर्यंत या गावांतील विहिरी भरलेल्या राहिल्या. असा चमत्कार तब्बल 39 वर्षांनी इथल्या लोकांना पाहायला मिळाला. डिसेंबरमध्ये कोरड्या पडणाऱ्या विहिरींमध्ये जून महिन्यातही पाणी होते.

  देव नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारे व त्यावरील पाटपाण्याची व्यवस्था पुनरुज्जीवित केली. त्यामुळे लोणारवाडी, भाटवाडी, वडगाव, बेलांबा शिवार, सिन्नर व म्हाळुंगी नदीवरील टेंभुरवाडी या गावांना पुन्हा पाणी मिळू लागले. त्यातूनच शाश्‍वत व आधुनिक शेतीचे विविध प्रयोग उभे राहिले. सन 2009-10 मध्ये वडगाव आणि भाटवाडी या पहिल्या दोन गावांचे बंधाऱ्यांचे काम केले. त्यांना पाण्याची शाश्‍वती येऊ लागली. वडगावला मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर 11 ट्रॅक्‍टर शेतकऱ्यांनी खरेदी केले. विशेष म्हणजे सर्व शेतकरी पाच एकरांच्या आतील क्षेत्र असलेले आहेत. शेतकऱ्यांनी देव नदी व्हॅली ऍग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली.

  जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनाची शोधयात्रा!

  युवामित्र संस्थेने स्थानिक लोकांचा आर्थिक मागासलेपणा व नाहीशा होत चाललेल्या जैव विविधतेच्या विनाशाचे कारण शोधून काढण्यासाठी 2007 मध्ये शोधयात्रेचे आयोजन केले होते. त्यात विविध गावांतून 40 युवक सहभागी झाले होते. या अभ्यासात देव नदीवरील बंधाऱ्यांवर आधारित सिंचन व्यवस्थेचा उलगडा झाला. मोडकळीस आलेली देव नदीवरील सिंचन व्यवस्था आणि परंपरागत पाणीवाटप व व्यवस्थापनामध्ये लोकसहभागाचा अभाव, या समस्या पुढे आल्या. त्यानंतर स्थानिक जलव्यवस्थापन व्यवस्थेचे लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याचे ठरवून कामास सुरवात झाली.

  ..आणि काम सुरू झाले

  सन 2009 मध्ये एक पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला. सर दोराबजी टाटा ट्रस्ट, मुंबई, यांच्यामार्फत अर्थसाह्य मिळाले. वडगाव व भाटवाडीतील लोकसहभागातून एप्रिल 2011 मध्ये कामांची अंमलबजावणी सुरू झाली. सन 2008 मध्ये "युवामित्र'ने सुरवातीला तीन गावांत बंधारे, पाट व पाटचाऱ्या दुरुस्त करण्याची योजना बनवली. त्यासाठी या गावांतील जुन्या जाणत्या मंडळींबरोबरच बैठका झाल्या. वृद्ध, अनुभवी व्यक्तीही पूर्वीच्या कामांची दुरुस्ती व सफाईसाठी तयार झाले. जिथे माती साचली होती, त्या ठिकाणी खोदाई यंत्र, ट्रॅक्‍टर व फावडे वापरून जुन्या पाटाची रचना सुरक्षित ठेवून माती काढण्यास सुरवात केली. या पहिल्या टप्प्यात वडगावचा तीन किलोमीटरचा आणि भाटवाडीचा 3.2 किलोमीटरचा पाट दुरुस्त केला गेला. पाटाची गळती, तुटफूट दुरुस्त केली.

  सन 2009 च्या पावसाळ्यात पाटातून पाणी फिरले व विहिरींची पाणी पातळी वाढण्यास सुरवात झाली. नोव्हेंबर -डिसेंबरला संपणारे विहिरीचे पाणी एप्रिल-मेपर्यंत टिकू लागले. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला. जलसिंचनाची ही व्यवस्था बघण्यासाठी व तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी वडगाव व भाटवाडी गावांतील शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्था स्थापन केल्या. वेळोवेळी पाणीवापर संस्थांच्या क्षमतावृद्धीसाठी प्रशिक्षण, बैठका यांचेही आयोजन झाले. मागील दोन वर्षांपासून दोन्ही गावांतील बंधारे, पाट व पाणीवाटप व्यवस्थापन या पाणीवापर संस्थांकडून केले जात आहे.

  श्री. पोटे म्हणाले की ब्रिटिशांनी बांधलेल्या या बंधाऱ्यांचे वैशिष्ट्य असे आहे, की त्यांच्या आजूबाजूला वाहणारे छोटे छोटे ओहळ, नाले या बंधाऱ्यांना येऊन मिळतात. त्यामुळे बंधाऱ्यांचे स्वत:चे पाणलोट क्षेत्र आहे. पाटातून शेताला मिळणारे पाणी संपूर्ण क्षेत्र भिजवत पुन्हा नदीलाच जाऊन मिळते. त्यामुळे पाणी कुठे वाया जात नाही. युवामित्रच्या पुढाकाराने झालेल्या दुरुस्तींच्या कामात प्रत्येक पाट-पोटचाऱ्या, पाट सारणी दुरुस्त केल्या. अशा प्रकारच्या परिपूर्ण नियोजनामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळण्यास मदत झाली.

  लोकसहभागातून पाणी नियोजन

  सद्यःस्थितीत ब्रिटिशांनी विकसित केलेल्या पाणीवाटपाच्या धोरणामध्ये आवश्‍यक ते बदल करून पाणीवाटप केले जाते. त्याचबरोबर त्यांनी बनविलेल्या पाणीवाटपाच्या नियमांचे पालन पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून केले जाते. कोणीही शेतकरी पाण्याची चोरी करीत नाही. सगळ्यांना आपल्या वाट्याचे पाणी मिळते. अशा प्रकारे लोकसहभागावर आधारलेली पाणीवाटप आणि पाणी व्यवस्थापनाची पारंपरिक व्यवस्था पुनरुज्जीवित झाली आहे.

  गावकरी या व्यवस्थेच्या देखभालीचे काम करतात. पाणीवापर संस्थेचे नियम बनविताना कुणीही पाण्याचा दुरुपयोग करणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे. आज सिंचनाच्या या धोरणामुळे पाचही गावांची मिळून सुमारे 1525.90 हेक्‍टर जमीन सिंचित होत आहे. 472 विहिरींची पाण्याची पातळी राखली जात आहे. स्थानिक महिला शेतकऱ्यांनी 237 प्लॉट तयार केलेले आहेत. पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी 725 एकरांवर ठिबक सिंचन केले आहे.


  संपर्क : सुनील पोटे - 9422942799

  स्त्रोत: अग्रोवन



  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate