অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधारित तंत्रातून पानमळा

सातारा जिल्ह्यातील आर्वी (ता. कोरेगाव) गाव जुनवाण पानाच्या अरब देशातील निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील भगवान दत्तू रेवते यांनी आपली मुले संतोष व बाळकृष्ण यांच्या मदतीने सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे पानमळा शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे.
रेवते कुटुंबीयांची विहीर बागायत असलेली सुमारे 14 एकर शेती. आले, पानमळा, हळद, ऊस व डाळिंब ही त्यांची पीकपद्धती. सन 2005 पूर्वी ते कोरडवाहू पिके घ्यायचे. पुढे जमिनीचे सपाटीकरण टप्प्याटप्प्याने केले. त्या वेळी एकरी 700 ते 800 ट्रेलर तलावातील गाळाच्या मातीचा वापरही केला. जमीन दुरुस्ती सुरू असताना एका एकरात आले घेतले. पुढे दीड एकरातील याच पिकातून सलग दोन वर्षे चांगले उत्पन्न कमावले. त्या उत्पन्नातून जमिनीचे सपाटीकरण पूर्ण करीत आणले. 

पानवेलीची शेती

रेवते यांची 25 गुंठे क्षेत्रावर पानवेलीची शेती आहे. कपुरी जातीच्या पानाची लागवड जुलै 2009 मध्ये केली आहे. लागवडीवेळी मिरजवाडी (जि. सांगली) येथील चालू पानमळ्यातून सहा रुपये प्रति शेंडा (रोप) याप्रमाणे दोन हजार 600 शेंडे विकत आणले. पाच ते सहा कांड्या असणारा शेंडा लागवडीसाठी निवडला. साडेचार फुटाचे सारे सोडून सरीच्या वरंब्यालगत दोन रोपांतील (शेंड्यातील) अंतर दोन फूट ठेवून लागवड केली. पानवेल घेण्यापूर्वी कमी खर्चिक शेती पद्धतीवर आधारित ऊस व आले घेतले. आल्याचे एकरी 20 टन व उसाचे 35 ते 40 टन उत्पादन घेण्यात त्यांना यश आले. या प्रयोगावेळी गांडूळ खत व जीवामृताचा अधिक वापर केला. 
25 गुंठ्यांतील पानवेल लागवडीपूर्वी एकरी सात ते आठ ट्रेलर शेणखत विस्कटून शेताची उभी व आडवी नांगरट केली. लागवडीआधी बेवडासाठी तागाचे पीक घेतले. ते पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पुन्हा शेताची मशागत केली. पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. पारंपरिक पद्धतीने प्रति गुंठ्यास 250 रोपांची लागवड करण्याऐवजी गुंठ्यास शंभर रोपांची लागवड केली. त्यामुळे बियाणे बचत होऊन पिकाची वाढही चांगल्या प्रकारे होण्यास मदत झाली. वर्षातून दोन वेळा शेणखताचा वापर केला जातो. 
जानेवारी किंवा फेब्रुवारीत लावणीच्या विरुद्ध बाजूस वरंबा पद्धतीने एकरी आठ ते 10 ट्रेलर शेणखत व एकरी 12 ते 14 ट्रेलर मातीचा वापर केला जातो. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रमाण तेच ठेवून खत व माती वेलाच्या पुढील बाजूस देतात. एप्रिल ते जूनच्या दरम्यान पानाचा खुडा करून वेलांची उतरण केल्यानंतर साधारण दर पंधरा दिवसांनी शेंगदाणा पेंड, ओले शेण व गोमूत्र स्लरीचा वापर होतो. 
पानवेलीला रासायनिक खतांचा वापर टाळला जातो. मूळ कुजव्या, सूत्रकृमी, लाल कोळी, गोगलगाय, करपा आदी किडी-रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. यासाठी ट्रायकोडर्मा, गोमूत्र, कडूनिंबावर आधारित कीटकनाशक व काही प्रमाणात रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्या घेतात. उन्हाळ्यात दर सहाव्या दिवशी चार तास ठिबक सुरू ठेवून व आठ ते दहा दिवसांनी सोडपाण्याने पाणी देतात. रेवते यांनी पानवेल शेतीतील अधिकचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शेतकरी सहलीद्वारे सांगली जिल्ह्यातील नरवाड, बेडग येथील पानमळा शेतीतील बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. यामध्ये "आत्मा' योजनेचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णराव धुमाळ, तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, मंडल कृषी अधिकारी आनंदराव घाडगे, कृषी सहायक सतीश रणपिसे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

उत्पादन

पानमळा शेती प्रचंड कष्टाची व किचकट आहे. पाने तोडणारा प्रशिक्षित मजूरही सध्या दुर्मिळ झाल्याने ही शेती अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहे. परंतु प्रयत्नातील सातत्य, कृषी विभागाचे साह्य, कृषी विद्यापीठाच्या सान्निध्यात राहिल्याने रेवते त्यांच्या शेतावर शास्त्रज्ञांच्या प्रक्षेत्र भेटी घडल्या. त्याद्वारे झालेल्या चर्चासत्रांचा फायदा उत्पादनवाढीसाठी करता आला. लागवड केलेल्या वर्षी 25 गुंठ्यांतून 25 हजारांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी 12 हजार पानांचा प्रति डाग याप्रमाणे 64 डागांचे उत्पादन मिळाले. आठवड्यातून दोन तोडे याप्रमाणे दोन ते अडीच महिने तोडे चालले. सुरवात प्रति डाग पाच हजार रुपयांपासून शेवटी 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. प्रति डाग सरासरी आठ हजार रुपये दर पकडता पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

विक्री व उत्पन्न

खते, कीडनाशके, मजुरी, वाहतूक, भाडे व मध्यस्थी याकामी एकरी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो. हा खर्च पानांच्या उतरणीपासून सहा महिन्यांच्या कालावधीत निघणाऱ्या तळावरील पानांच्या उत्पन्नातून कमी होऊ शकतो. पूर्वी (पारंपरिक) पद्धतीनुसार जूनपर्यंत पानांची उतरण केली जायची. सुधारित पद्धतीत लवकर उतरण केल्यामुळे तळावरील पाने लवकर विक्रीस उपलब्ध झाली. एकलांगी लागवड पद्धतीत जमिनीपासून पाच फुटांपर्यंत चार ते पाच महिन्यांतील कालावधीत निघालेल्या तळावरील पानांच्या खुड्यातून एकरी 150 डागांपर्यंत उत्पादन मिळते. या पानाला जुनवाण पानापेक्षा पंचवीस टक्के कमी दर मिळतो. सन 2012 मध्ये जुनवाण पानांचे 72 डाग उत्पादन मिळाले. त्यातील फाफडा पानास 10 हजार रुपये व कळीच्या पानास आठ हजार रुपयांप्रमाणे प्रति डाग दर मिळाला. या वर्षीच्या हंगामात 62 डागांचे उत्पादन मिळाले. त्यास चार हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत प्रति डाग दर मिळाला. मालाची विक्री जागेवरून श्रीरामपूर व नाशिक येथे केली. जमीन सुधारणा, ठिबक व तुषार सिंचन, मार्केटिंग आदी गोष्टींसाठी रेवते व त्यांची मुले विशेष परिश्रम घेतात. 
पानांसाठी जवळपास बाजारपेठ नाही. वाहतूक व मध्यस्थी जास्त असल्याने नफ्याचे मार्जिन वाढविण्यासाठी रेवते उत्पादनवाढीवर अधिक भर देतात. सुधारित शेती पद्धतीमुळे चांगल्या गुणवत्तेचा माल तयार करणे शक्‍य झाल्याने दरही चांगले मिळाले. मे महिन्यापासून 15 जुलैअखेर बाजारपेठेत पानाला उच्चांकी दर मिळतात. परंतु त्या कालावधीत पानाची गुणवत्ता टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पानांची गुणवत्ता टिकवण्यासाठी रासायनिकतेऐवजी सेंद्रिय खतांचा वापर आवश्‍यक आहे. या वर्षी स्थानिक व्यापाऱ्यांकडून विक्री व्यवस्थेसाठी सहकार्य न मिळाल्याने त्यांनी स्वतः मार्केटिंग सुरू केले आहे. 

आर्वीच्या जुनवाण पानाची परदेशात ख्याती...

आर्वी गावातील पानवेल शेतीत पान उतरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वेलीवर पान टिकून राहते. तोडणीपासून ते कमीत कमी दोन महिन्यांपर्यंत पिकवून टिकवले जाते. त्या पानास विशिष्ट तुरट चव मिळते. त्यामुळे सुमारे 14 महिने टिकणाऱ्या आर्वीतील जुनवाण पानाला अरब देशात खूप मागणी आहे. या पानाची गुजरातमधील राजकोट व जामनगर मार्गे निर्यात होते. 

संतोष रेवते, 8806464501

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate