অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधारित लागवड तंत्रामुळे वाढले वाटाण्याचे उत्पादन

50 शेतकऱ्यांना झाला लाभ एकरी दोन टन उत्पादन पोचले तीन ते साडेचार टनांपर्यंत मिळाला किलोला 80 रुपये दर

सातारा जिल्ह्यात मांढरदेवी पठारावरील वेळूली, डुईचीवाडी, बालेघर या गावांतील वाटाणा उत्पादकांसाठी कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत सुधारित वाणासाह तंत्रज्ञान, प्रशिक्षण पुरवण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढ मिळालीच शिवाय वाटाण्याचा दर्जाही चांगला असल्याने दरही चांगला मिळाला. पुढील वर्षी याच पद्धतीने वाटाण्याची शेती करण्याचा या शेतकऱ्यांचा मानस आहे.

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्‍यातील मांढरदेवी पठारावरील मांढरदेवी हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या या पठारावरील दुर्गम भागात वेळूली, डुईचीवाडी, बालेघर ही लहान-लहान गावे आहेत. शेती असूनही पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे या गावातील अनेक जण कामाच्या निमित्ताने मुंबई, पुणे येथे नोकरी-व्यवसायासाठी जातात. काही जण जिरायती शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खरिपात वाटाणा, बटाटा, भात, गहू, स्ट्रॉबेरी ही पिके येथे होतात.

वाटाण्याची सुधारित शेती

मांढरदेवी पठार परिसरातील वेळूली, डुईचीवाडी, बालेघर ही गावे वाटाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीचे अरकलसारखे वाण तसेच पारंपरिक लागवड पद्धतीचा वापर व्हायचा. एकूण दोन ते तीन तोडे व्हायचे. दाण्यांची संख्या तसेच उगवणक्षमता कमी होती. मर रोगाचे प्रमाणही अधिक होते. उत्पादन कमी मिळायचे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1260 मीटर उंचीवर असल्याने या पठारावर थंड वातावरण आहे. येथे सुधारित पद्धतीने वाटाण्याची शेती झाली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळेल, असे कृषी विभागाच्या "आत्मा' प्रकल्पाला वाटले. "आत्मा'चे (सातारा) संचालक गणेश घोरपडे, उपविभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. जी. बागल, तालुका कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महादेव माळी यांनी प्रकल्पाचे नियोजन केले.

सुधारित वाटाणा शेती प्रकल्पातील मुद्दे

  • प्रकल्पात संबंधित तीन गावांतील 50 शेतकरी निश्‍चित. 68 शेतकरी सहभागी झाले. प्रति शेतकरी 20 गुंठ्यांपासून ते एक एकरापर्यंत क्षेत्र राहिले. एकूण क्षेत्र सुमारे 50 एकरांपर्यंत राहिले.
  • एकरी 15 किलो याप्रमाणे सुधारित बियाणे (खासगी कंपनीचे) मोफत देण्यात आले.
  • शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन. पीकवाढीच्या अवस्थेनुसार तसेच खतांच्या मात्रांविषयी मार्गदर्शन.
  • उगवण चांगली व निरोगी होण्यासाठी बीजप्रक्रिया
  • लागवडीच्या टोकण पद्धतीवर व गादीवाफा पद्धतीवर भर.
  • किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर. कामगंध सापळे, यलो स्टिकी ट्रॅप या साधनांची आत्मा अंतर्गत मदत.

प्रातिनिधिक स्वरूपात अर्थशास्त्र

1) प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकरी सरासरी अडीच ते तीन टन, काहींना साडेतीन व साडेचार टनांपर्यंत उत्पादन मिळाले. पारंपरिक पद्धतीत हेच उत्पादन एक ते दोन टनांपर्यंत येते.

2) प्रति एकरी आलेला खर्च- एकूण 17 हजार 590 रु. 
(बियाणे, टॅक्‍ट्रर मेहनत, मजुरी, रासायनिक खत, बीजप्रक्रिया, कामगंध व चिकट सापळे, कीडनाशके, पॅकिंग पिशवी, वाहतूक असा एकूण) (बियाणे व अन्य काही निविष्ठा मोफत दिल्या असल्या तरी तो खर्च समाविष्ट केला आहे.) प्रति किलो बियाणे खर्च 230 रु. येतो.

मिळालेला दर

वाटाण्यास प्रति किलो 76 रुपयांपासून कमाल 80, 90 रुपये दर मिळाला. ज्या वेळी बाजारात आवक कमी होती त्या काळात हा दर 100 रुपयांपर्यंतही गेला. संबंधित गावांमधून मुंबईला गाड्या जात असल्याने त्या मार्केटला माल पाठवणे शक्‍य झाले.

व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी

मांढरादेवी पठार उंच असल्यामुळे या परिसरात थंड वातावरण असते. साहजिकच येथील वाटाणा चवदार असतो. हा वाटाणा गोड शिवाय त्याला चमकही चांगली आहे. अन्य बाजारातील आवक घटल्याने व्यापारी जागेवर येऊन हा वाटाणा खरेदी करू लागले. एका जागेवर अधिक माल उपलब्ध झाला. शेतकऱ्यांची वाहतूक, आडत, हमाली यासारख्या खर्चात बचत झाली. समक्ष जागेवर वजन करून सरासरी प्रति किलो 80 रुपयांचा दर मिळाला.

बोलक्‍या प्रतिक्रिया

प्रकल्पांतर्गत तीन गावांतील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे वाटाणा उत्पादनात वाढ झाली. पुढील वर्षी पारंपरिक पद्धती सोडून याच सुधारित पद्धतीचा वापर करणार असल्याचे शेतकरी समाधानाने सांगत आहेत. 
- महादेव माळी - 9403782581 
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक 
"आत्मा', वाई.

माझ्या पूर्वीच्या पॉलिहाउसमध्येच तीन किलो वाटाणा लागवडीचा प्रयोग केला. जवळपास साडेतीनशे किलो उत्पादन मिळाले. सुमारे दहा गुंठ्यांत 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. 
- दत्तात्रय जाधव, सरपंच वेळोली - 9881103396

पूर्वी एक एकर क्षेत्रात पाभरी पद्धतीने आम्ही बियाणे विस्कटून द्यायचो. त्या वेळी 40 किलो बियाणे लागायचे. यंदा टोकण पद्धतीने लागवड केल्यामुळे बियाण्याची बचत झाली. एकरी 15 किलोपर्यंत बियाणे लागले. एकरी दीड टनापर्यंत उत्पादन मिळाले. पूूर्वीच्या तुलनेत दुप्पट ते तीप्पट वाढ झाली. 
- सतीश मांढरे, वेळोली -9881668616.

गेल्या 25 वर्षांपासून वाटाणाचे पीक घेत आहे. पूर्वी वाटाण्याचे तीन ते जास्तीत जास्त चार तोडे व्हायचे. बियाण्यात बदल, सुधारित लागवडीमुळे सहा ते सातपर्यंत तोडे मिळाले. 
- हरिभाऊ मांढरे, बालेघर -9764083820

पूर्वी वाटाण्याच्या शेंगेत तीन ते चारपर्यंतच दाणे असायचे. सुधारित वाणातील शेंगेत सात ते आठपर्यंत दाण्यांची संख्या आहे. यामुळे वजनात वाढ झाली. 
- संजीवन मांढरे, वेळूली - 9637879874

20 गुंठे क्षेत्रात प्रशिक्षणात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार पीक व्यवस्थापन केले. किडींचा प्रादुर्भाव कमी झाला. फुलांची सख्या वाढल्यामुळे शेंगेच्या संख्येत वाढ होऊन तोडणी सोपी झाली. 
- आनंदा मांढरे, वेळूली - 9049577671.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate