অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केळी उत्पादन गुणवत्तेत सातत्य

जळगाव जिल्ह्यात गिरणा व तापी नदीच्या खोऱ्यातील सुपीक, गाळाच्या जमिनीत केळीची शेती होते. एरंडोल तालुक्‍यात गिरणा नदीच्या काठावर वसलेले दापोरी गाव त्याबाबतीत प्रसिद्ध आहे. गावातील मधुकर व विजय पाटील या दोन भावांनी वडिलोपार्जित केळीची शेती सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक समृद्ध केली आहे.

कुटुंबातील तरुण पिढीनेही तंत्रज्ञान आत्मसात करीत त्यात आणखी भर घातली आहे. पाटील बंधू आपल्या 60 एकरांपैकी सुमारे 40 एकरांवर दरवर्षी केळीचे पीक घेतात. बाजारभाव व लहरी हवामानाची जोखीम कमी करण्यासाठी दोन हंगामांत ते लागवडीचे नियोजन करतात. पूर्वी त्यांच्या वडिलांची दोन एकर शेती होती. ती सांभाळत ते बैलगाडीवरून सामग्री वाहतुकीचा व्यवसायही करायचे. मोठ्या कष्टातून त्यातून उत्पन्न जोडत ते नवी शेती जोडत गेले. पुढे त्यांच्या मुलांनीही केळी शेतीचा विस्तार केला.

दोन हंगामांत लागवड

पाटील बंधू मृग बहर (जून-जुलै लागवड) व कांदेबहर (सप्टेंबर-ऑक्‍टोबर लागवड) अशा दोन टप्प्यांत केळीची लागवड करतात. त्यांची जमीन काळी व भुरी अशा प्रकारांत आहे. हवामानानुसार जमिनीची निवड केल्यामुळे केळीची निरोगी जोपासना होऊन अपेक्षेनुसार उत्पादनापर्यंत पोचता येते, असा अनुभव पाटील बंधूंचा आहे.

केळीबागेची जोपासना...

  • दरवर्षी सुमारे 20 एकरांत मृग बहरात लागवड, कांदेबहराचे क्षेत्र सुमारे 15 एकर
  • लागवडीपूर्वी दरवर्षी एकरी आठ ते दहा चांगले कुजलेले शेणखत वापर.
  • गिरणा नदीवरील बंधारा कोरडा पडतो त्या वेळी त्यातील गाळ शेतात पसरवून घेतला जातो.
  • श्रीमंती व आंबेबहर जातींची लागवड, बेणे घरचेच वापरतात. त्यामुळे उतिसंवर्धित 12 रुपये प्रति रोप या हिशेबाने एकरी बेण्यावरील खर्च वाचतो. कांदेबहराचा प्लॉट संपल्यानंतर त्या प्लॉटमधील बियाणे मृगबहरासाठी उपयोगात येते.
  • एकरी सुमारे 1600 झाडांची लागवड.
  • सुमारे 60 एकरांवर ठिबक, त्यातून विद्राव्य खते. त्यामुळे घड चांगल्या प्रकारे पोसतात.

उत्पादन-उत्पन्न (अलीकडील वर्षांतील)

  • -मृग बहर- एकरी सुमारे 30 ते 35 टन
  • -कांदेबहर- 20 ते 25 टन
  • -प्रति घड रास- 30 ते 40 किलोपर्यंत
दर- अलीकडील वर्षांत केळीला किलोला पाच रुपयांपेक्षा कमी मिळाले नाहीत. सध्या 10 रुपये दर सुरू आहे. मागील वर्षी चांगला म्हणजे 13 ते 14 रुपये दर मिळाला. मृग बहरातील केळी रमजान, श्रावण, गणपती उत्सव, दसरा आदी काळात विक्रीस येतात. तर कांदेबहरातील केळींना दिवाळी व पुढील कालावधी मिळतो.

एकरी खर्च 50 हजार रुपयांपर्यंत मिळतो. खर्च वजा जाता बारा ते तेरा महिन्यांत एकरी एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. दोन रुपये प्रति खोड याप्रमाणे बेणे विक्री केली जाते. त्यातून 80 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळते. लागवड ते काढणीपर्यंतचा सर्व खर्च पाटील बंधू रजिस्टरमध्ये लिहून ठेवतात.

व्यापारी देतात जादा भाव...

जळगाव येथील व्यापारी पाटील बंधूंकडील केळ्यांचा एकसारखा आकार व उत्कृष्ट दर्जा बघून बाजारभावापेक्षा 10 रुपये जादा भाव क्विंटलमागे देतात. जळगाव स्थित जैन कंपनीलाही केळी दिली जातात.

करपा रोगाला रोखण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यात केळीत करपा रोगाची मोठी समस्या असते. पाटील बंधूंच्या बागेलाही त्याचा फटका बसला. त्यापासून धडा घेऊन आपल्या बागेत तो येऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय राबविण्यावर पाटील यांनी भर दिला. लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडणे, कार्बेन्डाझिमची त्यावर प्रक्रिया या गोष्टी आवर्जून केल्या जातात. वाढीच्या अवस्थेत बागेची स्वच्छता राखली जाते. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर होतो. हिवाळ्यात तापमानाचा पारा खाली आल्यानंतर बांधावर वाळलेली पाने जाळून बागेतील तापमान नियंत्रित ठेवले जाते. यामुळे बागेत काही वर्षांपासून करपा रोगाने डोके वर काढलेले नाही.

केळीनंतर कलिंगड

बरेच शेतकरी केळीनंतर रिकाम्या शेतात शक्‍यतो गहू घेतात. पाटील बंधू मात्र कमी कालावधीत जास्त नफा देणारे उन्हाळी कलिंगडाचे पीक सात-आठ एकरांत घेतात. केळीतील ठिबकचा त्यासाठी उपयोग होतो. एकरी 10 टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातून 40 हजार रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. गहू तसेच मका पिकाच्या तुलनेत कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेणे शक्‍य होते.

विशाल वाचतात इंटरनेटवर "ऍग्रोवन'

मधुकर पाटील यांची मुले विशाल व संदीप ही नवी पिढी सध्या शेतीची जबाबदारी पाहते आहे. विशालने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. या गावात एसटी बस येणेही अडचणीचे आहे, तर दैनिक कसे पोचणार? मात्र विशाल आपल्या मोबाईलद्वारे इंटरनेटवर कायम ऍग्रोवन वाचतात. त्यातील विविध माहितीचा ते उपयोग करून घेतात. दोन्ही मुलांच्या पुढाकारातून पाटील कुटुंबीयांनी शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने दापोरीलगतच्या शेतात "स्ट्रक्‍चर' उभारण्यास सुरवात झाली आहे. शेतीला मुबलक शेणखत व पूरक दुग्ध व्यवसायाची जोड मिळावी म्हणून आठ म्हशींचा गोठाही आहे. दररोज एकूण मिळणाऱ्या 20 लिटर दुधापासून 50 रुपये प्रति लिटर दराने सुमारे एक हजार रुपयांची कमाई होते. त्यातून घरखर्च भागविण्यात येतो.


संपर्क - 
विशाल पाटील, 9823134970 
विजय पाटील, 9372471916

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate