অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हरभरा पिकातून साधली प्रगती

हरभरा पिकातून साधली प्रगती
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील सानप कुटुंबीयांनी शिक्षण, नोकरीसह शेतीलाही महत्त्व देत त्यातून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. रब्बीमध्ये हरभरा हे पीक कायम ठेवत त्याची किफायतशीर शेती केली आहे.
मालेगाव तालुक्‍यातील (जि. वाशीम) ब्राह्मणवाडा येथील राजाराम सानप हे सेवानिवृत्त शिक्षक. त्यांची तीनही मुले उच्चशिक्षित. त्यापैकी थोरले सुरेश हे वाणिज्य पदवीधर. दुसऱ्या क्रमांकाचे सुभाष हे बीएएमएस तर तिसऱ्या क्रमांकाचे चंद्रकांत यांचे कृषी अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. सानप यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाचा विनियोग करीत ब्राह्मणवाडा शिवारात 25 एकर शेती खरेदी केली. त्यांचा मुलगा डॉ. सुभाष यांनी सुरवातीचे काही वर्ष रुग्णसेवा केली. त्यानंतर शेतीशी लळा लागल्याने वैद्यकीय सेवेऐवजी शेतीत नवनव्या प्रयोगासाठी पुढाकार घेतला. सन 1994 पासून त्यांनी शेतीत राबत पीक उत्पादकता वाढीचे प्रयत्न चालविले आहेत. 

वाशीम जिल्ह्याने विदर्भाला सोयाबीन या पिकाची ओळख करून दिली आहे. विदर्भात या पिकाखालील सर्वाधिक लागवड क्षेत्र या जिल्ह्यात आहे. सोयाबीनच्या जोडीलाच हरभरा पीक घेण्यावरही या भागातील शेतकऱ्यांचा भर राहतो. रब्बी हंगामात सरासरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हरभरा घेतला जातो. डॉ. सुभाष यांनी पाच वर्षांपासून या पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. सोयाबीनच्या तुलनेत या पिकापासून मिळणारी उत्पादकता व उत्पन्न किफायतशीर असल्याचे ते सांगतात. गेली पाच वर्षे त्यांनी प्रचलित पद्धतीने हरभरा घेतला. या वर्षी गादीवाफ्यावर लागवडीचा प्रयोग केला आहे. "जॉकी 9218, मेक्‍सिकन डॉलर, तसेच "पीकेव्ही-2' जातीचे वाण त्यांनी लावले होते. अनुक्रमे तीन एकर, तीन एकर व एक एकर याप्रमाणे सात एकर क्षेत्रावर लागवड असलेल्या या पिकाला पाणी देण्याकरिता ठिबकचा पर्याय अवलंबिण्यात आला. 

पिकाचे व्यवस्थापन

गादीवाफ्याची (बेड) उंची दीड फूट तर रुंदी दोन फूट आहे. बेडवर ठिबकचे लॅटरल प्रत्येकी पाच फुटांवर अंथरण्यात आले. प्रत्येक लॅटरलच्या आजूबाजूला एक-एक फूट अंतरावर तर एका ओळीत सहा इंच अंतर ठेवत टोकण पद्धतीने हरभरा लावला. त्यापूर्वी बेडवर एकरी पाच ट्रॉली शेणखत पसरविण्यात आले. शेणखताच्या मात्रेनंतर सुपर फॉस्फेट दोन बॅग, पोटॅश अर्धा बॅग याप्रमाणे एकरी मात्रा देण्यात आली. जॅकी 9218 वाणाचे बियाणे एकरी 13 किलो, पीकेव्ही-दोन एकरी अठरा किलो तर मेक्‍सिकन डॉलर वाणाचे 22 किलो याप्रमाणे बियाणे लागल्याचे त्यांनी सांगितले. 

व्यवस्थापनातील काही गोष्टी-

1) लागवडीपूर्वी बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकांच्या माध्यमातून बीजोपचार. 
2) पिकात पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ऍसिडचा वापर. 
3) पिकाला फुलधारणा सुरू झाल्यानंतर क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड वाढनियंत्रकाचा वापर. 
4) मुख्य अन्नद्रव्यांसह दुय्यम व सूक्ष्म मूल्यद्रव्यांच्या वापरावरही भर. 
5) पीक फुलावर आल्यानंतर बोरॉनचा वापर. यामुळे फुलगळ नियंत्रित केली. 
6) बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा योग्य वेळेत वापर. 
7) हरभरा लागवड या परिसरात प्रथमच ठिबक सिंचनावर केली. 
8) गादी वाफा केल्याने हवा खेळती राहत उत्पादकतावाढीचा पर्याय. 

पाणी देतात पिकाला...

सानप कुटुंबीयांची सामूहिक 25 एकर शेती. या शेतीची पाण्याची गरज भागविण्याकरिता विहीर, बोअरवेल व एक शेततळे असे पर्याय उपलब्ध आहेत. संरक्षित सिंचनाचा एक स्रोत भक्‍कम असावा याकरिता 2005 मध्ये 44 x 44 मीटर आकाराचे शेततळे घेतले आहे. पाच मीटर खोल या शेततळ्याची क्षमता एक कोटी लिटर पाणी साठवण्याची आहे. वाशीमचे तत्कालीन कृषी अधीक्षक डी. जी. बकवाड यांच्या कार्यकाळात त्यासाठी साडेचार लाख रुपयांचे अनुदान त्यांना प्राप्त झाले. पाण्याचे स्रोत भक्‍कम असल्याने तीन एकरांवर सीताफळाची लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर हळद, सोयाबीन, कपाशी आदी पिके आहेत. 25 एकरांपैकी 15 एकरांवर ठिबक, तर उर्वरित दहा एकरांवर तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. हरभरा पिकाला दर चार दिवसांनी पाणी देण्याचे नियोजन असते. त्याचवेळी पिकाला खताचा पुरवठा केला जातो. पिकाला फुलधारणा झाल्यानंतर ताण देत दर आठ दिवसांनी पाणी दिले जाते. बुरशीजन्य रोग तसेच घाटे अळीचा प्रादुर्भाव या पिकावर मुख्यत्वे होतो. कीड- रोगनियंत्रणाकरिता जैविक कीडनाशकांचा वापर केला जातो. 

पिकाचे अर्थशास्त्र

प्रचलित पद्धतीत हरभऱ्याची एकरी तीन ते चार क्‍विंटल उत्पादकता मिळायची. या वर्षी मात्र गादीवाफ्यावरील लागवड पद्धतीतून आठ ते नऊ क्‍विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. बाजारपेठेचा अंदाज घेत शेतीमाल विकण्यावर त्यांचा भर असतो. अनेक वर्षे त्यांनी अकोला बाजारपेठेत मालाची विक्री केली आहे. गेल्या वर्षी त्यांना 4200 रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. या वर्षी हरभऱ्याचे दर देशी वाणाला 3350 रुपये, तर काबुली वाणाला 4400 रुपये प्रति क्‍विंटलपर्यंत आहेत. बाजारात शेतीमाल विक्रीला नेण्यापूर्वी हरभरा उत्पादक, व्यापारी, आडते यांच्या संपर्कात राहत त्यांच्याकडून शेतीमालाचे दर जाणून घेण्याचा प्रयत्न सानप यांच्याकडून सातत्याने होतो. मार्केटिंगसाठी अशाप्रकारे चौकस असण्याची गरज ते व्यक्‍त करतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरभऱ्याचे दर कमी आहेत. परिणामी, हरभरा दरात तेजीच्या अपेक्षेने त्यांनी उत्पादित शेतीमाल शासकीय वेअरहाऊसमध्ये ठेवला आहे. नांगरटी व बेड तयार करण्यापासून ते बियाणे, लागवड, खते, पीक संरक्षण, पाणी, देखभाल आदी खर्च नऊ हजार रुपयांपर्यंत आला. एकरी सात क्‍विंटल उत्पादन व प्रति क्विंटल चार हजार रुपये दर अपेक्षित धरता एकरी 28 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या उत्पन्नातून खर्च वजा जाता 19 हजार रुपयांच्या घरात नफा मिळू शकेल.

...असे जाणले तंत्र

उत्तराखंड भागातील रायपूर तसेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्यानंतर सानप यांना गादीवाफ्यावरील लागवड पद्धतीची माहिती झाली. या पद्धतीमुळे जमीन भुसभुशीत राहते. पाण्याचा निचरा होतो. मुळे खोल जात पीक निरोगी राहते. सानप यांच्याबरोबर अभ्यास दौऱ्यात सहभागी असलेल्या डॉ. हेमंत देशमुख, अभिषेक मुंदडा, विवेक कचोलीया यांनीही प्रायोगिक तत्त्वावर हरभरा पिकाची गादी वाफ्यावर लागवड केली आहे. 

समस्या व उपाय

शेती क्षेत्रात सद्यःस्थितीत मजूर व वीज या दोन मुख्य समस्या असल्याचे सानप यांना वाटते. त्यावर उपाय म्हणून ठिबकद्वारे पाणी व खते देण्याचा पर्याय त्यांनी शोधला आहे. काबुली हरभऱ्याची गुणवत्ता पाहता या वर्षी पॅकिंग करून त्याच्या विक्रीचा विचार ते करीत आहेत. शेतीतील भांडवलाची तरतूद पीककर्ज व शेतीमाल विक्रीतून आलेल्या पैशाच्या बळावर ते करतात. वर्षभर याच पद्धतीने शेतीसाठी पैसा जोडण्यावर त्यांचा भर असतो. 

शेती व्यवसायातील धोके/जोखीम

बाजारपेठेत शेतीमालाच्या दरात होणारे चढ-उतार, निसर्गाचा लहरीपणा या अडचणी शेतीत आहेत. विदर्भासारख्या भागात सिंचन व्यवस्था वाढीस लागल्या, तर यातील निसर्गाचे लहरीपण यावर काही अंशी नियंत्रण मिळण्यास मदत होईल. परंतु शेतीमालाच्या दरातील चढ-उतारासंदर्भाने शासनाकडून सकारात्मक प्रयत्नांची गरज ते व्यक्‍त करतात. डॉ. सानप यांच्याकडे पूर्वी होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी आदी 35 गाई होत्या. मजुरांची पुरेशी उपलब्धता होत नसल्याने त्यांना हा व्यवसाय पुढे सुरू ठेवणे शक्‍य झालेले नाही. 

संपर्क 
डॉ. सुभाष सानप, 7588502292 
9423130859

 

माहिती संदर्भ :अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate