অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुष्काळातही बहरते डाळिंब

सव्वा लाख रुपयांचे पाणी वापरले पाचट आणि वस्त्रांचे आच्छादन

दूरदृष्टी व जिगर यांच्या बळावर लातूर जिल्ह्यातील नदीहत्तरगा येथील बाबासाहेब गायकवाड यांनी दुष्काळातही अत्यंत कसोशीने विविध प्रकारचे प्रयत्न करून डाळिंब बाग जगवली. त्यातून केवळ यंदाचे उत्पन्नच नव्हे, तर पुढील काही वर्षांचे उत्पन्नही संरक्षित केले. जिगर असेल तर सर्व काही शक्‍य होते, हेच त्यांनी या प्रयोगातून दाखवले आहे. 

कधी नाही ते चालू वर्षी मराठवाड्यात चव्वेचाळीस अंशांच्या वर तापमान गेलेले. सन 1972 च्या दुष्काळात अन्नधान्याचा तुटवडा होता; पण या वर्षी पाणी आणि चारा यांचा दुष्काळही मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागलेला. त्यात केवळ एकोणचाळीस तास पाऊस संपूर्ण हंगामात पडलेला. जमिनीत पाणी मुरायचे सोडाच, जेमतेम पिके जगतील एवढाच पाऊस पडल्याने कशीबशी पिके आली; पण कुठल्याच विहिरी, बोअरला पाणी फुटले नाही. त्यातच तापमानाचा पारा वाढल्याने पाण्याचे सगळे स्रोत कोरडे नाही पडले तरच नवल! हंगामी पिके कशीबशी हाती लागली; पण फळबागांचे काय? दहा ते वीस वर्षांच्या मोसंबी, संत्रा, आंबा, द्राक्ष, डाळिंबाच्या बागांना याचा फटका बसलेला, त्यांची मुळं खोलवर असल्याने वरून थोडे-थोडके पाणी देऊन भागणारे नव्हते.

जालना- बीड- उस्मानाबाद- लातुरातील बागा एवढे दिवस पोटच्या पोरावाणी शेतकऱ्यांनी जगवलेल्या. त्यांना डोळ्यांदेखत वाळताना पाहताना सगळी स्वप्नं शेतीत पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची घालमेल शब्दांत सांगणं मुश्‍कील! सुकलेल्या बागांवर कुऱ्हाड चालवायची पाळी येणं म्हणजे नरक यातना भोगण्याच्या पुढची पायरी. लातूर- उस्मानाबाद सीमेवर द्राक्षाचे माहेरघर असलेल्या किल्लारी परिसरातील बहुतांश द्राक्ष- डाळिंब बागा सततच्या अवर्षणामुळे तोडाव्या लागलेल्या. कमी पाण्यावर डाळिंब येतं म्हणून द्राक्ष उत्पादक डाळिंबाकडे वळले खरे; पण त्याही बागा जगवता न आल्याने सर्वत्र दुष्काळाच्या कधीही भरून न निघणाऱ्या पाऊलखुणा जागोजागी मन हेलावणाऱ्या होत्या.

ऐन जानेवारी- फेब्रुवारीत चालू बोअर कुठलीच पूर्वसूचना न देता काळाने झडप घालावी तसे बंद झालेले. कित्येकांनी हातातोंडाला आलेल्या बागा जगवण्यासाठी दूरवरून टॅंकरने पाणी आणून त्या जगवण्याचा प्रयत्न केला; पण तीन- चार महिने पाणी विकत घेणे एवढ्या मोठ्या क्षेत्राला परवडणारे थोडेच होते? अशांनी आपल्या बागांना बहर घेणे टाळले, काहींनी अर्धवट बहर सोडून दिला; पण काही जिद्दी शेतकरी दुष्काळातही निभावून नेणारे असतात. किल्लारीलगतच्या निलंगा तालुक्‍यातील नदीहत्तरगा येथील बाबासाहेब गायकवाड हे त्यातीलच एक. त्यांनी चार वर्षे वयाच्या दीड एकरांतील पाचशे झाडांच्या भगवा डाळिंब बागेला डिसेंबरमध्ये शेजाऱ्याच्या पाण्याच्या भरवशावर बहर धरला.

पुढे जुलैमधील "रमझान' सणाचा हंगाम त्यांना खुणावत होता. जेमतेम दीड- दोन महिने बोअरला पाणी राहिले अन्‌ मार्चमध्ये तो बंद पडला. शेजाऱ्याला पाण्याच्या बदल्यात एकरभर डाळिंब लावून ठिबक सिंचन करून दिले होते, त्याचेही पाणी गेले होते, त्यात त्या बिचाऱ्याची काय चूक. फळे तर लिंबाएवढी झालेली. प्रति झाड शंभरेक फळे ठेवलेली. ऊस उत्पादकाकडून पाच ट्रॅक्‍टरभर पाचट आणून बागेला मल्चिंग केलं. एकूण शेती अडीच एकर. त्यात एकरभर केळी व दीड एकर डाळिंब. एका कोपऱ्यात दीड हजार स्क्वेअर फुटात शेड, गोठा. वैरणीसाठी जागा अशी नाही. ती करायची तर झाडे तोडावी लागणार. शेताच्या मधून दहा फूट रुंदीची कॅनॉलची चारी गेलेली. तिथे काठ रुंद करून खोली वाढवून वीस बाय साठ फुटांचे प्लॅस्टिक पेपर अंथरूण 50 हजार लिटर पाणी थांबेल असे शेततळे उभारले.

एप्रिल, मे, जून असे अडीच महिने दररोज तीन टॅंकर प्रति 600 रुपये या भावाने विकत घेतले. त्याचे पाणी ठिबक सिंचनाद्वारे देणे चालू ठेवले मालाच्या पुढच्या भरवशावर इकडून- तिकडून पैशांची जुळवाजुळव केली. आतापर्यंत 210 टॅंकरद्वारे सव्वा लाख रुपयांचे पाणी विकत घेऊन बाबासाहेबांनी दुष्काळात बाग जगवली किंवा तसे म्हणण्यापेक्षा जिद्दीने हवे तसे उत्पादन घेण्याची जिद्द बाळगली. त्यांच्या कष्टाची फळे आज बागेत दिसू लागली आहेत.

आज प्रति झाड 80 ते 100 फळे लगडलेली आहेत. सुमारे 250 ते 300 ग्रॅम वजनाचे फळ प्रत्येक झाडावर तयार आहे. येत्या पंधरवड्यात माल काढणीला येईल. बागेत पहिला बहर लागवडीनंतर 18 महिन्यांनी धरला. त्याला चार टन, तर दुसऱ्या बहराला सहा टन माल बाबासाहेबांनी घेतला. आता येतोय तो तिसरा बहर. पाणी कमी असले तरी सुरवातीपासून बागेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे त्यांनी केले.

नियोजनातील काही गोष्टी - बहर धरण्यापूर्वी 10 दिवस शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा व डीपीए आदींचा वापर करून पाणी दिले. नवीन फुटींपूर्वी छाटलेल्या खोडावर बोर्डो मिश्रणाची फवारणी घेतली. फूट आल्यावर रोगांपासून संरक्षणासाठी कार्बेन्डाझिम, तर रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रिड फवारले. डाळिंब बागेत परागीभवनाला व पर्यायाने मधमाशीला फार महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे नेहमीच्या तुलनेत दीडपटीने फुले सेट होण्याचे प्रमाण वाढले. अर्थात हे करताना पिकावर रासायनिक कीडनाशकांच्या ऐवजी जैविक घटकांवर भर दिला, त्यामुळेच बागेत मधमाश्‍या मोठ्या प्रमाणात आल्याने परागीकरण सुलभ व वेळेवर झाले.

खत व्यवस्थापन - फळे लिंबाएवढी झाल्यावर त्यांची वाढ होण्यासाठी ठिबकमधून विद्राव्य खते 12ः61ः0, 19ः19ः19, 0ः52ः34, 13ः0ः45 व 0ः0ः50 ही गरजेनुसार दिली. माती परीक्षणाच्या अहवालानुसार गरजेप्रमाणे कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम सल्फेट व बोरॉन दिले. बाबासाहेबांकडे एक गाय, एक म्हैस व रेडकू आहे. झाडांची सशक्त वाढ व्हावी, तेलकट डाग किंवा अन्य रोगांना झाडे बळी पडू नयेत म्हणून जनावरांचे शेण व मूत्र, ट्रायकोडर्मा यांची स्लरी दिली. 
बागेच्या व्यवस्थापनासाठी डाळिंब बागायतदार राजेंद्र बिराजदार व ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी गुंडाप्पा बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे बाबासाहेब आवर्जून सांगतात.

पाचट, टॅंकर आणि साड्या व फेटेही

बागेत झाडे जगवताना अनेक प्रयास घ्यावे लागले. एप्रिल- मेमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने सुरवातीला प्रत्येक फळाला पेपर गुंडाळला; पण हे काम खर्चिक व वेळकाढू असल्याने व ते वाऱ्याने उडून जाणे व फाटणे असे प्रकार घडत असल्याने सुमारे 450 साड्या व स्वतःला विविध कार्यक्रमांतून आलेले 50 फेटे झाडांना सावलीसाठी बांधले, त्यामुळे फळांवर सावली राहिली, फळे तडकली नाहीत. या प्रयत्नातून बाष्पीभवन काही प्रमाणात रोखले गेले.

पुढे मोठ्या आकाराची, आकर्षक रंगांची फळे तयार झाली. आता एकूण बागेतून नऊ ते दहा टन माल मिळेल असा अंदाज आहे. सरासरी भाव 50 ते 60 रु. प्रति किलोप्रमाणे मिळाला आहे, त्यानुसार साडेचार लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. 

आतापर्यंतचा छाटणी, बहर धरणे, मजुरी, आच्छादन खर्च - (रुपये)

दूरदृष्टीपणा ठरला फायद्याचा

अंदाजे सव्वा लाख रुपयांचे पाणी विकत घेऊन बाग जगवली नसती तर उत्पन्न हातचे गेले असते. चार वर्षे वाढलेली बाग वाळल्याने तोडावी लागली असती. ती हानी पुढे काही वर्षे भरून निघाली नसती. पाचट असो की साड्यांचा वापर की टॅंकरचे पाणी असो, त्यासाठी एक लाख 37 हजार रुपये खर्च जास्त झाला असला तरी दीड एकरांतून उत्पन्न हाती येणार आहेच. शिवाय, बाग वाचून पुढचा बहर घेणे सोपे होणार आहे. हा दूरदृष्टीपणा व भांडवल गुंतवण्याची हिंमत यामुळे आज गायकवाड हे परिसरातील शेतकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. 

संपर्क - बाबासाहेब गायकवाड - 9422468155 
मु. नदीहत्तरगा, पो. किल्लारी, ता. निलंगा, जि. लातूर
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत कार्यरत आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate