অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खतांविषयी सल्ला आता मोबाईलवरून

खतांविषयी सल्ला आता मोबाईलवरून

फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (आयआरआरआय) व कृषी विभाग यांनी संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी राइस मोबाईल ही सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत शेतकऱ्यांना भातपिकातील खत व्यवस्थापनासंबधी माहिती वा सल्ला मोबाईलवर मोफत मिळणार आहे.
"एनएमराइस' असे या माहितीवर आधारित तंत्रज्ञान प्रणाली सेवेचे नाव आहे. खते ही शेतीतील महत्त्वाची निविष्ठा आहे. अन्नद्रव्यांच्या वापराबाबत पुरेशी माहिती नसेल तर त्यांचा वापर अनियंत्रित होऊ शकतो. खतांचा वापर अपुरा झाल्यासही पीक उत्पादनवाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपल्या मोबाईलवर जर खतांविषयी मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध झाले तर त्यांचा वेळ वाचून पिकाचे योग्य नियोजन करण्याच्या वेळेस त्यांना खतांचा योग्य वापर करणे शक्‍य होणार आहे. विशेष म्हणजे स्थाननिहाय सल्ला मिळणार असल्याने खतांचा वापर गरजेनुसार होणे शक्‍य होईल. शेतकरीच नव्हे तर सल्लागार, विस्तार कर्मचारी यांनाही त्याचा उपयोग होणार आहे.
भातपिकात काम करताना अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर "आयआरआरआय'ने केलेले सखोल संशोधन शेतकऱ्यांना शेतात वापरणे आता शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या सेवा देण्यामध्ये ही मोबाईल सेवा म्हणजे मैलाचा दगड ठरणार असल्याचे फिलिपिन्स कृषी विभागाने म्हटले आहे. खतांच्या वापराविषयी अशी सेवा देण्याची जी पद्धत विकसित केली आहे ती जगात प्रथमच असल्याचे आयआरआरआयचे संशोधन विभागाचे उपसंचालक अचीम डोबरमन यांनी म्हटले आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापक म्हणजे "न्यूट्रियंट मॅनेजर' या नावाची ही प्रणाली सन 2008 मध्ये सीडीच्या रूपात प्रकाशित करण्यात आली होती. बहुतांश फिलिपिनी शेतकऱ्यांकडे संगणक नसल्याने त्याचा वापर करणे त्यांना शक्‍य होत नव्हते, त्यामुळे सीडीचे वितरण भात उत्पादनपट्ट्यात मर्यादित स्वरूपात झाले होते, मात्र मोबाईलचा वापर शेतकरी करीत होते. ही गोष्ट लक्षात घेऊन आयआरआरआय व कृषी विभाग यांनी हे तंत्रज्ञान उपलब्ध केले.
या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय प्लॅंट न्यूट्रिशन इन्स्टिट्यूट, आंतरराष्ट्रीय खते संघटना, आंतरराष्ट्रीय पोटॅश संस्था आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे इंग्रजीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत सल्ला मिळणार आहे. यातील सुविधेनुसार शेतकरी आपल्या काही शंका मोबाईलवरून विचारू शकतात. त्यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर खतांची अधिकृत शिफारस असलेली माहिती त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
सध्या मोबाईल तंत्रज्ञानाचे महत्त्व शेती क्षेत्रात वाढताना दिसत आहे. भारतातही शेतकऱ्यांना किडी-रोगांचे पूर्वानुमान, बाजारभाव, तसेच शेतीतील अन्य माहिती मोबाईलवरून देणाऱ्या सेवा सुरू आहेत. यात खासगी कंपन्या, तसेच कृषी विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेतला आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate