गिरिपुष्पाची लागवड शेतजमिनीत करणे फायदेशीर ठरते. कारण त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते, तसेच खडकांची झीज होऊन जमीन चांगल्याप्रकारे तयार होण्यासही मदत होते. या झाडाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. त्यात पहिली पद्धत छाट कलम तयार करणे व दुसरी पद्धत झाडांच्या बियांपासून रोप तयार करून करता येते. छाट कलम तयार करण्याच्या पद्धतीत झाडाचे छाट कलम साधारणपणे एक वर्ष वयाच्या झाडापासून किंवा त्याच्या फांदीपासून तयार करावे. फांदीची जाडी 1.5 ते दोन सें.मी. व लांबी 50 ते 100 सें.मी. असावी.
लागवड करताना छाट कलमाची खालची बाजू जमिनीत साधारण 20 ते 50 सें.मी. खोल रुजवावी. लागवड पावसाळ्यात जमिनीत ओलावा असताना करावी. दोन झाडांतील अंतर 50 सें.मी. ठेवावे. बियांपासून रोप तयार करण्यासाठी गिरिपुष्प झाडाच्या बिया उपलब्ध करून त्या आठ ते दहा तास पाण्यात भिजत घालाव्या. त्यानंतर लाल माती, रेती आणि शेणखत यांचे 1 : 1 : 1 या प्रमाणात मिश्रण तयार करून साधारण 500 ग्रॅम मिश्रण प्लॅस्टिक पिशवीत भरावे व त्यामध्ये टोकन पद्धतीने लागवड करावी आणि नियमितपणे पाणी द्यावे. गिरिपुष्पाचे रोप तीन ते चार महिने वयाचे झाल्यानंतर पावसाळ्यात लागवड करावी. दोन झाडांतील अंतर साधारणपणे 50 सें.मी. ठेवावे. हे झाड वेगाने वाढत असल्यामुळे छाटणी करणे आवश्यक आहे.
साधारणपणे एक वर्ष वयाचे झाल्याबरोबर छाटणी करावी. छाटणी करताना जमिनीपासून 60 ते 75 सें.मी वरून करावी. या झाडाची छाटणी वर्षांतून तीन वेळा करावी. जून, नोव्हेंबर व मार्च या तीन महिन्यांत छाटणी केल्यानंतर हिरवी पाने व फांद्या बारीक कापून याचे मिश्रण तयार करावे व नंतर ते जमिनीत किंवा मातीत मिसळून द्यावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व त्या सोबत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून जमिनीचे जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मांमध्ये अनुकूल बदल होतो. जमिनीची सुपीकता वाढते. तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. याचा फायदा रासायनिक खतांवर व ओलितावर होणारा खर्च कमी करता येतो.
डॉ. प्रवीण वैद्य, 9822699194
कृषी महाविद्यालय, उस्मानाबाद
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...