लातूर कृषी विभागातील अधिकारी रमेश चिल्ले यांनी दिलेली माहिती

रोप लागवड तंत्रज्ञान पद्धतीमध्ये साधारणत: 15 ते 21 जूनअखेर खरीप पेरणी हंगाम गृहीत धरला, तर त्यापूर्वी 25 ते 30 दिवस आधी पॉलिथिन बॅगेत रोपे तयार करून घेतील जातात.

नेहमीच्या प्रचलित किंवा सुधारित जशा बीएसएमआर 736 व 853 किंवा अन्य अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे बियाणे 12 6 सें.मी च्या लहान पॉलिथिन बॅगेत लावून रोपे सावलीत वाळवून घेतली जातात.

साधारण 20 ते 25 मे या कालावधीत रोपे तयार करावीत. पुढे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर मुख्य पिकाच्या सहा ओळींनंतर एक ओळ रिकामी ठेवून त्यात पेरणीनंतर लगेच म्हणजे पिशवीतील तुरीची रोपे साधारणत: 25 ते 30 दिवसांच्या वयाची झाल्यावर पुनर्लागवड केली जाते. रोपांची उंची त्या वेळी 15 ते 20 सें.मी. होते. दोन ओळींतील अंतर सात ते आठ फूट व दोन रोपांतील दीड ते दोन फूट (जमिनीच्या प्रतीनुसार) याप्रमाणे ठेवले जाते. त्यामुळे मुख्य पिकापेक्षा तूर वर राहते. खाली दबली जात नाही.

नेहमीच्या पद्धतीने तूर घेण्याच्या तुलनेत रोप लावणी पद्धतीने पीक एक महिना आधी येण्याने रोग, किडींमध्ये ते कमी सापडते. फुले व दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची कमतरता भासत नाही. असे प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात व कर्नाटक सीमेवरील लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी, उदगीर, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, लातूर या तालुक्यांत केले जात आहेत.

रोप तंत्रज्ञान लागवडीचे फायदे

रोग-किडीच्या कालावधीत पीक सापडत नाही. एकरी फवारण्यांचा खर्च कमी होतो.
तुरीची लागवड लवकर केल्याने जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेता येतो.

लवकर लागवडीमुळे मुख्य पिकापेक्षा तुरीची वाढ उंच होते. मुख्य पिकात ती दबली जात नाही.
उत्पादनवाढीस मदत होते. बाजारपेठेत लवकर तूर आल्याने दर अधिक मिळू शकतो.

रमेश चिल्ले, 9422610775
कृषी विभाग, लातूर

स्त्रोत: अग्रोवन