एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिएसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते. काही भागात ही वनस्पती लागवडीशिवायही वाढलेली आढळते. एरंड हे ३-५ मी. उंचीचे लहान झाड असून त्याचे खोड ठिसूळ असते. पाने हस्ताकृती, विभागलेली पण साधी असतात. पानांचे खंड दातेरी आणि देठ लांब असतात. पानाच्या खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखाडी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर द्विलिंगी हिरवट फुले डिसेंबर-मार्च मध्ये येतात. नरफुले खालच्या भागात आणि मादीफुले वरच्या भागात असतात. फळे काटेरी व गोलाकार असून तडकून फुटणारी (स्फुटनशील) असतात. काटेरी बोंडात एक-बीजाणू तीन बिया असतात. बिया कठिण, लांबट व पिंगट असून त्यावर चित्रविचित्र ठिपके असतात.
एरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. याचे मूळ दाहक व वातनाशक आहे. ते सूज, ज्वर, दमा, कफ व आतड्यातील कृमी यांवर उपयुक्त असते. पानांचा काढा दुग्धवर्धक असतो. बियांपासून काढलेल्या तेलाला एरंडेल म्हणतात. ते रेचक असून हत्तीरोग, आकडी इत्यादींवरही उपयुक्त असते. तेलात केरोसिन १:७ या प्रमाणात मिसळून इंधन म्हणून वापरतात. गोठणबिंदू कमी असल्यामुळे हे तेल विमानातील यंत्रांत वंगण म्हणून वापरतात. साबण, मेणबत्त्या व सुवासिक तेले यांसाठी ते वापरतात. कापूस रंगविणे, छपाई, नायलॉन धागे बनविणे व कातड्याचे उद्योगधंदे यांकरिता ते उपयोगात आहे.
लेखक : वि. ज्ञा. लाळे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
लीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून त...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...