- किनारपट्टीतील उत्तम निचरा होणाऱ्या गाळाच्या, तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळाची लागवड होऊ शकते. पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन चांगली मानवते.
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने जायफळाची "कोकण सुगंधा' ही पहिली जात प्रसारित केली. या जातीच्या पूर्ण वाढीच्या झाडापासून सरासरी 500 फळे वर्षाला मिळतात. या जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर येतात. नुकतीच विद्यापीठाने "कोकण स्वाद' ही दुसरी जायफळाची जात प्रसारित केली. या जातीपासून वर्षाला सरासरी 750 फळे मिळतात.
- या झाडाची लागवड नारळाच्या किंवा सुपारीच्या बागांमध्ये करतात (सहा ते आठ मीटर अंतरावर). नारळाच्या बागेमध्ये नारळाच्या चार झाडांना चौफुलीवर 90 सें. मी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदावेत. हे खड्डे चांगली माती व प्रत्येक खड्ड्यात 50 किलो शेणखत / कंपोस्ट खत मिसळून भरून घ्यावेत.
- भेट कलम, मृद्काष्ठ कलम, बगल कलम आणि अंकुर कलम या पद्धतींचा वापर करून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरता येतात. कलमे लावून लागवड केल्यामुळे आपल्याला मादी व नर झाडांचे आवश्यक प्रमाण (10ः1) राखता येते. तिसऱ्या व चौथ्या वर्षापासून उत्पादन मिळते.
- तयार केलेल्या खड्ड्यामध्ये जून महिन्यात कलम लावून त्याच्या भोवतालची माती पायाने घट्ट दाबावी. रोपाची लागवड करावयाची झाल्यास एक ते दोन वर्षे वयाचे निरोगी रोप निवडावे; तसेच कलमाद्वारे लागवड करावयाची झाल्यास कलमांचा जोड व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि लागवड करताना जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी.
संपर्क - 02352 - 235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.