অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शतावरी लागवड पद्धत

शतावरी लागवड पद्धत

शतावरी ही वनस्पती भारतात सुमारे दोन हजार वर्षांपासून परिचित आहे. शतावरीच्या सेवनाने माणसाची कार्यशक्ती शतगुणित होते. ही वनस्पती औषधीदृष्ट्या महत्वाची आहे. अनेक जातींपैकी अॅस्परँगस रॅसिमोसस ही औषधीदृष्ट्रया अतिशय महत्वाची वनस्पती आहे. पारंपरिक पद्धत बदलून नवीन पद्धत किंवा पिकांना वाव देण्याच्या दृष्टीनेही शतावरीची लागवड फायदेशीर आहे.

शतावरीच्या वंशातील ३oo पेक्षा जास्त जातींची नोंद जगभरात असली, तरी आपल्या देशात फक्त १७ जातींची नोंद आहे. त्यातील फत नऊ जाती पाहावयास मिळतात. यापैकी योग्य जातीची लागवड केल्यास औषधासाठी चांगली शतावरी उपलब्ध होईल.

जमीन व हवामान

चांगला निचरा होणारी, हलकी, मध्यम, रेताड, जमीन लागवडीस निवडावी. ही वनस्पती उष्ण, तसेच समशीतोष्ण हवामानात चांगली वाढते. प्रतिकूल हवामानात, सुसावस्थेत राहणारी ही वनस्पती अनुकूल हवामान मिळताच पुन्हा फुटू लागते.

पूर्वमशागत

जमिनीची नांगरट करून, कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. प्रति हेक्टरी ४० ते ६० गाड्या शेणखत घालावे. त्यानंतर पाच फूट अंतराने एक फूट खोल व एक फूट रुंद असे चर खोदावेत. चरातील माती काढून निम्म्या मातीत शेणखत मिसळून ती त्याच चरात निम्म्याने भरावी व उरलेली माती रोपे भरताना वापरावी. साधारण ७५ ते ९० सेंमी. अंतराच्या स-या/पाट पाडावेत. हे काम मे महिन्यात करावे.

बियाणे

शतावरीची लागवड बिया टोकून किंवा गड्याच्या फुटव्यापासून प्रतीनुसार त्यांची किंमत प्रति किलो दीड ते तीन हजार रुपये आहे.

रोपांची लागवड

सुरुवातीला उन्हाळ्यात तीन-चार वेळा पाऊस झाल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस तयार केलेल्या जमिनीत ६० x ६० सेंमी अंतरावर साधारण १० ते १५ सेंमी उंच फूट आलेली रोपे लावावीत. पहिले ३-४ दिवस हलके पाणी द्यावे. त्यानंतर एक दिवसाआड दोन वेळा पाणी द्यावे. नंतर गरजेप्रमाणे ८-१o दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात झाडांचे संरक्षण करण्यासाठी, वेलीच्या बुध्याभोवती चर किंवा खड्ड्यांवर पालापाचोळा किंवा गवत टाकून आच्छादन करावे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.

खते

जमिनीच्या प्रकारानुसार व मातीतील खतांच्या प्रमाणानुसार हेक्टरी ४५ किलो नत्र २-३ वेळा विभागून आणि २० किलो स्फुरद

व १५ किलो पालाश टाकावे. लागवड करण्याअगोदर शेतातील मातीचे परीक्षण करून त्या आधारावर खतांची मात्रा ठरवावी. चांगल्या व निकोप वाढीसाठी खते योग्य प्रमाणात द्यावीत. अतिरेक टाळावा.

आंतरमशागत

लागवडीनंतर वेलीच्या बुध्याजवळील तण काढावे. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी, त्यांना काठ्यांचा आधार द्यावा. ते शक्य नसल्यास टोमॅटोला तारा/काथ्या बांधतो त्याप्रमाणे बांधून त्यावर वेली चढवाव्यात.

काढणी व उत्पादन

शतावरी लागवडीनंतर १८ ते २0 महिन्यांनी काढावयास येते. प्रति वर्षी हंगामात शतावरीच्या झुपक्याने वाढणा-या मुळ्या खणून काढाव्यात व वेलीचे खोड तसेच ठेवावे. काढलेली मुळे स्वच्छ करून लगेच मुळांवरची बारीक साल काढून १०-१५ सेंमी लांबीचे तुकडे करावेत. तसेच मुळामधील शीर ओढून काढावी म्हणजे वाळविण्याची प्रक्रिया लवकर होते. चांगली काळजी घेतल्यास प्रति वर्षी प्रति हेक्टर १२ ते १५ क्रेिटल मुळ्या निघतात. भारतातील सर्व फार्मसीमध्ये शतावरीच्या मुळ्या विकत घेतल्या जातात. केवळ आयुर्वेदिकच नव्हे, तर अॅलोपॅथिक आणि होमिओपॅथिक औषधनिर्मितीसाठीही शतावरीच्या मुळ्या लागतात.

औषधी महत्व

● शतावरी मधुर, शीत, स्तन्यजनक, शुक्रजनक, बलकारक आहे. शतावरी चवीस कडू व पचनास गोड आहे. शतावरी उत्तम रसायन आहे. शतावरी वात व पित्तनाशक, तसेच सर्व शरीरधातूंना बल देणारी, बुद्धीचा तल्लखपणा वाढविणारी व डोळ्यांना हितकारक आहे.

● पितप्रकोप, अपचन आणि जुलाब यावर उपचार म्हणून शतावरी मधातून देतात. शक्ती वाढवण्यासाठी शतावरी चूर्ण दुधात खडीसाखर मिसळून द्यावे.

● मूतखड्यावर शतावरीचा रस सकाळी सात दिवस घ्यावा. महिलांच्या श्वेतप्रदर रोगांवर शतावरी चूर्ण दुधात उकळून देतात. शतावरी मुळ्या वाटून पिंपळी, मध व दुधाबरोबर दिल्यास गर्भाशयाचे आजार होत नाहीत.

● शरीरात वाढलेल्या पितामुळे छाती दुखणे, घशाशी जळजळ, तोंडास कोरड पडणे, डोके दुखणे, आंबट-कडू ढेकर, बेंबीभोवती पोट दुखणे या व्याधींवर शतावरी अमृताप्रमाणे काम करते. मूत्राशयाच्या रोगावर व बाळंतपणात मातेस दूध सुटण्यासाठी शतावरी अत्यंत उपयुक्त आहे.

● शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू, संधिवातावर, तसेच सर्व प्रकारच्या वातांवर गुणकारी आहे. शतावरीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate