অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जून महिन्यात करावयाची शेती कामे

बागायती कापूस

 • बीटी कापूस लागवडीनंतर 30 दिवसानी नत्र खताचा दुसरा हप्ता (50 किलो नत्र प्रति हेक्टर) देवून पाणी द्यावे.
 • बिगर बीटी कापूस लागवडीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता (40 किलो नत्र प्रति हेक्टर) देवून पाणी द्यावे.
 • मावा, तुडतुडे इत्यादी रस शोषणार्‍या किडीचा अधिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. लेडीबर्ड बिटल, कायसोपा या सारख्या मित्र किडींचे संवर्धन करावे.
 • बीटी कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे उभारावेत व त्यातील पेक्टीनो ल्यूर दर 21 दिवसांनी बदलावे.
 • शेतामध्ये तण दिसून आल्यास 30 ते 35 दिवसांनी एक खुरपणी करावी.
 • टिप - औषधाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. जर पेट्रोल पंपाच्या साह्याने फवारणी करणार असल्यास औषधाचे प्रमाण तिप्पट करावे.

ऊस

 • पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस जोदार वाढीच्या अवस्थेत असून, जमिनीतील ओल, पाऊसमान  पाहून उपलब्धतेनुसार नियमित पाणी पुरवठा करावा.
 • उशीरा लागण झालेल्या सुरु ऊसास मोठया बांधणीच्या वेळी 100 किलो नत्र (217 किला युरिया), 55 किलो स्फुरद (344 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) अशी प्रती हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
 • ऊसास युरियाची मात्रा देताना निंबोळी पेंडीची बारीक भुकटी एक किलो व सहा किलो युरिया असे प्रमाण ठेवावे.
 • खोडवा ऊसास (खोडवा ठेवल्यानंतर 135 दिवसांनी) पहारीच्या सहाय्याने खतांचा दूसरा हप्ता म्हणजेच 125 किलो नत्र (272 किलो युरिया), 55 किलो स्फुरद (344 किलो सिंगल फॉस्फेट) आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) अशी प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
 • पट्टा पध्दत आणि सूक्ष्म जलसिंचन पध्दत यांचा अवलंब केल्यास ऊसावरील पाण्याचा ताण कमी करता येईल.
 • ठिबक सिंचनाची सोय असल्यास 21 ते 26 आठवड्यांपर्यंतच्या सुरू व खोडवा ऊसाला वाढीच्या अवस्थेनुसार एकरी 4 किलो पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा ठिबक सिंचन प्रणाली मधून द्यावीत.
 • ऊस क्षेत्र तणविरहीत ठेवावे.
 • हुणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरित्या 2-3 वेळा करावा.
 • कांडीकिडीचा प्रादुर्भाव असल्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्रकिटकाचे 5 ते 6 ट्रायकोगार्ड प्रति हेक्टरी वापरावेत.
 • पांढर्‍या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टिसिलीयम लेकॅनी (फुले बगीसाईड) 1 ते 2 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी फवारावे.
 • ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपटीकॉनिया मेल्यॅनोल्युका या परोपजीवी मित्र किटकाचे 5,000 जिवंत कोष अथवा 50,000 अंडीपुंज प्रती हेक्टरी वापरावेत

मूग आणि उडिद

 • दुसर्‍या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्यावर वापश्यावर बीजप्रकिया करुन पेरणी करावी. (प्रति किलो बियाणास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा व यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जीवाणूसंवर्धक).
 • शिफारशीत ख़त मात्रा ( 20 :40 :00 / हेक्टर ) पेरणीवेळी द्यावी.

तूर

 • दुसर्‍या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्यावर बीजप्रकिया (2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम बाविस्टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा / किलो बियाणे व यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणूसंवर्धक/ 10 किलो बियाणे ) करुन वापश्यावर पेरणी करावी. शक्यतो 10 जुलै पर्यंत पेरणी करावी.
 • शिफारशीत ख़त मात्रा पेरणीवेळी द्यावी.
 • तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणीनंतर लगेच पुरेसा ओलावा असताना उगवणीपूर्व तणनाशक पेंडिमेथॉलीन फवारावे.

भात

 • रोपवाटीका नियोजन

अ)  सुधारीत जाती

पद्धत

बियाणे किलो प्रति हेक्टरी

पुर्नलागवड

35-40

पेरणी

75

टोकण (15-25 द 15-25) सें.मी.

25-30

ब) संकरीत जातीसाठी प्रति हेक्टरी 20 किलो बियाणे वापरावे

 • बिजप्रक्रिया
  पेरणीपूर्वी बियाणास 2.5 ग्रॅम प्रति किलोग्रॅम याप्रमाणे कार्बेन्डाझिम किंवा थायरम/कॅप्टान बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर अ‍ॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू व अझोस्परीलिअम या जीवाणू खतांची बीजप्रक्रीया करावी.
 • पेरणी कालावधी व पेरणी अंतर

अ)  पुर्नलागवड भात ः 1 मीटर रुंदी, 15 सें.मी. उंची व सोईनुसार लांबी ठेवून गादी वाफ्यावर खरीप हंगामामध्ये 1 जून ते 30 जून पर्यंत पेरणी करावी. साधारणतः 10 गुंठ्याची    रोपवाटीका 1 हेक्टर लागवडीसाठी पुरेशी ठरते. रोपवाटीकेसाठी 250 ग्रॅम शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 500 ग्रॅम पालाश प्रति गुंठा द्यावे. पेरणी ओळीत करावी. पेरणीनंतर 15 दिवसांनी 500 ग्रॅम नत्र प्रति गुंठा रोपे वाढीसाठी द्यावे.

ब)  पेरभात ः भात बियाणे 22.5 किंवा 30 सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.

क)  टोकण पद्धत ः भात बियाणे 30 द 15 सें.मी. किंवा 22.5 द 22.5 सें.मी. अंतरावर टोकण करावे.

 • तण नियंत्रण

रोपवाटीका ः रोपवाटीकेतील तण नियंत्रणासाठी 15 मि.ली. ऑक्झीफ्लुरोफेन 23.5 टक्के ई.सी. प्रती 10 लिटर पाण्यात पेरणीनंतर दोन ते तीन दिवसात फवारावे अथवा ब्युटाक्लोर 50 ई.सी. 1.5 किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी अथवा अ‍ॅनिलोगोर्ड 30 ई.सी. 3 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी फवारण्यात यावे.

 • पेरभात व टोकण पद्धतीचा भात

पेरभात व टोकण पद्धतीच्या भात शेतीमध्ये पेरणीनंतरची कुळवणीमुळे तण नियंत्रण होते परंतु, रासायनिक पद्धतीने तणनियंत्रण करण्यासाठी तण उगवणीपूर्वी पेरणीनंतर लगेचच 640 मि.ली. ऑक्झीफ्लुरोफेन 23.5 टक्के ई.सी. 0.150 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी दोन ते तीन दिवसांत फवारावे व त्यानंतर तण उगवल्यानंतर 25 दिवसांच्या आत 20 ग्रॅम मेटसल्फुरॉन मिथाईल 10 टक्के + क्लोरीम्युरॉन इथाईल 10 टक्के तयार मिश्रण0.004 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे अथवा पेंडॅमिथीलीन 30 टक्के ई.सी. 0.75 क्रियाशील घटक प्रति हेक्टरी दोन ते तीन दिवसांत फवारावे व त्यानंतर तण उगवल्यानंतर 25 दिवसांच्या आत 2-4-डी 0.5 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे व 40 दिवसांनी एक बेनणी करावी.

 • पीक संरक्षण
  • रोपवाटिकेत वाफ्यात बियाणे टाकतेवेळी किंवा पेरणीनंतर 15 दिवसांनी दाणेदार फोरेट 10 टक्के (10 कि.ग्रॅ.) किंवा क्विनालफॉस 5 टक्के (15 कि.ग्रॅ.) किंवा कार्बोफ्युरान 3 टक्के (16.5 कि.ग्रॅ.) प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
  • रोपवाटिकेतील वाफ्यात खोडकिडीचे कामगंध सापळे प्रति हेक्टरी पाच या प्रमाणात लावावेत.
  • रोपवाटिकेत तुडतुडे, खोडकिडी, गादमाशी यांचे प्रादुर्भावानुसार 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • वार्फारीन (0.025%) वापरून तयार केलेले विषारी अमिष खेकड्यांच्या बिळाशेजारी ठेवून खेकड्यांचे नियंत्रण करता येते किंवा दाणेदार फोरेट 10% (2 किलो) प्रती हेक्टरी या प्रमाणात बांधावर व बिळाजवळ टाकावे. किंवा एसिफेट 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी (75ग्रॅम) किंवा कार्बारील 50 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी (100 ग्रॅम) घेऊन 1 कि.ग्रॅ. शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या अमिषाचे 100 लहान-लहान गोळे करून खेकड्यांच्या बिळात टाकावेत.

नाचणी

 • रोपवाटीका
 • गादीवाफा साधारणतः 1 ते 1.5 मी. रुंद आणि 8 ते 10 सें.मी. उंच व उतारानुसार लांबी ठेवून गादीवाफे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार करावेत. दर चौ.मी. क्षेत्रावर 3 किलो याप्रमाणे शेणखताचा थर द्यावा. आणि प्रति गुंठ्यास 1 किलो युरिया द्यावा. 7 ते 8 सें.मी. अंतरावर ओळीत 1 ते 2 सें.मी. खोल बियाणे पेरून हाताने झाकावे. पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रति गुंठा 1 किलो युरिया द्यावा. एक एकर क्षेत्र रोप पुनर्लागणीकरीता 2 - 3 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटीका पुरेशी होते.

 • सुधारीत वाण
 • फुले नाचणी, दापोली-1, दापोली सफेद, दापोली-2, फुले कासारी

बाजरी

 • शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देऊन तसेच जीवाणु संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पिकाच्या अंतरानुसार पेरणी करावी. अ‍ॅटराझीन तणनाशकाची 1.0 कि.प्रती हेक्टरी पेरणीनंतर 500 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणी नंतर 10 दिवसांनी व 20 दिवसांनी विरळणी करावी.

सोयाबीन

 • पावसाळा सुरू होताच कुळवाची पाळी घालावी व काडी कचरा व धसकटे वेचून शेत साफ करावे. शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देऊन तसेच जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पिकाच्या अंतरानुसार पेरणी करावी.

रब्बी ज्वारी

 • कुळवाच्या सहाय्याने 2 ते 3 पाळ्या द्याव्यात, तिसर्‍या पाळीपूर्वी 7 ते 10 टन शेणखत पसरावे.

फळबाग व्यवस्थापन

 • डाळिंब - पावसाचे अतिरिक्त पाणी काढुन द्यावे. पिकसंरक्षणार्थ फळे पोखरणारी अळी, व रस शोषणार्‍या किडी व पानावरील ठिपके नियंत्रण करावे.
 • सिताफळ - मशागतीचीे कामे करावीत.
 • बोर - शिफारशीत खताच्या मात्रा द्याव्यात. नवीन फुटीवर पाने खाणारी अळी/ भुंगेरेचे नियंत्रण करावे.
 • आवळा - सरंक्षित पाणी द्यावे. पाने खाणारी अळी, फुलकिडे यांचे नियंत्रण करावे.
 • जांभूळ - बागेची स्वच्छता फळांची काढणी.
 • कागदी लिंबू - शिफारशीत खतमात्रा (600:300:600 ग्रॅम नत्रःस्फुरदःपालाश प्रति झाड प्रति वर्ष) + 15 किलो शेणखत + 15 किलो निंबोळी पेंड द्यावी. त्यापैकी 40% नत्र व संपूर्ण स्फुरद, पालाश, शेणखत व निंबोळी पेंड द्यावी. हस्त बहाराच्या नियोजनासाठी जिब्रेलिक अ‍ॅसिड 50 पी पी एम ची फवारणी करावी. पिठ्या ढेकूण : क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 20 मिली / 10 लि. पाणी अथवा बुप्रोफोडीन 12.5 मिली/10लि. पाणी
 • कोळी - डायकोफॉल 20-25 मिली/10 लि. पाणी खैर्‍या रोगाच्या नियंत्रणासाठी लिंबू बागेमध्ये झाडावरील वाळलेल्या फांद्या काढून कापलेल्या जागेवर बोर्डोपेस्ट लावावी.

भाजीपाला व्यवस्थापन

 • उन्हाळी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला पिकांची वेळेवर काढणी करावी.
 • उन्हाळी हंगामातील वांगी, टोमॅटो, मिरची पिकाची तोडणी करावी.
 • किड व रोग नियंत्रणाचे उपाय करावे.
 • खरीप हंगामातील भाजीपाला पीक लागवडीसाठी शेताची मशागत करावी.
 • मशागतीचे वेळी शेणखताचा वापर करावा.
 • खरीप हंगामात कांदा, वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, गवार, वेलवर्गीय भाजीपाला, फ्लॉवर,    कोबी इ. पिकांची लागवड करावी.
 • कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो, फ्लॉवर व कोबी पिकांच्या रोपवाटीकेसाठी तयार करावे. रोपे गादीवाफ्यावर तयार करावेत.
 • कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो, फ्लॉवर व कोबी चे रोप तयार करण्यासाठी बियांची पेरणी करावी.
 • पेरणीआधी बिजप्रक्रिया करावी.
 • रोपवाटीकेस सुरूवातीला झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी दिले तरी चालू शकते.
 • निरोगी रोपांसाठी रोपवाटीका स्वच्छ ठेवावी. रोपांना रस शोषणार्‍या किडींपासून संरक्षण करण्यासाठी गादीवाफ्यावर 300 मेश जाळीचा मच्छरदाणीच्या कापडाचा वापर करावा.
 • रोग व किडीपासून संरक्षण करण्यासाठी उपाय करावेत.
 • मिरची, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर व कोबी पिकांचे रोपे प्लॅस्टीक ट्रे मध्ये सुध्दा तयार करता येतात.

पशुसंवर्धन

 • पावसाळयापुर्वी गोठा दुरुस्त करावा. छताची छिद्रे बंद करावीत. गोठया भोवती पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठयात ओलसरपणा राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • गोठे स्वच्छ व कोरडे ठेवावेत. चिखल होवू देवू नये.
 • हिरव्या चार्‍याकरीता ज्वारी, बाजरी, मका यासारखे पिकांना प्राधान्य द्यावे. याचबरोबर बहुवार्षिक पिकांमध्ये यशवंत, मेथीघास यासारखी पिके घ्यावीत.
 • साठविलेल्या सुक्या चार्‍यावर पाणी पडून त्यात बुरशी लागली असेल तर असा चारा जनावरांना देऊ नये तो नष्ट करावा.
 • जनावरांचे खाद्य / खाद्यघटक दमट आर्द्रता युक्त वातावरणात साठवू नयेत. त्यामध्ये भिंतीचा / जमिनीचा ओलसरपणा मुरणार नाही याची काळजी घ्यावी.

डॉ शरद गडाख, संचालक संशोधन,म.फु.कृ.वी.,राहुरी

डॉ पंडित खर्डे, प्रसारण केंद्र प्रमुख,म.फु.कृ.वी.,राहुरी

डॉ सचिन सदाफळ, सहायक प्राध्यापक,म.फु.कृ.वी.,राहुरी

अंतिम सुधारित : 6/6/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate