অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंबा मोहोरावरील कीड व रोग नियंत्रणाचे वेळापत्रक

आंबा मोहोरावरील कीड व रोग नियंत्रणाचे वेळापत्रक

आंबा हे आपल्या देशाचे राष्ट्रीय फळ असून जगातील जवळपास १११ देशांमध्ये आंबा हे पीक घेतले जाते. जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ४३ टक्के आंबा उत्पादन एकट्या भारत देशात होते. महाराष्ट्रामध्ये आंब्याची लागवड ४,७४,५00 हेक्टर क्षेत्रावर झाली असून उत्पादकता मात्र फारच कमी म्हणजे १.३० टन प्रती हेक्टर आहे. महाराष्ट्रातील एकूण फळपिकाखालील क्षेत्रापैकी जवळपास ४२ टक्के क्षेत्र आंबा पिकाखाली असून यापैकी कोकणात सर्वात जास्त म्हणजे १,८२,000 हेक्टर क्षेत्र आहे.

आंबा मोहोरावरील कीड

आंबा पिकावर जवळपास वेगवेगळया १८५ किडी आढळून आलेल्या आहेत परंतु फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या म्हणजेच १० ते १२ किडी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये तुडतुडे, पिठ्या ढेकूण, खोडकिडा, शेंडा पोखरणारी अळी, फळमाशी, कोयीतील मुंगा, मिजमाशी, तांबडा किडी आहेत.

आंब्यावरील अतिशय महत्वाची कोड म्हणजे तुडतुडे. या किडीचा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये सर्वत्र आढळून येतो. या किडीचे पूर्ण वाढलेले तुडतुडे आकाराने पाचरीसारखे असतात, त्यांची लांबी सुमारे ४ मि. मी. असते. रंग आंब्याच्या खोडाशी मिळताजुळता असतो. तुडतुड्याच्या अनेक जाती आहेत त्यापैकी प्रामुख्याने दोन जातीचे तुडतुडे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. ऑटोंडस अष्टकोनसोनी प्रजातीचे तुडतुडे आणि इडेियस्कोपस नेिओस्पार्सस हे तुडतुडे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये झाडाला मोहोर फुटू लागला की पुन्हा जागृतावस्थेत येतात आणि त्यांचा जीवनक्रम पुन्हा सुरू होतो.

कोकण विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील जवळपास ९९ टक्के क्षेत्र हे हापूस या एकाच आंब्याच्या जातीखाली आहे. कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान हे रोग तसेच किडींच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. तसेच हापूस या एकाच जातीची सलग लागवड असल्यामुळे किडीची वाढ होते. परिणामी आंब्यावर येणा-या किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांच्या तसेच बुरशीनाशकांच्या फवारण्या करणे अनिवार्य होते. अन्यथ: काही वेळेला अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. ही बाब आंबा बागायतदारांना माहित असल्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु फवारणी करताना आपण फवारणी कशासाठी करतोय? त्याची गरज आहे का? कशा पद्धतीने करतोय, या सर्व बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथ: या फवारण्यांचा आपणाला अपेक्षित परिणाम तर मिळणार नाहीच मात्र आपले कष्ट व पैसा वाया जातो तसेच त्याचा पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो.

आंब्यावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर ज्या फवारण्या घेतल्या जातात त्या तुडतुडे या आंब्यावर येणा-या प्रमुख किडीच्या व भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी असतात. तसेच अधिक उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पाण्यात विरघळणारी खते तसेच हार्मोन्स, वाढ प्रवर्तक, सुक्ष्म अन्नद्रव्ये इत्यादी रासायनिक द्रव्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. परंतु ही रसायने ब-याच वेळा कीटकनाशकांच्या द्रावणात मिसळून फवारली जातात. वास्तविक कीटकनाशके, बुरशीनाशके, इतर रसायने एकमेकात मिसळताना ती एकमेकास पूरक (कॉम्प्पॅटीबल) आहेत का? याची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथ: अशा फवारणीचा फायदा न होता तोटाच होण्याची शक्यता आहे. तेव्हा बागायतदारांना याबाबत माहिती नसल्यास याच्या फवारण्या वेगवेगळ्या करणे गरजेचे आहे.

मुख्यत: आंबा बागायतदार तुडतुडे येण्याच्या भीतीपोटी अतिशय मोठ्या प्रमाणावर नियमित फवारण्या घेत असतात, हे पूर्णतः चुकीचे आहे. याचाच परिणाम आजच्या आंबा पीक संरक्षण समस्येस जबाबदार आहे.सन १९९० ते २ooo च्या दशकात सिंथेटिक पायरीथॉईड या गटातील एकाच कीटकनाशकाच्या अति वापरामुळे मीजमाशी, खवलेकीड, पिठ्या ढेकूण इत्यादी दुय्यम किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर सन २००० नंतर निओनिकोटीनाईड गटातील इमीडाक्लोप्रीड या कीटकनाशकाच्या अति वापराने आंबा पिकावरील फुलकिडीचा तसेच मोहोरावर येणा-या अळ्यांच्या प्रादुर्भावात वाढ होताना दिसून येत आहे. परिणामी आंबा पीक संरक्षण समस्या गंभीर होत आहे. कीटकनाशके एकमेकास पूरक असतील व पीक परिस्थितीची तशी गरज असेल तर योग्य प्रमाणात ती मिसळून वापरण्यास हरकत नाही. एकाच वेळी तुडतुड्याच्या तसेच मोहोरावरील फवारण्या टाळण्यासाठी योग्य ती कीटकनाशके योग्य प्रमाणात मिसळून वापरण्यास हरकत नाही. परंतु अलीकडे सर्रास इमीडाक्लोप्रीड सारखी कीटकनाशके प्रत्येक फवारणीत कमी प्रमाणात मिसळून वापरण्यात येतात. हे पुर्णतः चुकीचे आहे ही कीटकनाशके प्रत्येक फवारणीत वापरल्यास कीटकनाशके पचविण्याची किडीची क्षमता वाढते व चांगली कीटकनाशके प्रभावहीन होतात.

वास्तविक कीटकनाशकाची फवारणी ही गरज असल्यासच करावी कारण कीटकनाशक ही अशी निविष्ठा आहे, की जिच्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही. तेव्हा गरज नसल्यास वापरल्यामुळे खर्च अनाठायी होतो. उलट पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊन दुय्यम किडी वाढण्याची भीती असते तेव्हा फवारणी शक्यतो सर्वेक्षण घेऊनच करावी. सर्वेक्षणाअंती आपल्या बागेत कोणत्या किडी किंवा रोग आहेत, त्याचे प्रमाण किती आहे याची पहाणी करावी व त्यानुसार असणा-या किडीच्या नियंत्रणासाठी कोडनिहाय कीटकनाशकाची निवड करावी. वास्तविक तुडतुड्याचे निरीक्षण घेणे तर अतिशय सोपे आहे. बागेमध्ये तुडतुडा आहे की नाही यासाठी मोहोराची नियमित निरीक्षणे घ्यावीत व प्रादुर्भाव आढळून येताच फवारणी चांगल्या प्रकारे होते. निरीक्षणसाठी बागेमधील चारही बाजूंची तसेच मधील काही झाडे निवडावीत. प्रत्येक झाडावर १o ते १२ मोहोरांचे निरीक्षण करावे. त्यासाठी मोहोरापाठील पाने काढावीत व मोहोर बुध्यालगत उजव्या हाताच्या अंगठा व लगतच्या बोटामध्ये पकडावा व अंगठ्याने तळहातावर मोहोर दाबावा नंतर डाव्या हाताची बोटे मोहोरामध्ये फिरवावीत असे केल्यास स्वच्छ दिसणा-या मोहोरामध्ये देखील प्रादुर्भाव असल्यास सुईच्या टोकाएवढी तुडतुड्याची पिले मोहोराच्या मुख्य दांड्यावरून चालताना दिसतील त्यामुळे तुडतुड्यांची अवस्था देखील कळू शकेल व त्यानुसार उपाययोजना करता येईल.

फवारणीसाठी निवडलेले कीटकनाशक/बुरशीनाशक योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. तेव्हा कीटकनाशके शिफारस केलेल्या मात्रेनुसार मोजून वापरली तरच त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येतो. प्रमाणापेक्षा कमी कीटकनाशकांचा वापर केल्यास किडीमध्ये कीटकनाशके पचविण्याची क्षमता वाढते तसेच फवारणीसुद्धा योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. तसेच फवारणीसाठीची कीटकनाशके निवडताना पिकांची अवस्था व कीटकनाशकांचा काढणीपूर्व कालावधी (PH) लक्षात घेऊन त्यानुसार कालावधी ४५ दिवस तर डेल्टामेश्रीनचा कालावधी ६ दिवस आहे, तेव्हा फळांची वाढ झाल्यानंतर जास्त काढणीपूर्व कालावधी असणारी कीटकनाशके वापरू नयेत.

फवारणीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे निवडताना देखील काळजी घेणे जरुरीचे असते. फवारणीपंपाचा नोझल योग्य प्रकारचा असावा. शक्यतो कीटकनाशक फवारणीसाठी हॉलोकोन नोझल निवडावा. तसेच फवारताना योग्य दाब (प्रेशर) असणे गरजेचे आहे. तेव्हा याची दक्षता घ्यावी. त्यामुळे फवारा सूक्ष्म तुषार पद्धतीने पडेल. नोझल गळत असल्यास नोझल बदलावा. कमी उष्णतामान व वा-याची गती असताना फवारणी केल्यास लहान थेंबाचे बाष्पीकरण व वा-याने वाहून जाणे टाळता येते. फवारणी शक्यतो सकाळी अथवा संध्याकाळी करावी. फवारणी करताना नोझल आणि बुम योग्य उंचीवर पकडावी, फवारणी अवजारास योग्य गती व दाब देऊन फवारणी करावी. वा-याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये. फवारणीसाठी योग्य कपडे घाला. आपल्या कातडीचा विशेषत: डोळे आणि तोंड याचा कीटकनाशकाशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.

तसेच कीटकनाशके मिसळताना किंवा वापरताना काहीही खाऊ अथवा पिऊ नये. बरेच बागायतदार जरी झाडावर चढून फवारणी करीत असले तरी फवारा शेंड्यावर पोहोचावा म्हणून पिचकारी पद्धतीने फवारा करतात. त्यामुळे कीटकनाशक मोहरावर व पानावर चिकटून न राहता खाली पडते. फवारा आतून झाडावर चढून केला असता ब-याच वेळा मोहोराच्या देठाच्या पाठीमागे असलेल्या पानांमुळे फवारा करताना मोहोर झाकला जातो व तुडतुड्यांच्या पिलांना संरक्षण मिळते त्यामुळे अपेक्षित नियंत्रण होत नाही. हे टाळण्याकरिता प्रथम झाडाच्या आतील भागावर खोडाच्या उजव्या बाजूस उभे राहून डाव्या बाजूच्या आतील भागावर फवारा करावा व नंतर डाव्या बाजूकडून उजव्या भागामध्ये करावा. झाडे उंच असल्यास नोझलच्या दांड्यास १० ते १५ फुटाची बाबूची काठी बांधावी व नंतर झाडाच्या बाहेरच्या बाजूकडील मोहोर तुषार पद्धतीने व्यवस्थित भिजवावा. तसेच फवारणी करताना कोणत्या किडी अथवा रोगासाठी फवारणी घेतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे. उदा. भुरी रोग व तांबडा कोळी या दोन्हींसाठी गंधक प्रभावी आहे. मात्र भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक मोहोरावर व्यवस्थित पडेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तांबडा कोळी पानाच्या पाठीमागे असतो अशावेळी फवारा पानांच्या पाठीमागे पडेल अशा पद्धतीने फवारणी करणे गरजेचे आहे.

रोग नियंत्रणाचे वेळापत्रक

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने कोकण विभागात येणा-या किडींच्या प्रादुर्भावाचा विचार करून पाच फवारण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. वास्तविक हे सामान्य शेतक-यांसाठी आहे. सदर सदर औषधे लेबल क्लेम केलेली आहेत का? याची नोंद घ्यावी. अभ्यासू बागायतदारांनी सर्वेक्षणानुसारच फवारण्या कराव्यात व त्यासाठी पुढील वेळापत्रकातील कीटकनाशकांचा गरज असल्यासच वापर करावा. कोकण कृषि विद्यापीठाने अभ्यासामध्ये आंब्यावरील येणा-या सर्व कोड व रोगांचा सारासार विचार करून आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रक प्रमाणित केले आहे. परंतु या वेळापत्रकामधील काही कीटकनाशके जरी प्रभावी असली तरी त्यांना लेबल क्लेम नाही. परंतु सद्यस्थितीतील उपलब्ध असलेली लेबल क्लेम कीटकनाशके देखील पुरेशी असल्यामुळे शक्यतो त्याचाच वापर करावा. त्यांचे स्वतंत्र वेळापत्रक दिलेले आहे. मात्र आंब्यावर येणा-या भुरी रोगासाठी प्रभावी आढळणा-या बुरशीनाशकांना लेबल क्लेम नसल्यामुळे बागायतदारांनी स्वजबाबदारीवर वापरण्यास हरकत नाही.

अ.क्र फवारणीचा कालावधी कीटकनाशक औषधे १० लिटर पाण्यासाठी प्रमाण शेरा
पालीवर मोहोर येण्यापूर्वी सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही किंवा ३ मी.ली करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे कार्बेनडझिम १० ग्रॅम किंवा प्रॉपीनेब २० ग्रॅम मिसळून वापरावे.
फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही किंवा ५ मी.ली.
डेल्टामेथ्रीन२.८ टक्के प्रवाही किंवा ९ मी.ली
प्रोफेनोफॉस ४० टक्के + १५मी.ली
सायपरमेथ्रीन ४ टक्के किंवा
क्लोरोपायरीफॉस ५० टक्के + १० मी.ली.
सायपरमेथ्रीन ५ टक्के
दुसरी फवारणी (बोंग फुटताना ) क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही किंवा २० मी.ली. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विर्घल्णारे गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेनडझिम १० ग्रँम मिसळून वापरावे
कार्बावरील ५० टक्के (पा. मी) किंवा २० ग्रॅम
प्रोफेनोफॉस ५० टक्के १० मी.ली.
तिसरी फवारणी ( दुसऱ्या फवारणीनंतर मोहोर फुलण्यापूर्वी दोन आठवड्यांनी इमीडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही किंवा ३ मी.ली. तिसऱ्या ,चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल ५ मी. ली.  किंवा कार्बेंडझीयम १० ग्रॅम मिसळून वापरावे.
क्लोथीयानिडिन ५० टक्के (WDG) १.२ ग्रॅम
चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी थायोमेथॉक्झाम २५ टक्के(WDG) १.० ग्रॅम
ट्रायझोफॉस ४० टक्के १० मी.ली.
पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी फेन्थाएट ५० टक्के प्रवाही किंवा २० मी .ली.
डायमेथाएट ३० टक्के प्रवाही किंवा १० मी. ली.
डेल्टामेथ्रीन  १ टक्के + १० मी.ली.
ट्रायझोफॉस ३५ टक्के किंवा  लॅम्बडा सायहेलोथ्रीन ५ टक्के 6 मी.ली.
सहावी फवारणी (पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास दोन आठवड्यांनी) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. गरज असल्यास फवारणी करावी

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 4/5/2021



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate