অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करपा

करपा

वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे अंकुर यांवर वाढणार्‍या कवक( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्मजंतू व व्हायरस यांमुळे होणार्‍या रोगांनी ते भाग सुकतात. त्यांचा रंग तपकिरी काळसर होऊन ते उष्णतेने करपल्यासारखे दिसतात म्हणून हे लक्षण दिसणार्‍या रोगास करपा असे नाव आहे. याला अंगमारी, खार अशीही नावे आहेत. रोगट भाग सडल्याचे दिसत नाही. रोग जास्त बळावल्यास संपूर्ण झाडे सुकतात व मरतात. उदा. , पाश्चिमात्य देशांत चेस्टनटची झाडे कवकामुळे (एंडोथियापॅरासिटिका) करपा रोग पडून मरतात. सफरचंदाच्या मोहोरावर आग्या करपा रोग पडून तो सुकतो. हरभरा , द्राक्ष , भात , बटाटा इ. पिकांवर करपा रोग पडून  पिकांचे अतिशय नुकसान होते. करपा रोगाचा प्रसार पाऊस , वारा , कीटक तसेच रोगग्रस्त बियाणे यांच्याद्वारे होतो.

विविध वनस्पतींवरील करपा रोग :(१) घेवड्यावरील करपा, (आ) सफरचंदाच्या पानावरील आग्या करपा, (इ) अक्रोडावरील करपा, (ई) बटाट्याच्या पानावरील करपा. करपा कीड : (१)अळी, (२)कोष, (३)प्रौढ भुंगेरा.

बहुतांशी करपा रोग अपूर्ण कवक ( फंजाय इंपरफेक्टाय) वर्गातील मोनिलिएलीझ , मेलँकोनिएलीझ व स्फिरॉडिएलीझ या गणांतील कवकांमुळे तसेच झँथोमोनसएर्विनियाया प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे व काही व्हायरसांमुळे होतो.

लक्षणे

कोवळ्या पानांवर बारीक बारीक ठिपके दिसू लागतात. ते तेलकट काळ्या रंगाचे असतात. त्यांच्या कडा तांबूस दिसतात व मध्यभागी ते खोलगट असतात. उदा. , द्राक्षावरील करपा. कित्येक वेळा रोगग्रस्त पाने रंगाने तपकिरी होतात व ती वाळलेल्या गवतासारखी शुष्क होतात. उदा. , भातावरील आणि चवळीच्या पानांवरील करपा. कोवळ्या अंकुरावर तसेच फांद्यावर ⇨स्थूलकोनोतकाच्या कोशिकांचा (पेशींचा) नाश होऊन काळे , खोलगट व्रण पडतात. उदा. , द्राक्षाचा करपा. फुलांवरही करपा रोग पडतो व त्यामुळे ती करपतात.उदा. , शेवंती , गाजर इत्यादी.

कवकजन्य करपा

बटाटा , गाजर , टोमॅटो , जिरे , मिरची , गुलाब , मोहरी , कांदा , लसूण व गहू यांच्या पानांवरआल्टर्नेरियाया वंशातील कवकामुळे करपा रोग होतो. तसेच द्राक्षे व केळी यांच्या फळांवर करपा रोगामुळे (ग्लिओस्पोरियमया वंशातील कवकामुळे) काळे ठिपके पडतात.ग्यूमरेल्लाया वंशातील कवकामुळे कापसाची बोंडे तसेच मटकी , उडीद , हुलगा व चवळी या पिकांच्या शेंगांवर डाग पडतात. आंब्याच्या पानांवर , घेवडा व वाटाणा यांच्या शेंगांवरकॉलिटॉट्रिकमया वंशातील कवकामुळे काळे डाग पडतात , तर हरभर्‍याच्या पानांवर व घाट्यांवरऍस्कोफायटाया वंशातील कवकांमुळे डाग पडतात.

सूक्ष्मजंतूजन्य करपा

कपाशीच्या पानावर पडणारा करपा रोगझँथोमोनस माल्व्हेसिऍरमया सूक्ष्मजंतूंमुळे होतो. चवळीच्या पानावरील करपा रोगझँथोमोनस व्हिग्निओलाव सफरचंद , नासपती इत्यादींच्या मोहोरावरएर्विनिया ऍमिलोव्होराया सूक्ष्मजंतूमुळे करपा रोग होतो.

व्हायरसमुळे होणाऱ्या   करपा रोगाचे उदाहरण म्हणजे सोयाबीनचा करपा.

उपाय

(१) रोगग्रस्त पाने , फांद्या , फळे इ. काढून नष्ट करतात ; .

(२) छाटणीनंतर झाडावर बोर्डो मिश्रण (३:३:५०) , झायनेब , मॅनेब इ.  कवकनाशके फवारतात ;

(३) निरोगी बी लावतात. उदा. , कापूस , वाटाणा , मिरची व चवळी. रोगट बियांस एक टक्का पारायुक्त कवकनाशक (उदा. , आरॅटॉन , आगॅलॉल , सेरेसान इ.) चोळतात (प्रमाण : एक किग्रॅ. बियांस २.५ ते ३ ग्रॅ. औषध) ;

(४) रोगप्रतिबंधक जाती उपलब्ध असल्यास लावतात. उदा. , भात , हरभरा ,

(५) सफरचंदाच्या आग्या करपा रोगाचा प्रसार कीटकांमुळे होतो. तो आटोक्यात आणण्याकरिता कीटकनाशकांचा (उदा. , एंड्रीन , फॉस्फोमिडॉन , एंडोसल्फान , मॅलॅथिऑन , हेलिओटॉक्स , पॅराथिऑन इ.) फवारा मारतात व

(६) पिकांची फेरपालट करतात कारण त्यामुळे रोग कमी प्रमाणात  येतो.

 

 

लेखक- कुलकर्णी , य. स.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate