অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कीड नियंत्रणातील प्रयोग

एकात्मिक कीड नियंत्रणाचे विविध प्रयोग शेतकरी स्तरावरही सुरू असतात. त्यातीलच काही निवडक प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक अनुभव राज्यातील शेतकऱ्यांना निश्‍चित दिशादर्शक ठरतील.

जैविक नियंत्रण ठरले फायदेशीर


पुणे जिल्ह्यात पारगाव सालोमालो (ता. दौंड) येथील कांतिलाल रणदिवे यांनी सेंद्रिय शेतीत आपली ओळख तयार केली आहे. आपल्या सुमारे साडेनऊ एकरांत ते शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात. ऊस, त्यात विविध आंतरपिके, विविध भाजीपाला पिके घेताना सेंद्रिय शेतीचे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. अभ्यास, निरीक्षण, शिकाऊवृत्ती यातून त्यांनी आर्थिक व शाश्‍वत शेती प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.
आपल्या सेंद्रिय शेतीतील पीक संरक्षणाचे त्यांचे अनुभव थोडक्‍यात असे.
1) पिकात निंबोळी पेंडीचा वापर
2) रणदिवे म्हणतात, की सेंद्रिय शेतीत बऱ्याच गोष्टी आपल्या शेतातच उपलब्ध असतात, त्यामुळे निविष्ठा विकत घेण्याचा बराच खर्च कमी होतो. माझ्या शेतात रुई, उंबर, टणटणी, बेल, लिंबू आदी विविध वनस्पती आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात त्या हव्यात. आपल्या शेतात विविध वनस्पतींच्या आधारे 10 ते 15 प्रकारची कीड नियंत्रके, तर आठ ते दहा प्रकारची खते मी तयार करतो.
3) कोणत्याही दहा उग्र वासांच्या वनस्पतींचा पाला दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरता येतो. पपई, सीताफळ, रुई, टणटणी, पेरू, एरंड, लिंब आदी वनस्पती मी वापरतो. त्यात गोमूत्र टाकले, तर अधिक प्रभावी होते.
4) अति आंबट ताक व हळद एकत्र करून फवारणी केल्यास कांद्यावरील फुलकिडा (थ्रिप्स) व बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. सुमारे 20 दिवसांच्या अंतराने कांद्यात 60 दिवसांत तीन फवारण्या प्रभावी ठरल्याचा अनुभव रणदिवे यांनी सांगितले. 5) लिंबाचा रस काढून तो गाळून फवारल्यास माव्याचे नियंत्रण होते.
6) पिकाच्या उंचीपेक्षा सहा ते आठ इंच उंचीचा पक्ष्यांसाठी झोपाळा वा थांबा करायचा. एक एकरात सहा ते दहा ठिकाणी तो ठेवायचा. पक्ष्यांना प्यायला पाणी देण्याची सोय तेथे करायची. पक्षी अळी पकडतात. तिथेच पाणी पितात, तिथेच थांबतात. रणदिवे म्हणतात, की माझ्या शेत परिसरात भरपूर पक्षी आहेत. चिमण्यांचे तर मी संवर्धनच केले आहे.
7) झेंडू, शेपू, मेथी, करडई, मका ही पिके सेंद्रिय शेतीत अत्यंत महत्त्वाची. ती ठराविक अंतराने लावलीच पाहिजेत. मका तर पीक संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा.
8) झेंडू गावरान असावा. भरपूर फांद्या व फुले येणारा असावा. तुळशीची झाडे जेथे शक्‍य आहे तेथे लावावीत.

तुमच्या पिकावर किडी-रोग येण्याचे संकेत देणारी (इंडिकेटर) पिके


  • पहिला मावा मोहरी, बडीशेप, करडई या पिकांवर येतो. त्यावरून ओळखायचे, आपल्या पिकात तो येणार.
  • शेपूचा शेंडा पांढरा पडला तर बुरशी येण्याचे संकेत.
  • मेथीवर पांढरे डाग पडले तर बुरशी येण्याचे संकेत.
  • मक्‍याची सिंगल लाइन करून त्याचे कंपाउंड केले व कांदा शेतातही लावल्यास थ्रिप्स कमी येतो. मक्‍याच्या पोंग्यात मित्रकीटक लवकर तयार होतात. मक्‍यावर पांढरा व पिवळा मावा लवकर आकर्षित होतो. तो कांद्यावर येत नाही.
  • झेंडूची झाडे शेतात अधिक असली तर लाल कोळी आधी झेंडूला खातो. सूत्रकृमीलाही झेंडू अटकाव करतो.
  • गोमूत्र व मीठ फवारणीने काळा मावा नियंत्रणात येतो.
  • करडईच्या ज्या पानांवर मावा आला ती गोळा करायची, मोठ्या भांड्यात पाणी, रॉकेल घेऊन त्यात पाने टाकायची. मावा मरतो.
  • हिरवी मिरची व लसूण व गरजेएवढे थोडे मीठ यांचे योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात द्रावण व काढा तयार करायचा. तोंडाला रुमाल बांधून फवारणी करायची, त्यामुळे अळीचे नियंत्रण होते.
  • एका एकरात आठ तुळशी लावल्या तर त्याच्या वासाने शत्रुकीटक पिकाजवळ येत नाहीत. रणदिवे यांच्याकडे तुळशीची सुमारे दोनशे झाडे आहेत. त्याच्या आजूबाजूला रोग-किडींचे प्रमाण नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.
  • लिंबाच्या पाल्याची वा गवरीची जाळून राखुंडी तयार करून ती पिकावर धुरळल्यास नागअळी नियंत्रणात येते.
  • रसशोषक किडींसाठी चिकट सापळे उपयुक्त ठरतात. फळमाशीसाठी गंध रसायन (ल्यूर) चिकट सापळ्याच्या ठिकाणी ठेवल्यास ती तेथे येऊन सापळ्याला चिकटते.
संपर्क ः कांतिलाल रणदिवे - 9860688425

--------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate