অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केवडा रोग

केवडा रोग

वनस्पतींची पाने, शिरा व शिरांमधील भाग पिवळा, हिरवट पिवळा अगर केवड्यासारखा पिवळा आढळल्यास त्यांवर केवडा रोग पडला असे म्हणतात. हा रोग कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे होणारा), व्हायरसजन्य (अतिसूक्ष्म जीवांमुळे होणारा) वा अजीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या जीवांव्यतिरिक्त इतर) कारणांमुळे होतो.

कवकजन्य केवडा रोगामध्ये (डाउनी मिल्ड्यू) पानांच्या वरील बाजूवर पिवळसरपणा आणि त्या जागी खालील बाजूंवर कवकाची किंचित फिकट राखी व फिकट जांभळी लवयुक्त वाढ आढळते. त्यामुळे तो भुरी रोगासारखा भासतो. केवडा रोगामध्ये कवकाची वाढ पानांच्या खालील बाजूवर असते, तर भुरी रोगामध्ये ती पानांच्या दोन्ही बाजूंवर आढळते. कवकाच्या वाढीत बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक अंग) व बीजाणुधर (बीजाणुधारक भाग) आढळतात. कवक पानाच्या आतील भागातच वाढते. दूषित पानावरील रंग पिवळा अथवा तपकिरी असतो. या रोगामुळे पाने सुकतात आणि निर्जीव बनतात. हा रोग विशेषतः पावसाळ्यात प्रकर्षाने आढळतो. हवेत अथवा मृदेत (जमिनीत) भरपूर आर्द्रता असल्यास या रोगाचा फैलाव त्वरित होतो. शैवल कवक (फायकोमायसीटीज) उपवर्गाच्या पेरोनोस्पोरॅलीझ या गणातील कवकांमुळे हा रोग होतो. प्रमुख पिकांवरील कवकांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

ज्वारी –स्क्लेरोस्पोरा सोरघाय; बाजरी, राळा –स्क्ले. ग्रॅमिनीकोला; मका –स्क्ले फिलिपीनेन्सिस; नाचणी –स्क्ले. मॅक्रोस्पोरा; ऊस –स्क्ले. सॅकराय; द्राक्ष –प्लॅस्मोपॅरा व्हिटीकोला; काकडी –स्युडोपेरोनोस्पोरा क्युबेन्सिस; कांदा –पेरोनोस्पोरा डिस्ट्रक्टर; चुका –पे. रूमिसीस; कोबी –पे. ब्रासिकी; सालीट –ब्रिमीया लॅक्टसी.

या रोगामुळे पाने सामान्यतः पिवळी पडत असली, तरी काही वेळा रोगामुळे ज्वारी व राळा या पिकांची पाने फाटतात व तंतुमय बनतात. बाजरीची व नाचणीची पाने विटकरी रंगाची दिसतात. बाजरी, राळा व क्वचित ज्वारी यांची कणसे हिरव्या कळ्या फुटल्यासारखी आणि दाणेरहित आढळतात. द्राक्षाची पाने तांबूस बनतात.

मोहोर व देठ कवकाच्या प्रादुर्भावाने जळतात व फळे सुरकुततात. तृणधान्याच्या रोगट पानात कवकाचे संयुक्त बीजाणू (फलन झालेल्या स्त्री-जनन पेशींपासून तयार झालेले बीजाणू) आढळतात. पाने फाटल्याने ते मृदेत पडतात अथवा मळणीच्या वेळी बियांना चिकटतात. त्यामुळे बीजलेपन म्हणून वापरलेल्या एक टक्का पारायुक्त कवकनाशकाचा अत्यल्प उपयोग होतो. म्हणून तृणधान्याचे रोगप्रतिकारक वाण लावतात. द्राक्षे, कांदा आणि काकडीच्या केवडा रोगासाठी झायनेब किंवा ताम्रयुक्त कवकनाशके वापरतात.

व्हायरसजन्य केवडा रोगात पाने संपूर्णपणे अथवा बहुतांशी फिकी वा पूर्ण पिवळी पडतात. घेवडा वर्गातील वनस्पतींवर असे रोग आढळतात. भेंडीवरील केवड्यात फक्त शिरा पिवळ्या व क्वचित इतर भाग पिवळा दिसतो. पपई, टोमॅटो, बटाटा, तंबाखू इ. पिकांच्या पानांवर गर्द व फिकट हिरवा रंग आढळतो. प्रकाशात रोगग्रस्त पाने धरल्यास रंगमिश्रिती व विभिन्नता स्पष्ट दिसते. व्हायरसजन्य केवडा रोग पांढरी माशी, मावा, तुडतुडे या कीटकांमुळे फैलावतो. या रोगावर उपाय म्हणजे रोगट वनस्पती उपटून नष्ट करतात, शेतातील तण काढून स्वच्छता ठेवतात व निरोगी वनस्पतींवर कीटकांमार्फत रोग पसरू नये याकरिता कीटकनाशके फवारतात.

अजीवोपजीवी कारणांपैकी काही मूलद्रव्यांच्या उणिवेमुळे केवडा रोग होतो. मोसंबीवर जस्ताच्या आणि उसावर लोहाच्या उणिवेमुळे हा रोग आढळतो. याकरिता कोणते मूलद्रव्य कमी पडले आहे हे शोधून उपाययोजना करतात. पिकांना नायट्रोजन कमी पडल्यानेही पाने पिवळी पडतात. पाणी जरूरीपेक्षा जास्त वा कमी देण्यानेही अशीच लक्षणे आढळतात.

सारांश, केवडा रोग कशामुळे झाला आहे हे शोधून त्यानुसार उपाययोजना केल्यास या रोगाचे निवारण होऊ शकते. (चित्रपत्र १८).

लेखक : य. स. कुलकर्णी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate