অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकांवरील महत्त्वाचे रोग

पिकांवरील महत्त्वाचे रोग

"टॉस्पो'व्यतिरिक्त भाजीपाला पिकांवरील काही महत्त्वाचे विषाणूजन्य रोग

लीफ कर्ल व्हायरस

प्रजात - जेमिनीव्हायरस 
वाहक - पांढरी माशी 
रोगाची लक्षणे - लीफ कर्ल व्हायरस रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पाने खाली वाळलेली, पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाड खुजे राहते. आलेली फळे आकाराने लहान राहतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढीच्या सुरवातीच्या काळात झाल्यास फळधारणा होत नाही.

मिरचीवरील विषाणूजन्य रोग

टोबॅको लीफ कर्ल व्हायरस

या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. या किडी पानांतील अन्नरस शोषून घेऊन रोगाचा प्रसार करतात. पानांच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानांची वाढ खुंटते. पाने लहान आकाराची, वळलेली, आकसलेली आणि फिक्कट पिवळी होतात. झाडाची वाढ खुंटते. अशा रोगट झाडांना फळे लागत नाहीत, लागली तर लहान आकाराची आणि फार कमी प्रमाणात असतात. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास संपूर्ण पीक वाया जाते व उत्पादनात घट येते.

मोझॅक

स्पर्शाने पसरणाऱ्या रोगांमध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस आणि पोटॅटो व्हायरस एक्‍स या व्हायरसाचा समावेश होतो; तर मावा किडीमार्फत पसरणाऱ्या व्हायरसमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस, टोबॅको इच व्हायरस आणि चिली व्हेनल मोटल व्हायरसचा समावेश होतो. या रोगामुळे पानांचा पृष्ठभाग फिक्कट हिरवट किंवा पिवळसर होतो. त्यामुळे पाने लहान आकाराची, वाकडी, आकसलेली दिसतात. झाडाची वाढ खुंटते. अशा रोगग्रस्त झाडांना फुले-फळे कमी प्रमाणात लागतात.

कपाशीवरील "लाल्या'

कपाशीचे उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये "लाल्या' हे एक महत्त्वाचे कारण आहे. "लाल्या' विकृती ही नत्र, मॅग्नेशिअम आणि जस्ताची कमतरता आणि अन्य कारणांमुळे दिसून येते.

लक्षणे - कपाशीची प्रारंभीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अंथोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. लाल झालेली पाने शेवटी गळून पडतात.

विकृती दिसण्याची संभाव्य कारणे

1) पूर्वी कपाशी लागवड केलेल्या शेतात पुन्हा कपाशीची लागवड करणे. 
2) ऊस, केळी यांसारखी जास्त अन्नद्रव्यांची गरज असणाऱ्या पिकांनंतर त्या शेतात कपाशीचे पीक घेतल्यास त्यास आवश्‍यक प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाहीत. 
3) हलक्‍या जमिनीत कपाशीची लागवड केल्यास लाल्या विकृती दिसते. 
4) जमिनीत पाणी साचून राहिल्यास किंवा पाण्याचा जास्त काळ ताण पडल्यास झाडे जमिनीतील नत्र, मॅग्नेशिअम व जस्तासारखी आवश्‍यक मूलद्रव्ये व्यवस्थितरीत्या शोषून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे "लाल्या'ची लक्षणे दिसतात. 
5) प्रामुख्याने बोंडे धरण्याच्या अवस्थेत पानामध्ये नत्राची जास्त गरज असते. या काळात पानांमधील नत्राचे प्रमाण 1.5 टक्‍क्‍यापेक्षा कमी झाल्यास पाने लाल होतात.
6) नत्राची मात्रा विभागून न दिल्यास विकृती दिसते. 
7) बीटी जनुकामध्ये बोंडाचे बोंड अळ्यांपासून संरक्षण होते. परिणामी, झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात. या बोंडांना पोषणासाठी जास्त नत्राची गरज असते. झाडास जमिनीतून आवश्‍यक त्या प्रमाणात नत्र न मिळाल्यास बोंडासाठी लागणाऱ्या नत्राची गरज पानांतून भागवली जाते. त्यामुळे पानांतील नत्राचे प्रमाण कमी होऊन ती लाल पडू लागतात. 
8) पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाचा कालावधी काही प्रमाणात कमी होता, त्यामुळे पाने लाल पडतात. 
9) साधारणतः ऑक्‍टोबर व त्यापुढील महिन्यांत तापमान अचानक कमी झाल्यास (21 अंश से.पेक्षा) किंवा रात्रीचे तापमान 15 अंश से.पेक्षा कमी झाल्यास ऍन्थोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य पानात जमा होते, त्यामुळे पाने लाल दिसू लागतात. 
10) कपाशीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पान सुरवातीस कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पानच लालसर दिसते. 
11) तुडतुड्यांशिवाय फुलकिडे व लाल कोळ्याच्या (माईट) प्रादुर्भावामुळेही काही प्रमाणात पाने लालसर दिसतात.

नियंत्रणाचे उपाय

1) कपाशीसाठी योग्य जमिनीची निवड करावी, हलक्‍या जमिनीत कपाशीचे पीक घेऊ नये. 
2) पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये कपाशी घेणे टाळावे, पाणी साचल्यास त्वरित चर काढून ते पाणी शेताबाहेर काढून द्यावे. 
3) खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. नत्राची मात्रा कोरडवाहूसाठी दोन वेळा आणि बागायतीसाठी तीन वेळा विभागून देणे अतिशय आवश्‍यक आहे. 
4) पाते लागणे, बोंडे भरणे आदींसारख्या महत्त्वाच्या वाढीसाठी अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी. 
5) "लाल्या'ची लक्षणे दिसताच 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून शिफारशीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात किंवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे. 
6) तुडतुडे, फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल, तर नियंत्रणासाठी 20 मि.लि. फिप्रोनील (पाच एस.सी.) किंवा आठ मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (पाच एस.सी.) किंवा 20 मि.लि. बुप्रोफेझीन (25 एस.सी.) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
स्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

केळीवरील सिगाटोका

रोगाची लक्षणे

सिगाटोका हा बुरशीजन्य रोग असून, मायकोस्पेरीला म्युसीकोला या बुरशीमुळे होतो. सिगाटोका रोगाची लागण प्रथम झाडाच्या खालील पानांवर आढळून येते. सुरवातीला पानांवर, शिरेस समांतर लहान लहान लांबट गोल पिवळसर ठिपके दिसून येतात. हे ठिपके वाढत जाऊन पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात. अनुकूल वातावरणात हे ठिपके पिवळ्या रेषेच्या स्वरूपातून मोठ्या पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्‍यांत रूपांतरित होतात. हे ठिपके साधारणतः एक ते दोन मि.मी.पासून दोन ते तीन सें.मी. आकाराचे असतात. पूर्ण वाढलेल्या ठिपक्‍यांचा रंग काळपट तपकिरी असतो. कालांतराने ठिपक्‍याचा मध्यभाग वाळून राखाडी रंगाचा होतो. ठिपक्‍याभोवती पिवळसर रंगाचे वलय (कडा) दिसून येते.

रोगाचा प्रसार

रोगाच्या वाढीस आर्द्रता हा अत्यंत महत्त्वाचा घटक 
  • पाऊस, दवबिंदू, उष्ण व दमट हवा या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास अनुकूल बाबी
  • रोगाची बुरशी लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारच्या बीजाणूंची निर्मिती करते. या बुरशीचे लैंगिक आणि अलैंगिक बीजाणू पानांच्या खालच्या बाजूने पर्णरंध्राच्या पेशीतून आत शिरून रोगाची लागण करतात. दोन्ही प्रकारच्या बीजाणूंमुळे रोगाची सारखीच लक्षणे उद्‌भवतात.

रोगामुळे होणारे नुकसान

  • पानातील हरितद्रव्याचा ऱ्हास होऊन पाने करपतात.
  • झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. परिणामी, अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन पोषणाअभावी फळांची योग्य वाढ होत नाही.
  • फळे आकाराने लहान राहतात. फळांत गर भरत नाही. फळांचे वजन आणि दर्जा खालावतो.
  • रोगाची तीव्रता वाढल्यास घडांवर परिणाम होऊन घडातील फळे अकाली पिकू लागतात. अशा फळांना बाजारात मागणी नसते.

रोगाच्या प्रसारास अनुकूल बाबी

1) शिफारशीपेक्षा कमी अंतरावर दाट लागवड.

2) अयोग्य निचरा असलेल्या जमिनीत केळीची लागवड. 
3) बागेत तणांचा प्रादुर्भाव होणे, सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव. 
4) ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा अनियंत्रित वापर. 
5) मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित न काढता त्याकडे दुर्लक्ष करणे. 
6) पीक फेरपालट न करणे. 
7) खोडवा पीक घेण्याकडे वाढता कल. 
8) प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करणे.

एकात्मिक पद्धतीने सिगाटोका रोगाचे नियंत्रण

मशागतीचे (Cultural) उपाय.


1) श्रीमंती या सहनशील वाणाची लागवड करावी. 
2) शिफारस केलेल्या अंतरावरच (1.5 मी. बाय 1.5 मी. किंवा 1.8 मी. बाय 1.8 मी.) लागवड करावी. 
3) कंद प्रक्रिया केल्याशिवाय लागवड करू नये. कंद प्रक्रिया करण्यासाठी प्रति 100 लिटर पाण्यात 150 ग्रॅम ऍसिफेट + 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून केलेल्या द्रावणात कंद किमान अर्धा तास बुडवून लागवड करावी. 
4) बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. 
5) ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना हवामान, झाडाच्या वाढीची अवस्था आणि जमिनीचा मगदूर यानुसार शिफारशीत पाण्याची मात्रा द्यावी. 
6) बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. 
7) मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत. 
8) शिफारस केलेल्या अन्नद्रव्याची मात्रा (200 ग्रॅम नत्र + 40 ग्रॅम स्फुरद + 200 ग्रॅम पालाश प्रति झाड) वेळापत्रकानुसार द्यावी. रोगाची लक्षणे दिसताच पानांचा फक्त रोगग्रस्त भाग किंवा रोगग्रस्त पान त्वरित काढून जाळून नष्ट करावे. 
9) बागेत पिकाचे कोणतेही अवशेष न ठेवता नष्ट करावेत. 
10) केळी हे एकच एक पीक न घेता फेरपालट करावी. 
11) खोडवा पीक घेण्याचे टाळावे.

1) पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणन किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्‍लोरोथॅलोनिल 20 मि.लि. किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सरफॅक्‍टंट 10 मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावा. 
2) रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा ट्रायडेमॉर्फ 10 मि.लि. किंवा प्रोपिकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सरफॅक्‍टंट 10 मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावा. 
स्रोत - केळी संशोधन केंद्र, जळगाव

भातावरील कडा करपा आणि करपा रोग

कडा करपा

हा रोग जिवाणूजन्य असून, झॅन्थोमोनास ओरायझी या जिवाणूमुळे उद्‌भवतो. 
रोगाची लक्षणे - 
रोगाच्या प्राथमिक अवस्थेत, पानांच्या कडा करपतात. कालांतराने करपलेला भाग पानांच्या मध्य शिरेपर्यंत वाढतो. प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीतील बहुतांश दाणे भरत नाहीत.

रोगप्रसार

रोगाचे जिवाणू रोगग्रस्त बियाण्यांवर सुप्तावस्थेत राहू शकतात. असे बियाणे वापरल्यास रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगकारक जिवाणू पूर्वीच्या हंगामातील भात कापणीनंतर शेतात राहिलेल्या धसकटावर सुप्तावस्थेत राहतात. लव्हाळा, धूर, पाकड इत्यादी तणांवर या रोगाची लागण होते.

करपा

हा रोग पायरिक्‍युलारिया ओरायझी या बुरशीमुळे होतो. पाने, पानांचे आवरण (पर्णकोष), रोपाचे पेर, लोंबीचा देठ, दाण्याची टरफले या सर्व भागांवर रोगाची लक्षणे दिसतात.

रोगाची लक्षणे

1) रोपवाटिकेतील रोपांना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्राथमिक अवस्थेत पानांवर निळसर जांभळ्या रंगाचे अत्यंत छोटे ठिपके दिसून येतात. अशा ठिपक्‍यांचे आकारमान वाढून ते शंखाकृती किंवा मध्यभागी फुगीर आणि दोन्ही कडांकडे निमुळते होतात. पानांच्या अंतर्भागात बुरशी बीजे तयार होऊन त्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा, तर कडा तपकिरी रंगाच्या होतात. काही काळानंतर पानांवरील अनेक ठिपके एकमेकांत मिसळून संपूर्ण पान करपून जाते. रोपवाटिकेमध्ये रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास, सर्व रोपांची पाने करपतात, यालाच रोप जळणे किंवा "नर्सरी बर्न' असे म्हणतात. 
2) पेरांवर प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुजतो, पेर मोडते. 
3) लोंबीचा देठ काळा पडून कुजतो, लोंबीचा भार सहन न झाल्याने देठ कुजलेल्या भागात लोंबी मोडते. या अवस्थेला मानमोडी म्हणतात. 
4) लोंबीतील दाण्यांच्या टरफलावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. यामुळे दाण्यांचे नुकसान होते. लोंबीतील दाण्यांवर रोग आढळलेल्या शेतातील बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

रोगप्रसार

हा रोगदेखील बियाण्याद्वारे पसरतो. रोगग्रस्त शेतातील पूर्वपिकाच्या अवशेषांवर (धसकटे, पेंढा इत्यादी) रोगकारक बुरशी सुप्तावस्थेत राहते. तसेच भाताच्या रानटी जाती आणि शेताच्या बांधावर वाढणाऱ्या तणांवर बुरशी सुप्तावस्थेत राहते.

नुकसान

1) रोपवाटिकेतील रोपांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास जवळपास सर्व रोपे सुकून जातात. 
2) पानांवर अनेक ठिपके वाढल्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होऊन लोंबीतील अपरिपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते. 
3) फुटवा येण्याच्या कालावधीत रोग प्रादुर्भाव झाल्यास पेर कुजण्याचे प्रमाण वाढते. पेर कुजून मोडल्यामुळे तेथे लोंबी येत नाही.

करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

1) कर्जत 1, आयआर 36, आयआर 64, सस्यश्री, श्रीनिवास, इंद्रायणी, पवना, कुंडलिका, स्वर्णधान, आदित्य या जाती रोगास प्रतिकारक आहेत. जातीनुसार दोन रोपांमध्ये आणि ओळींमध्ये योग्य अंतर राखावे. 
2) पेरणीपूर्वी भात बियाण्यास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी चार ग्रॅम पायरोक्‍युरॉन किंवा दोन ग्रॅम ट्रायसाक्‍लॅझॉल प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. 
3) रोगग्रस्त शेतातील बियाणे पेरणीसाठी वापरू नये. शेतातील पूर्वपिकाचे अवशेष नष्ट करावेत. 
4) पाकड, धूर, लव्हाळा तणांचे नियंत्रण करावे. 
5) भात तुसाच्या राखेत असणारा सिलीका हा घटक रोपांची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्यामुळे रोपवाटिकेत प्रति चौरस मीटर क्षेत्रात एक किलो राख मिसळून बियाणे पेरावे. 
5) नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळावा. नत्र खताबरोबरच स्फुरद आणि पालाश यांचा शिफारशीनुसार वापर करावा. नत्र खताची मात्रा चार-पाच हप्त्यांत विभागून द्यावी. 
6) बुरशीनाशकांचा शिफारशीप्रमाणे वापर

 

स्रोत - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate