অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंबावरील रोग

सध्याच्या काळात डाळिंबावर तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याचबरोबरीने काही भागात फळ पोखरणारी अळी, रस शोषणाऱ्या पतंगाचादेखील प्रादुर्भाव दिसून आला आहे. या कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून सामुदायिक पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

तेलकट डाग

1) तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास ऑक्‍झिनोपोडिस पीव्ही पुनिकी या जिवाणूमुळे होतो.

2) रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले, खोड आणि फळांवर आढळून येतो. पानावर सुरवातीला तेलकट डाग पडतात. ते कालांतराने काळपट होऊन डागांभोवती पिवळी वलये दिसतात. हे डाग उन्हात बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठे झाल्यावर पाने पिवळी पडून वाळतात.

2) फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात. यामुळे फुले व कळ्यांची गळ होते.

3) खोडावर आणि फांद्यावर सुरवातीला तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होतात. खोडावर या डागांमुळे खाच तयार होते. त्या ठिकाणी झाड मोडते.

4) फळांवर सुरवातीला तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट पडतात. फळांवर लहान लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांना या डागामुळे इंग्रजी "L' किंवा "Y' अक्षरासारखे आडवे-उभे तडे जातात. फळांची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाल्यावर फळे सडून गळून पडतात.

रोगाचा प्रसार

  • रोगट मातृवृक्षापासून रोपे बनवलेली असतील तर रोगाचा नवीन प्रदेशात प्रादुर्भाव होतो.
  • बागेतील झाडामध्ये कमी अंतर असल्यास रोगट व निरोगी झाडांच्या फांद्या एकमेकांत मिसळतात. त्यामुळे रोगाची लागण होते.
  • पाऊस, बागेत वाहणारे पाणी याद्वारेसुद्धा रोगाचा प्रसार होतो. पावसाचे मोठे थेंब रोगाची लागण झालेल्या पृष्ठभागावर पडले असता त्याद्वारा उडणाऱ्या तुषारांमध्ये जिवाणू मिसळून बागेत पसरतात.
  • वारे जोरात वाहत असतील तर हे जिवाणू दूरवरच्या ठिकाणापर्यंत पोचतात.
  • बागेत माणसाद्वारे तोडणी, छाटणी, फवारणी अशी अनेक प्रकारची कामे केली जातात, त्या वेळीसुद्धा रोगाचा प्रसार होऊ शकतो.
  • बागेत वापरल्या जाणाऱ्या अवजारांचा रोगट झाडांवर वापर केल्यानंतर निर्जंतुक न करता निरोगी झाडांवर वापरल्यास रोगाचा प्रसार होतो.
  • पाने पोखरणारी अळी, फुलपाखरे, माश्‍या हेसुद्धा रोगप्रसारास सहायक ठरतात.

रोगाचे नियंत्रण

1)मागील हंगामातील संपूर्ण फळेकाढणी झाल्यानंतर 50 ग्रॅम ब्रोमोपॉल (2 ब्रोमो, 2 नायट्रो प्रोपेन 1,3 डायोल) प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

2) पावसाळ्यात फळे काढली तर 100 लिटर पाण्यात 50 ग्रॅम ब्रोमोपॉल + कॅप्टन 500 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. संपूर्ण फळेकाढणी झाल्यानंतर बागेला तीन महिने विश्रांती द्यावी.

3) बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करण्यासाठी इथेफॉन 4 ते 5 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

4) रोगट फांद्यांची छाटणी करावी. झाडांची मुळे 15 दिवस सूर्यप्रकाशात उघडी करून ठेवावीत. खाली पडलेली संपूर्ण पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत. बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर (60 किलो प्रति हेक्‍टर) किंवा कॉपर डस्ट 4 टक्के (20 किलो प्रति हेक्‍टर) या प्रमाणात धुरळणी करावी.

5) निमऑईल 200 मि.लि. + ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. झाडाच्या खोडाला याचा मुलामा द्यावा.

6) नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल 25 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 10 दिवसांनी दुसरी फवारणी करताना बोर्डोमिश्रण एक किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुन्हा दहा दिवसांनी तिसरी फवारणी करताना कॅप्टन 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात स्टिकर मिसळावा. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर 10 ते 12 दिवसांनी फवारणी करावी. रोग नसेल तर 30 दिवसांचे अंतराने फवारणी करावी. ही फवारणी फळकाढणीच्या 30 दिवसांपूर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळकाढणीच्या 20 दिवसांपूर्वी बंद करावी.

7) पानांची वाढ होण्याच्या कालावधीत पानांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी 00-52-34 कॅल्शियम नायट्रेट आणि 5 ग्रॅम सिलिकॉन प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटूनपालटून फवारणी करावी.

मर रोग

1) डाळिंबावरील मर रोग फ्युजारियम, सिराटोसिस्टोस, मायक्रोफोमीना, रायझोक्‍टॉनिया, स्क्‍लेरोशियम, त्याचप्रमाणे डाळिंबावरील खोडकिडीमुळे तसेच सूत्रकृमीमुळे मर रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

2) झाडाच्या बुंध्याजवळ सतत ओलावा राहिल्यास या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन साल कुजते. या रोगाची लागण झालेल्या फांद्यावरील पाने पिवळी पडून वाळतात. तसेच फळेसुद्धा वाळून झाडावर लटकून राहतात. कालांतराने झाड पूर्णपणे वाळते. लागण झालेले झाड उभे चिरले असता गाभ्याचा रंग काळा झालेला दिसतो.

नियंत्रणाचे उपाय

1) मर रोगाची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब हेक्‍झाकोनॅझोल 15 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 15 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी यापैकी कोणतेही एक आणि त्यात क्‍लोरोपायरीफॉस 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून यांचे द्रावण 5 लिटर/ खड्डा/ झाड या प्रमाणात रिंग पद्धतीने ओतावे. तसेच संपूर्ण झाडावर 10 ग्रॅम हेक्‍झाकोनॅझोल किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2) खोडकिडा मर रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असतो. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात गेरू 4 किलो आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण झाडाच्या खोडास जमिनीपासून दोन फुटांपर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावे.

3) सूत्रकृमीदेखील मर रोगास कारणीभूत असतात. यांच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मायुक्त बुरशीजन्य पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्यापाशी जमिनीत ओतावी. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी बागेत खोडाच्या भोवताली झेंडूची लागवड करावी.

4) मर रोगाने संपूर्ण वाळलेली झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत. अशी रोगट झाडे जाळण्यास नेताना त्यांची रोगट मुळे प्लॅस्टिक पिशवीच्या साह्याने झाकून घ्यावीत. कारण बुरशीचे बीजाणू मोठ्या प्रमाणात मुळांवर/ मुळांमध्ये असल्यामुळे चांगल्या झाडांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

फळ पोखरणारी अळी (सुरसा)

1) पावसाळ्यात मृग बहारात जास्त प्रमाणात फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

2) किडीच्या अळ्या फळे पोखरून आतील गाभा खातात. यामुळे फळामध्ये इतर बुरशीचा व जिवाणूंचा शिरकाव होऊन फळे कुजतात.

3) फळाचा विशिष्ट प्रकारचा उग्र वास येतो. अळीने फळात प्रवेश केलेल्या छिद्रातून तिची विष्ठा बाहेर पडताना किंवा फळाला लटकलेली दिसते; यावरून या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. म्हणूनच या किडीचे व्यवस्थापन फुलोऱ्याच्या अवस्थेपासून करावे.

डाळिंबावरील रस शोषणारा पतंग

1) किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे रात्री 8 ते 11 वाजताच्या दरम्यान जास्त प्रमाणात दिसून येतो. पतंग बागेतील पक्व फळांमध्ये सोंड खुपसून सूक्ष्म छिद्र पाडून आतील रस शोषण करतात.

2) अशा छिद्र पाडलेल्या जागेवर गोलाकार चट्टा तयार होऊन त्या जागी फळ सडण्यास सुरवात होते. अशी प्रादुर्भाव झालेली फळे गळून पडतात.

झाडांची साल खाणारी अळी

1) साल खाणारी अळी ही खोड व फांद्याच्या बेचक्‍यात छिद्र पाडून त्यात राहते.

2) अळीची विष्ठा, तसेच चघळलेला लाकडाचा भुसा जाळीच्या स्वरूपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसतो.

एकात्मिक पद्धतीने किडींचे नियंत्रण

  • बागेतील खाली पडलेली, तसेच झाडावरील राहिलेली सर्व कीडग्रस्त फळे तोडून जाळून नष्ट करावीत.
  • खोडालगत जमिनीत निंबोळी पेंड 1 टन प्रति हेक्‍टरी मिसळावी.
  • क्‍लोरोपायरीफॉस 50 मि.लि. आणि कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन खोडालगत जमिनीत मिसळावे किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी अधिक पॅसिलोमायसिस लिलासिनस 2.5 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळावे.
  • निंबोळी अर्क 5 टक्के किंवा निंबोळीयुक्त कीटकनाशक (1000 पीपीएम) 2.5 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फळे पक्व होण्याच्या कालावधीत रात्रीच्या वेळी टेंभा घेऊन बागेतील फळांवरील रस शोषणारे पतंग गोळा करून मारावेत.
  • ऍझाडिरेक्‍टिन (10,000 पीपीएम) 20 मि.लि. किंवा इमामेक्‍टिन बेंझोएट 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फुलांवर, फळांवर आलटूनपालटून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी.

 

संपर्क - डॉ. राजेश राठोड - 7773952307.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate