অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भातावरील लष्करी अळी

यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणी उशिरा झाली. पर्यायाने पाण्याअभावी पुनर्लागवड वेळेत होऊ शकली नाही. भात रोपांचे वाढलेले वय आणि या रोपांची उशिरा लागवड झाल्यामुळे तेथे सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. काही ठिकाणी पाऊस आणि अचानक दोन ते तीन दिवस उघडीप दिसून येत आहे. असे वातावरण लष्करी अळीच्या प्रादुर्भावास पोषक आहे.

सुरळीतील अळी

ओळखण्याच्या खुणा

1) किडीचा पतंग लहान, नाजूक व दुधाळ पांढऱ्या रंगाचा असून, त्याच्या पंखाची लांबी 8-11 मि.मी. एवढी असते. पंखावर फिकट काळ्या रंगाचे लहान ठिपके असतात.

2) अळी पारदर्शक फिकट पांढरट रंगाची असते. पूर्ण वाढलेल्या अळीची लांबी 20 मि.मी. असते.

नुकसानाचा प्रकार

1) अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते. त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी सुरळीसह भाताच्या ओव्यावर चढून पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसतात.

2) प्रादुर्भावामुळे पीक निस्तेज दिसते, वाढ खुंटते.

3) सुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगताना दिसतात.

जीवनक्रम

1) रोपाच्या पानावर एक मादी सुमारे 60 ते 150 अंडी घालते. त्यातून 4 ते 5 दिवसांनी छोट्याशा पारदर्शक हिरवट रंगाच्या अळ्या बाहेर येतात.

2) अळी पानाचा छोटासा तुकडा कापून त्याची सुरळी करून त्यात राहते. सुरळी एका बाजूने बंद असते. अळी दिवसा सुरळीमध्ये राहते. अशा सुरळ्या शेतामध्ये पाण्यावर तरंगताना आढळून येतात.

3) अळी अवस्था 14 ते 20 दिवस टिकते. सुरळीतच कोष तयार होतो. कोषातून 4 ते 7 दिवसांनी पतंग बाहेर येतो.

4) किडीची एक पिढी पूर्ण होण्यास 19 ते 37 दिवस लागतात.

आर्थिक नुकसानाची पातळी

अ) लागवडीपासून फुटवे येईपर्यंत - दोन नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रति चूड.

ब) फुटवे येण्याची अवस्था - दोन नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रति चूड.

क) लोंबी निसवण्यापासून फुले घेण्यापर्यंतची अवस्था - दोन नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रति चूड.

एकात्मिक व्यवस्थापन

1) शेतात पाणी बांधून ठेवावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढावे, म्हणजे पाण्याबरोबर खाली पडलेल्या सुरळ्या वाहून जातात. त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

2) शेतातील पाणी शक्‍य असल्यास काढून टाकावे. त्यानंतर 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारील भुकटी 1000 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी. फवारणी शक्‍यतो तिन्हीसांजेच्या वेळी करावी.

लष्करी अळी

ओळखण्याच्या खुणा

1) किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व मजबूत बांध्याचा असतो.

2) अळी सुरवातीला हिरवट रंगाची असते. तिच्या दोन्ही बाजूंस पांढरा पिवळसर पट्टा असतो. नंतर ती किंचित करड्या रंगाची होते.

3) पूर्ण वाढलेली अळी 30 ते 37 मि. मी. असते. पतंगाचा विस्तार 35 ते 40 मि.मी. एवढा असतो.

नुकसानाचा प्रकार


1) किडीचा प्रादुर्भाव हंगामाच्या सुरवातीस बांधावरील गवतावर आढळून येतो. बांधावरील गवत खाल्ल्यानंतर अळ्या भातावर प्रादुर्भाव करतात. दिवसा अळ्या जमिनीत किंवा चुडामध्ये लपून राहतात. रात्रीच्या वेळी अळ्या बाहेर येऊन पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात.

2) रोपवाटिकेत अळ्या जमिनीलगत रोपे कापून खातात. एकही रोप शिल्लक राहत नाही. रोपवाटिकेत सर्वत्र अळ्यांच्या विष्ठेच्या पांढरट -हिरवट साबूदाण्यासारख्या गोळ्यांचा सडा दिसतो. चुडामध्येदेखील विष्ठेच्या गोळ्या आढळून येतात.

3) लोंबीत दाणे भरल्यानंतरही या किडीचा उपद्रव होतो. रात्रीच्या वेळी अळ्या लोंब्यांवर चढतात आणि लोंब्या कुरतडून खातात.

4) अळ्या अतिशय खादाड असल्यामुळे लोंब्यांवर अधाशासारख्या तुटून पडतात. दाणे खाण्यापेक्षा लोंब्या कुरतडून टाकून त्या अतोनात नुकसान करतात.

5) एका शेतातील अन्नसाठा संपल्यानंतर अळ्या हजारोंच्या संख्येने शेजारच्या शेतात जातात.

जीवनक्रम


1) किडीची मादी 1500 ते 2000 अंडी सहा पुंजक्‍यांत गवताच्या किंवा भात रोपाच्या पानावर घालते.

2) एका पुंजक्‍यात 150 ते 200 अंडी असतात. अंड्यातून 5 ते 9 दिवसांनी अळ्या बाहेर पडतात.

3) अळीची वाढ 18 ते 22 दिवसांत पूर्ण होते. ती जमिनीत जाऊन कोष करते.

4) कोषातून 10 ते 14 दिवसांनी पतंग बाहेर येतो. 20 ते 30 दिवसांत एक पिढी पूर्ण होते.

आर्थिक नुकसानाची पातळी
फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि त्यानंतर : 4 ते 5 अळ्या प्रति चूड.

एकात्मिक नियंत्रणाचे उपाय

1) शेताच्या बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.

2) किडीचे अंडीपुंज गोळा करून त्यांचा नायनाट करावा.

3) शेतात पाणी बांधून ठेवावे. त्यामुळे अळ्यांना लपायला जागा राहत नाही आणि अळ्या रोपावरती चढतात. पुढे त्या पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात.

4) बेडकांचे शेतात संवर्धन, संरक्षण करावे. कारण बेडूक या किडीच्या अळ्या खातो.

5) पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर 4 ते 5 अळ्या प्रति चौ. मी. आढळल्यास सायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना डायक्‍लोरव्हॉस (76 टक्के प्रवाही) 2.5 लिटर किंवा क्‍लोरोपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 2.5 लिटर प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची एक हेक्‍टर क्षेत्रावर फवारणी करावी.

संपर्क - प्रा. व्ही. एन. जालगावकर - 9422487393
(लेखक प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate