অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजीर

प्रस्‍तावना

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकटया पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) 10-12 गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते.

अंजीर हे कमी पाण्‍यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्‍मानाबाद येथे (अंजीराची) लागवड शेतकरी करू लागले आहेत.  त्‍यावरुन अंजीर हे सर्व दुष्‍काळी भागात उत्‍तम होईल असे म्‍हणायला हरकत नाही.

अंजीर हे पोषणदृष्‍टया पौष्‍टीक फळ आहे. तसेच ते औषधी आहे. ताज्‍या अंजीरात 10 ते 28 टक्‍के साखर असते. चुना, लोह व अ आणि क जीवनसत्‍वे यांचा उत्‍महाराष्‍ट्रम पुरवठा होतो. अंजीर हे सौम्‍य  रेचक असून शक्‍तीवर्धक, पित्‍तनाशक व रक्‍तशुध्‍दी करणारे असल्‍यामुळे इतर (फळांपेक्षा) अधिक मौल्‍यवान समजले जाते. दम्‍यावरही त्‍याचा अतिशय उपयोग होतो.

हवामान

उष्‍ण व कोरडे हवामान अंजिराला चांगले मानवते. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात हे फळ आणखी मोठया क्षेत्रात करायला भरपूर वाव आहे. कमी उष्‍णतापमान या पिकाला घातक ठरत नाही. ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे घातक ठरते. विशेषतः कमी पावसाच्‍या भागात जिथे ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत पाण्‍याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी अंजिर लागवडीस वाव आहे.

जमीन

अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम होय. मात्र या जमिनीत चुन्‍याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्‍य असते. खोलगट आणि निचरा नसलेल्‍या जमिनीत हे झाड पाहिजे तसे चांगले वाढत नाही.

सुधारीत जाती

अंजिराच्‍या अनेक जाती आहेत. त्‍यात सिमरना, कालिमिरना, कडोटा, काबूल, मार्सेल्‍स, (व्‍हाईट सान पेट्रो) आदी जाती प्रसिध्‍द आहेत. पुणे भागातील पुना अंजीर नावाने प्रसिध्‍द असलेली जात (ऍड्रिऍटिक ) किंवा कॉमन या प्रकारातील असून महाराष्‍ट्रात मुख्‍यतः हीच जात लावली जाते.

अभिवृध्‍दी किंवा रोप तयार करणे

अंजिराची अभिवृध्‍दी फाटे कलमाने केली जाते. खात्रीच्‍या बागायतदाराच्‍या रोगमुक्‍त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून नंतर त्‍यातून उत्‍महाराष्‍ट्रम व दर्जेदार फळे देणारी झाडे निवडावीत व अशा झाडावरील 1.25 सेमी जाडीच्‍या आठ ते बारा महिने फांदया कलमासाठी निवडतात. लावण्‍यासाठी फाटेकरताना फांदीच्‍या तळाचा भाग व शेंडयाकडील कोवळा भाग छाटून टाकावा व मधला भाग रोपे तयार करण्‍यासाठी वापरावा. फाटे कलम तीस ते चाळीस सेमी लांब असावेत. त्‍यावर किमान चार ते सहा फूगीर व निरोगी डोळे असावेत. कलमांचा तळाचा काप डाहेळयाच्‍या काही खाली घ्‍यावा. आणि वरचा काप डोळयाच्‍या वर अर्धा सेमी जागा सोडून घ्‍यावा. दोन्‍ही काप गोलाकार घ्‍यावेत. फाटे कलम गादी वाफयावर 30 × 30 सेमी वर किंवा दोन डोळे मातीत जातील अशी लावावीत. कलमे किंचीत तिरिपी करावीत. लावण्‍यापूर्वी कलमाच्‍या बुडांना आय.बी.जे. किंवा सिरेडिक्‍स यासारखे एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले तर मुळया लवकर फूटतात.

लागवड

पावसाळयापूर्वी मे महिन्‍यात 5 × 5 मीटर अंतरावर 0.60 × 0.60 × 0.60 मिरटरचे खडडे घ्‍यावेत. शिफारस केलेल्‍या अंतरानुसार अंजीर फळपिकाची लागवड केल्‍यास हेक्‍टरी 400 झाडांची लागवड होवू शकते. चांगली माती, पोयटा, शेणखत, रासायनिक खत सिंगल सुपर फॉस्‍पेट 1/2 किलो प्रति खडडा व थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरुन पावसाळयापूर्वी खडडे भरुन घ्‍यावेत. जून, जूलै मध्‍ये जमिनीत पाऊस पडून भरपूर ओल झाल्‍यावर अंजीराची मुळे फूटलेली रोपे खडडयात लावावीत. रोपावर भरपूर पाने फूटलेली असल्‍यास फक्‍त 2 ते 3 पाने ठेवून बाकीची पाने खोडाला इजा न होता काढून टाकावीत. खडडयात मधोमध रोप लावून पाण्‍याची चूळ द्यावी नंतर कलम रूजेपर्यंत ती चार दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे.

खते

अंजीराच्‍या झाडांनी नीट व जोमाने वाढ होण्‍यासाठी लागवडीच्‍या सुरुवातीच्‍या काळात नियमित खते द्यावीत. एक वर्षाच्‍या झाडाला साधारणपणे 1 घमेले शेणखत व 100 ते 150 ग्रॅम अमोनियम सल्‍फेट पुरेसे होते. दरवर्षी हे प्रमाण वाढवीत नेऊन 5 वर्षे वयाच्‍या झाडांना 4 ते 5 घमेली शेण खत व 1 किलो अमोनियम सल्फेट द्यावे. लहान झाडांना खते नेहमी पावसाळयाच्‍या सुरुवातीला घालावीत नंतर मात्र मोठया झाडांना खते विश्रांततीचा काळ संपताना म्‍हणजे सप्‍टेबर महीन्‍याच्‍या अखेरीस द्यावीत. 5 ते 6 वर्षे वयाच्‍या झाडास 600 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्‍फूरद व 250 ग्रॅम पालाश दिल्‍याने फळे चांगल्‍या प्रतीची मिळतात.

पाणीपुरवठा

अंजीराच्‍या झाडाला फार पाणी लागत नाही. परत फळझाड वाढीच्‍या काळात हंगाम, जमिनीचा मगदूर व मशागतीचा प्रकार यानुसार जरुरीप्रमाणे नियमित पाणी द्यावे झाड फळावर आल्‍यावर ऑक्‍टोबर ते मे महिन्‍यात नियमित पाणी द्यावे. जूलै व ऑगस्‍ट हा काळ झाडाच्‍या विश्रांतीचा असतो. फळे लागून वाढत असताना पाण्‍यात हयगय होऊ देऊ नये.

कारण त्‍यामुळे फळांच्‍या आकारावर अनिष्‍ठ परिणाम होतो. फळे पिकू लागल्‍यावर मात्र पाणी अतिशय कमी म्‍हणून आळी नुसती ओली होतील एवढे द्यावे. कारण अधिक पाण्‍याने फळाची गोडी कमी होते. फळे तोडणे पूर्ण झाल्‍यावर झाडाचे पाणी बंद करावे.

आतरपिके

आंतरपिके घेताना मूळ बागेची हेळसांड होता कामा नये व फळझाडांना आंतरपिकापासून उपद्रव ही होवू नये यासाठी आंतरपिकाची निवड फार महत्‍वाची ठरते. ही आंतरपिके कमी कालावधीची तर असावीतच शिवाय त्‍यांची मुळे खूप खोल जाणारी नसावीत. ताग, धैंचा वगैरे सारखी हिरवळीची पिके फरसबी, मटकी यासारखी व्दि‍दल पिके घेतल्‍याने जमिनीची प्रत सुधारण्‍यास मदत होते. ज्‍यावेळी आंतरपिक घेतले नाही त्‍यावेळी बाग स्‍वच्‍छ ठेवणे हे तितकेच जरुरीचे आहे.

बहार धरणे

अंजीराला दोन वेळा फळ बहार येतो. पावसाळयात येणा-या बहाराला खटटा आणि उन्‍हाळयात येणा-या बहाराला मीठा बहार म्‍हणतात. खटटा बहारातील फळे जूलै किवा ऑगस्‍टमध्‍ये तयार होतात, परंतु ती अत्‍यंत बेचव असतात. त्‍यामुळे त्‍यांचा जेली कोथिंबीर रण्‍याकरिता उपयोग केला जातो. मीठा बहारातील फळे मार्च, एप्रिलमध्‍ये तयार होतात. फळांचा दर्जा व उत्‍पन्‍न चांगल्‍या प्रतीचे मिळते व बाजारभाव सुध्‍दा चांगला मिळतो. त्‍यामुळे शेतकरी बांधवांनी या बहाराची खास काळजी घ्‍यावी. यासाठी सप्‍टेबर महिन्‍यात एक उथळ नांगरट करुन एक दोन आठवडे ताण द्यावा. मागील वर्षाच्‍या फांद्यांची पध्‍दतशिरपणे छाटणी करुन वर नमुद केल्‍याप्रमाणे खताची मात्रा दयावी. यावेळी शेणखत स्‍फूरद, पालाश व नत्राचा निम्‍मा हप्‍ता द्यावा. वाफे किंवा आळी बांधून बागेस पाणी देणे सुरु करावे. झाडांची सुप्‍तावस्‍था संपून त्‍यांना पाणी आणि खतांचा पुरवठा होताच ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्‍यान झाडावर नवीन फूट व फळे वाढीस लागतात. फळांची वाढ चांगली होण्‍यासाठी नत्राचा उरलेला हप्‍ता नोव्‍हेंबर अखेर द्यावा. फळे वाढू लागल्‍यापासून फळे निघेपर्यंत पाण्‍याची उणिव भासू देऊ नये.

फळांची काढणी

दुस-या वर्षापासून अंजिरास थोडी थोडी फळे येऊ लागतात. परंतु फळाचे उत्‍पादन झाडे उत्‍महाराष्‍ट्रम पोसेपर्यंत घेऊ नयेत. चवथ्‍या वर्षापासून उत्‍पादन घेण्‍यास हरकत नाही. सात आठ वर्षाची झाडे झाल्‍यावर उत्‍पादन चांगले येते. उत्‍तम काळजी, मशागत, खते दिली तर एका झाडापासून 25 ते 40 किलो फळे मिळतात.

बहार धरल्‍यापासून 120 ते 140 दिवसात फळे काढणेस तयार होतात. फळ पक्‍व होताना फळावरील हिरवी छटा जाऊन फळ पिवळसर लालसर व जांभ्‍ळया रंगात दिसू लागते. पक्‍व फळ देठासह धारदार चाकूने कापून काढावे. दर दोन दिवसांनी फळ तोडणी करावी. फळे लवकर तयार होणेसाठी केलेंल्‍या प्रयोगांत ऍन्‍सीमिडाल 250 पीपीएम  या प्रमाणात झाडावर फवारले असता फळे महिना ते सव्‍वा महिना आधी तयार होतात.

अंजिर सुकविणे

अंजीर सुकविण्‍यासाठी पुना अंजीर ही जात सर्वोत्‍कृष्‍ट आहे. उत्‍तम पिकलेली बिनडंखी अंजीराची फळे घ्‍यावीत. बाहेरुन बंद होणारी पेटी घेऊन त्‍यात काढता घालता येतील असे जाळीचे खण करुन घ्‍यावेत. जाळीवर पिकलेल्‍या अंजिराची फळे पसरावीत. पेटीच्‍या खालच्‍या खणात निखा-याची शेगडी ठेवण्‍याची सोय करावी. धुरी देण्‍याचेवेळी जाळीवर फळे ठेवून निखा-यावर गंधकाची पावडर टाकून पेटी बंद करावी. हे  काम द्राक्षाच्‍या धुरी देण्‍याच्‍या चेंबरमध्‍येही करता येईल. धुरी देऊन झाल्‍यावर अंजीर पांढरे पडतात. गंधकाची धुरी दिल्‍याने फळावरील बुरशी मरून जाते व तिचे पुढील कार्य थांबते. त्‍यानंतर धुरी दिलेली फळे पेटीच्‍या बाहेर काढून धूळ कचरा येणार नाही अशा जागी सुकत ठेवावी. 5 ते 6 दिवसातच अंजिर सुकतात. एक किलो ओल्‍या अंजिरापासून 300 ग्रॅम्‍ सुके अंजीर मिळतात. सुकलेल्‍या अंजीरांना गोलाकार आकार देऊन एक लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम मिठ घातलेल्‍या मिश्रणात थोडा वेळ हे सुकलेले अंजीर बुडवावे व नंतर पूर्ण सुकून अंजीर साठवून ठेवावेत.

अंजीरावरील किडी व त्‍याचे नियंत्रण

तुडतुडे : कोवळी पाने, फांद्या व फळे यातील रस तुडतुडे शोषून घेतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा पिवळया पडून नंतर संपूर्ण पान तपकिरी होवून वाळते. किडीच्‍या तीव्र उपद्रवात फळांची वाढड खुंटते व फळे गळून पडतात. बहार धरल्‍यानंतर रोजच्‍या रोज बागेवर लक्ष ठेवून किड आढळताच नियंत्रणाचे उपाय करावेत. यासाठी बहाराच्‍या आरंभीच 100 लिटर पाण्‍यात 200 मिली रोगार 250 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक घालून फवारा द्यावा.

कोळी किड : ही अत्‍यंत सुक्ष्‍म आकाराची किड आहे. या किडीमुळे पाने सुकतात कारण ही कीड पाने व फळे समुहाने कुरतडते व रस शोषून घेते. फळे विद्रूप दिसतात व अपुरी वाढ होवून गळतात. किडीची लक्षणे दिसताच 100 लिटर पाण्‍यात 250 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक घालून फवारावे.

सालबुंधा पोखरणारी आळी : झाडाच्‍या  बुंध्‍यावर किंवा फांदीवर भोक पाडून आळी आत जाते व आतील मगंज खाऊन घाण बाहेर टाकते. अशी घाण दिसल्‍यावर आपणास अळीचा उपद्रव दिसतो. किड होवू नये म्‍हणून झाडाचे नियमित निरिक्षण करत जावे. भूसा पडलेला दिसताच आळीने पाडलेले भोक शोधून अळी बाहेर काढून मारावी. अळी न निघाल्‍यास भोकात पेट्रोल किंवा बोअरसोल्‍युशन कापसाच्‍या बोळयाने आंत सोडावे व भोक चिखलाने बंद करावे.

पाने खाणारी अळी : पाने खाणारी अटी पानाकडून मध्‍य शिरेकडे पानाचा भाग कुरतडून खाते. मोठया प्रमाणावर उपद्रव झाल्‍यास झाडाची पाने नष्‍ट होवून पिकाचे नुकसान होते.  बागेवर 100 लिटर पाण्‍यात 100 मिली मॅलेथिआन किंवा नुवाक्रान किडनाशक फवारावे.

खवले किड : खवले किडीचा उपद्रव अंजीरावरही होतो. ही किड फांद्या कोवळया फुटी, डोळे यावर समुहाने राहून रस शोषतात. या उपद्रवाने कोवळा फांद्या वाळतात. फळाचा आकार बेढब होतो. फळाची चव बिघडते खवल े किडीच्‍या अंगावर जाड कवच असल्‍याने तिच्‍यावर या फवारलेल्‍या स्‍पर्श विषाचा काहीही उपयोग होत नाही, त्‍याकरीता नुऑक्रॉन, रोगार, डिमॅक्रॉन अशा अंतरप्रवाही औषधाचे किड संपूर्ण नष्‍ट होईपर्यंत औषधाचे फवारे द्यावेत.

अंजीरावरील रोग व त्‍याचे नियंत्रण

तांबेरा : पावसाळयात एक प्रकारच्‍या बुरशीपासून अंजीरावर तांबेरा होतो. हिवाळयात हवामान दमट राहीले तर नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी अखेरपर्यंत हा रोगा पानावर तांबडया ठिपक्‍यात आढळून येतो. नंतर हे ठिपके काळे पडून पाने गळतात. पाने गळून पडल्‍यामुळे साल उघडी होते व उन्‍हामुळे सालीवर करपल्‍यासारखे चटटे पडतात. त्‍यामुळे फांद्या कमजोर होवून फांदयावरील फळे न पोसता गळून पडतात. उन्‍हाळयात गळणारी अंजीराची पाने गोळा करुन जाळून टाकावीत. ऑक्‍टोबरच्‍या फूटव्‍यावर तसेच पानावर 3-3-50 बोर्डो मिश्रण किंवा 100 लिटर पाण्‍यात 200 ग्रॅम ब्‍लायटॉक्‍स 50 टक्‍के घालून फवारावे. बावीस्‍टीनचे 1 टक्‍का द्रावण फवारावे.

भूरी : अंजीरावर भूरी रोगही होतो. त्‍यासाठी भूरी दिसताच 100 लिटर पाण्‍यात 100 ग्रॅम बावीस्‍टीन घालून फवारावे.

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate