चिंचेची रोपवाटिका तयार करण्यासाठी बियांची (चिंचोक्यांची) गरज असते. ज्या वेळी चिंचा पिकून वाळतात त्या वेळी त्यातील चिंचोके काढावेत. जमिनीवर गळून पडलेल्या चिंचा गोळा करून त्यातील बी रोपवाटीकेसाठी घेऊ नये. कारण त्या चिंचा पक्व नसतात. त्यांतील बी पक्व नसते. कधी कधी खाली पडलेल्या चिंचा किडलेल्या असतात, पोकळ असतात. झाडावरून काढलेल्या चिंचांचे बी रोपांसाठी वापरावे. त्यांची उगवणक्षमता चांगली असते. चिंचातून काढलेले चिंचोके धऊन घ्यावेत व उन्हात वाळत घालवेत. नंतर पॉलिथिनच्या बागेत भरावेत. कोरड्या जागेत त्यांचा साठ करावा. चिंचोके एक वर्षापर्यंत चांगले राहतात. त्यांना कीड लागू नये म्हणून ओलसर जागी न ठेवता ते कोरड्या जागेत ठेवावेत. एक वर्षाने रोपांसाठी साठा वापरता येतो. ताज्या बियांची उगवण क्षमता ८५% असते. साठा केलेल्या जुन्या बियांची उगवण क्षमता ४५% असते. म्हणून रोपवाटीकेसाठी ताजे बी वापरणे योग्य असते.
एक किलो वजनात १३०० ते १८०० चिंचोके येतात येतात. त्यांची ७०० रोपे तयार होतात. रोपवाटीकेसाठी मार्च-एप्रिल महिन्यात गादी वाफे तयार करावेत. या गादीवाफ्यात ताजे बी पेरावे. बिया लावताना त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते. परंतु उकळून थंड केलेल्या पाण्यात २४ तास चिंचोके ठेवल्यास ते चांगले रुजतात. त्यांची उगवणक्षमता वाढते. गाडीवाफ्यातील वाळूमिश्रित किंवा भुसभुशीत मातीत बिया चांगल्या रुजतात, रोपटी चांगली वाढतात. रोपांच्या वाढीस पुरेशा सावलीची गरज असते. धुक्याचा मात्र रोपास उपद्रव होतो. धुक्याचा त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. पेरलेल्या बिया एक आठवड्यात उगवायला लागतात. बिया मातीच्या वर उगवतात. त्यांच्या मुख्य मुळास २/३ किंवा अनेक मुळे फुटतात. त्यांच्या कोंबास दोन पाने असतात. तसेच कोंबांवरील प्रत्येक गाठीवर दोन फांद्या फुटतात. एक महिन्यात रोपाची उगवण पूर्ण होते. तीन-चार महिन्यांत रोप एक फुट उंच वाढते. ही रोपे गादी वाफ्यातून काढून पॉलिथीनच्या बागेमध्ये लावावीत. रोप पुरेसे वाढल्यावर पावसाळ्यात आपणास पाहिजे त्या ठिकाणी खड्ड्यात त्यांची लागवड करावी. रोपांची मुळे व शेंडे वाढतात. त्यांची वाहतूक मात्र काळजीपूर्वक करावी. दुसर्या वर्षाच्या पावसाळ्यात रोपांची लागवड करावयाची असल्यास रोपवाटिकेत रोपे जतन करून ठेवावी. रोपांची मुळे व शेंडे वाढतात. त्यांची योग्य रीतीने काळजी घ्यावी.
बियांशिवाय रुटींग, कटिंग, डोळा भाराने, भेट कलम, गुटी कलम, अंतरीक्ष कलम, सिरीकल्चर, टिश्यू कल्चर या पद्धतीनेही चिंचेची चांगली रोपे तयार करता येतात. पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने मायक्रो प्रोपोगेशन पद्धतीने सशक्त चिंच-रोपे तयार केली आहेत.
पन्नास प्रकारच्या जाती-उपजातींचे किडे-कीटक चिंचेच्या झाडाला उपद्रव पोचवतात. मेली बग (रान ढेकुण) नावाचे किडे झाडातला अर्क शोषण करतात. मावा व खवल्याचे किडे कोवळ्या पालवीवर डल्ला मारून पाने खातात. सुरवंट, अळ्याही पाने कुरतडतात, फुले खातात, कोवळे चिंचोके खातात. कोवळ्या पानातला रस शोषल्याने रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडकीड, पिठ्या ढेकुण, मावा इत्यादी १५ प्रकारचे कीटक पानातला व खोडातला रस शोषणारे आहेत.
आठ प्रकारच्या किडे पाने, फुले व बियांचे नुकसान करणारे आहेत. काही कीटक कळ्या, फुले व चिंचफळांना भोके पडतात. काही चिंच फळातला रस शोषण करतात. कोवळ्या चिंचोक्यातला रस शोषतात. फळातला रस शोषणार्या कीटकांच्या आठ जाती आहेत. पण कुरतडणारे कीटक अकरा प्रकारचे आहेत. आठ प्रकारचे किडे व अळ्या साठवणुकीतल्या चिंचोक्यांवर डल्ला मारतात.
अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग रोपवाटीकेतील जुन्या रोपांवर पडतात. या रोगात रोपांची पाने गळून रोप मारते. पावडरी मिलड्यू हा रोग ही रोपवाटीकेतील रोपांवर पडतो. चिंच-रोप लागवडीनंतरही त्यावर अनेक रोगांचा हल्ला होतो. बहुतेक रोग बुरशीजन्य असतात. या रोगांत पानांवर डाग पडून पाने पिवळी पडतात. पाने गळायला लागतात. मुळे सडतात व रोप मरते. पानांवर लहान लहान काळे डाग पाडणारे जीवाणू चिंचेचे शत्रू आहेत. यात पाने काळी पडून झाडे मरतात. कीड व रोगांवर सल्फरडस्ट, कॅरथिन, कँलक्सीन ही प्रतिबंधक औषधे उपयोगी पडतात. जहरी रासायनिक औषधांपेक्षा कडूलिंबापासून बनवलेली चांगली औषधे बाजारात आली आहेत. चिंचेवरील रोग व किडींसाठी ही औषधे उपयुक्त आहेत.
माहिती लेखन : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 4/23/2020
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...