निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात घडाच्या आकारमानाला तसेच द्राक्षमण्याच्या आकारमानाचा मोलाचा वाटा आहे. मागील लेखात आपण द्राक्षमण्यांच्या घडाचे आकारमान वाढविण्याकरिता जीएचा वापर याविषयी माहिती घेतली घेतली. घडाच्या आकारमानासोबतच मण्याच्या आकारमानाला तितकेच महत्त्व आहे. मणी आकारमान वाढविताना पाकळ्यांची विरळणी, मण्यांची विरळणी, घडाचा व काडीचा शेंडा मारणे ही कामे केली जातात.
द्राक्षघडाचे आकारमान वाढविताना घडामध्ये मण्यांची संख्या 500 पेक्षा जास्त असू शकते. एवढे सर्व मणी घडावर ठेवल्यामुळे मण्याच्या विकासाला बाधा पोचते. स्वाभाविकतः मण्यांचा आकार लहान राहतो. निर्यातक्षम द्राक्षमण्यांचे आकारमान साधारणतः 20 मि.मी. व देठाची लांबी 2.5 द्राक्षमणी प्रति सें.मी. असायला हवी, घड सुटसुटीत दिसायला हवा.
घड कॅपफॉल अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर पाकळ्यांची विरळणी त्वरित करून घ्यावी. घडांचा शेंडा फुलोरा अवस्थेत सुटला नसल्यास घडाच्या आकारानुसार खुडावा. बऱ्याच वेळा डीपिंगच्या दरम्यान घडाच्या वरील भागातील मणी लहान आकाराचे असल्याचे जाणवते. पूर्णपणे संजीवकाच्या द्रावणात बुडविले जात नाहीत. अशावेळी हे मणी घडाचा विस्तार लक्षात घेऊन वरील एक किंवा दोन पाकळ्या काढाव्यात. त्यामुळे घड बुडविणे सुलभ होते. मणी आकार वाढण्यासोबतच एकसारखे सुलभ होते. मणी आकार वाढण्यासोबतच एकसारखे आकाराचे मणी मिळतात. त्यानंतर तीन पाकळ्या सोडून एकानंतर एक पाकळी या पद्धतीने विरळणी करावी. जेणेकरून 100 ते 150 मणी घडावर ठेवता येतील व प्रत्येक मण्याचे पोषण होईल.
द्राक्ष बागेत मण्याच्या विरळणीच्या कामाला सर्वांत जास्त मजूर लागत असल्याचे दिसून येते व या कामासाठी बराच कालावधी लागतो. सुरवातीलाच योग्य प्रमाणात घडामध्ये मणी ठेवून विरळणी केल्यास पुढे विरळणीचा त्रास होत नाही. मण्यांचा आकार वाढण्यास मदत होते. मण्यांचा आकार तीन ते चार मि.मी. असताना मण्यांच्या विरळणीचे काम पूर्ण व्हायला हवे. मण्यांच्या वाढीमध्ये सीपीपीयू सर्वांत कार्यक्षम समजले जाते. या वर्षी कॅनॉपी भरपूर मिळाल्यामुळे सीपीपीयूचा वापर करणे सहज शक्य होईल. त्यामुळे मणी आकारमान वाढविण्यास मदत होऊ शकेल.
संजीवकांच्या वापराशिवाय मण्यांचा आकार वाढविणे शक्य नाही; परंतु संजीवकांचे इष्ट परिणाम घडवून आणण्यासाठी संजीवकाच्या वापरासोबतच वेलीवरील पानांची संख्या, बागेतील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य असायला हवे. जेणेकरून प्रकाश संश्लेषणाद्वारे पानातून कार्बोहायड्रेट किंवा अन्नद्रव्ये ही प्रभावीपणे आकर्षित करून घडापर्यंत पोचविण्याचे कार्य साधले जाईल. पानांच्या क्रियाशीलतेमुळे मुळांचे योग्य गतीने कार्य सुरू असल्यामुळे मण्याचे आकारमान वाढविणे सहज शक्य होईल.
कमी जाडीच्या काडीच्या बागेत जर -----होईंग ते शटर स्टेज दरम्यान जास्त फवारण्या करण्यात आल्या तर त्या बागेतील मणी बारीक झाल्याचे आढळते. जास्त जीए व सीपीपीयूच्या वापरातून मण्यांचे आकारमान वाढविले जाते; परंतु त्यातील टीएसएस प्रमाण कमी होऊन मणी मऊ बनतात. रंगीत द्राक्षामध्ये काही पांढरे राहतात. घडातील बाजूचे किंवा टोकाकडील मणी कधी कधी पूर्ण घडसुद्धा प्रादुर्भावित झाल्याचे आढळते आणि याचे प्रमाण काढणीपर्यंत वाढतच जाते.
या वेळी बऱ्याच बागेत मण्यांची जळ होताना दिसत आहे. ही विकृती सर्व साधारणतः द्राक्षातील सर्वच जातींमध्ये दिसून येते. ही विकृती दोन गोष्टींमुळे दिसून येते. पहिली बाब म्हणजे प्रखर उष्णता व दुसरी गोष्ट म्हणजे अतिनील किरणांचा द्राक्षमण्यांवर सततचा मारा. जातिपरत्वे ही विकृती कमी- जास्त प्रमाणात सर्वच द्राक्ष जातीत दिसून येते. रंगीत जातीमध्ये ही विकृती रंगीत मणी होण्याच्या वेळेस, तर हिरव्या जातीमध्ये पाणी उतरण्याच्या आसपासच्या अवस्थेत प्रकर्षाने दिसून येते. जर सूर्यप्रकाश जास्त असल्यास उष्णतासुद्धा जास्त असते. अशावेळी योग्य काळजी न घेतल्यास मण्यांच्या वरचा थरावर निस्तेज तपकिरी रंग दिसू लागतो व शेवटी मण्यातील पाणी निघून जाऊन मण्यांचा सुकवा झालेला दिसून येतो.
डाऊनीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणजे वेलीचा विस्तार सुटसुटीत असावा लागतो; परंतु द्राक्षाचे घड किंवा मणी अशाप्रकारे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास हे मणी सुकलेले दिसून येतात. त्यामुळे योग्य कॅनॉपी व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. त्यामुळेच पूर्व-पश्चिम द्राक्ष बागेची लागवड करणे टाळले जाते व उत्तर- दक्षिण या दिशेने द्राक्षाची लागवड केली जाते. तरीसुद्धा जर घड उघडे असतील व सतत सूर्यप्रकाश पडत असेल तर मण्यांचा सुकवा टाळणे अवघड असते.
योग्य कॅनॉपी व्यवस्थापन यात घडावर व मण्यांवर सावली असेल अशाप्रकारे काड्या व्यवस्थित बांधून घ्याव्यात. त्यानंतर पाने एकावर एक असणार नाहीत याची काळजी घ्यावी. मण्यांची वाटाणा आकार अवस्था किंवा आठ-दहा मि.मी. मणी अवस्था ही फार संवेदनशील आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात मणी सुकण्यास सुरवात होताना दिसून येते. या अवस्थेत मण्यांना स्पर्श किंवा इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. निसर्गतः मण्यांवर लव असते. त्यामुळे मणी सुकत नाहीत; परंतु द्राक्ष बागेत दिल्या जाणाऱ्या जास्त फवारण्या. त्यामुळे हे लव निघून जाते व मणी सुकण्यास सुरवात होते. म्हणून या अवस्थेत आवश्यक तेवढ्याच फवारण्या घ्याव्यात. जास्तीच्या फवारण्या घेऊ नयेत.
यासाठी साड्या, गोणपाट किंवा शेडनेट यांचा वापर करावा. ज्या ठिकाणी मणी बाहेर आलेले दिसतात अशा ठिकाणी वरील प्रकारचे आच्छादन म्हणून वापर करावा. त्यामुळे मणी सुकणार नाहीत.
रसायनांमध्ये जी रसायने थर निर्माण करतात, त्यामुळे मणी सूर्यप्रकाशात जरी असले तरी सुकणार नाही. यामध्ये आधी बुरशीनाशकासोबत किंवा बुरशी येऊ नये म्हणून वापरण्यात येणारे ऍन्टीस्ट्रेस यांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. बाजारात अशा प्रकारचे बरीच रसायने उपलब्ध आहेत; परंतु खात्री असल्याशिवाय अशा रसायनांचा वापर करू नये.
पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे, की जेणेकरून द्राक्षबागेत थंडावा टिकून राहील. यामुळे मणी सुकणार नाहीत. उलट मण्यांची बाजू योग्य गतीने होऊन मणी आकार मिळण्यास मदत होईल.
अशाप्रकारे जास्त उष्णता व प्रखर सूर्यप्रकाश या दोन्ही गोष्टी मण्यांच्या वाढीसाठी हानिकारक आहेत. यासाठी वरील उपाययोजना योग्यरीतीने कराव्यात. त्यामुळे कॅनॉपीखाली गारवा राखला जाईल. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण जास्त कालावधीसाठी होऊन मणी आकार 18 मि.मी.पर्यंत मिळू शकेल. तसेच मण्यांत साखरसुद्धा व्यवस्थित उतरेल व मण्यांचा रंग हा हिरवा दुधाळ असा टिकून राहील. जास्तीत जास्त द्राक्ष निर्यात व स्थानिक बाजारात उपलब्ध असतील.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोप...
उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिरा...
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...