অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळ पिकांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

महाराष्ट्रात फळझाडांची नियोजनबद्ध लागवड फार पूर्वीपासून होत असून आज देशातील फळझाडांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य म्हणून गणले जात आहे.कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्या जमिनीत देखील काही फळझाडाची लागवड फायदेशीर होऊ शकते. फळपिकांच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडाची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे असते.उन्हाळी हंगामात तर फळबागांचे नियोजन जर चांगल्या प्रकारे झाले नाही तर मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी? या विषयीचे विवेचन प्रस्तुत लेखात केले आहे.

डाळिंब

डाळींब पिकाला कोरडवाहू फळपिकांच्या शेतीत प्रथम स्थान आहे. महत्वाचे असते. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकास नियमित व एकसारखे पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी महिन्यात-२३ लिटर, मार्च महिन्यात- ३४ लिटर, एप्रिल महिन्यात- ४६ लिटर तर मे महिन्यात- ५0 लिटर पाणी प्रती झाडास दररोज देणे आवश्यक असते. पाणी देण्यात जर अनियमितता आली तर फुलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पाण्याची टंचाई असणा-या फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या सहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. सेंद्रिय खतांचा वापर जास्तीतजास्त केल्यास जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेत देखील वाढ होते. ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दंडाने ७ ते ८ दिवसांनी पाणी पुरवठा करावा. तसेच झाडाच्या वयोमानानुसार एका झाडावर फळाची संख्या ठेवावी, जेणेकरून फळाचा आकार व वजन चांगल्या प्रकारे मिळेल व फळांना बाजारभाव चांगले मिळतील.

कीड व रोग नियंत्रण

बहार धरतेवेळी पाणी दिल्यानंतर खोडास गेरु + कीटकनाशक + बुरशीनाशक पेस्टचा मुलामा देणे व खोडाजवळ कीटकनाशकाचे द्रावण ओतावे. मावा, कोळी व खवले किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाची व निबॉळी अर्क (४ टक्के)यांची आलटुन पालटून फवारणी करावी.

पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनी व परोपजीवी बुरशीचा वापर करावा तसेच क्रिप्टोलेमस मॉन्टोझायरी हे परभक्षी कीटक बागेत सोडावे. याशिवाय मर रोग व तेलकट डाग रोगांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

त्यानुसार मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन्डॅझिमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. डाळींब पीक संरक्षणाकरिता कृषि विद्यापीठाने पुढीलप्रमाणे शिफारस केल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. कार्बन्डॅझिमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. १ महिन्यानंतर प्रती झाडास २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिर्स + ५ किलो शेणखत यांचे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी जमिनीमध्ये दर महिन्याला २ किलो चांगले कुजलेले शेणखत प्रती झाड या प्रमाणात द्यावे. मर रोग झालेल्या झाडांच्या आजूबाजूला दोन ओळीतील झाडांना ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिसचे प्रमाण ५ पटीने वाढवावे. तसेच 0.१ टक्के काबॅन्डॅझिमचे द्रावण १o लिटर प्रती झाड या प्रमाणात द्यावे. सुत्रकृमी असलेल्या बागांमध्ये बहार घेताना हेक्टरी २ टन निबॉळी पेंड आणि एक ते दीड महिन्यानंतर १o किलो १0 टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून द्यावे. खोडास लहान छिद्रे पाडणा-या भुगेन्यांच्या व्यवस्थापनासाठी गेरू ४00 ग्रॅर्म + लेिडेन २0 टक्के प्रवाही २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्यांचा खोडास मुलामा द्यावा. तसेच लिंडेन / क्लोरोपायरीफॉस अ ब्लायटॉक्स वरील प्रमाणात घेऊन प्रती झाड पाच लिटर द्रावण खोडाशेजारी मुळावर ओतावे.

खोड़किडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मि.ली. किंवा डायक्लोराव्हॉस १o मि.ली. या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या सहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत अंजीर अलीकडे फळांना मिळत असलेल्या बाजारभावांमुळे अंजिराची लागवड पश्चिम महाराष्ट्रात (पुणे, नगर व नाशिक) मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पिकांमध्ये बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने काही शेतकरी खट्टा बहार (जुलै-ऑगस्ट) धरतात. तर फळांच्या गोडीसाठी मिठ्ठा बहार धरणे योग्य असते. मिठ्ठा बहाराची फळे उन्हाळयात (मार्च ते जून) तोडणीस तयार होतात. हा काळ उन्हाळ्यात येत असल्याने उत्पादनाच्या दृष्टीने फळाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या काळात झाडास पाण्याचा ताण बसल्यास फळांच्या सालीवर सुरकत्या तयार होतात.

फळे ताजी टवटवीत दिसत नाहीत, अशा फळांना बाजारभाव अत्यंत कमी मिळतात. तेव्हा यावर उपाय म्हणून बागेस ठिबक सिंचनाद्वारे नियमित पाणी पुरवठा करावा. याच काळात फळे तोडणीसाठी तयार असल्यामुळे अशी फळे पक्षांपासून वाचविणे गरजेचे असते. तेव्हा बागेवर पक्षीसंरक्षक जाळीचे आच्छादन करून फळांचे रक्षण करावे. उन्हाळ्यात या पिकावर खोडकिडीचा व खोडाला लहान छिद्र पाडणा-या मुंगेरे याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यासाठी बहार सुरू होण्यापूर्वी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २0 टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २0 टक्के प्रवाही

५ मि.ली. + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर मिश्रण तयार करुन त्यांचा खोडास मुलामा द्यावा तसेच वरील कीटक व बुरशीनाशकाचे द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओतावे. त्याप्रमाणे खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हेलरेट ५ मि.ली./ लिटर किंवा डायक्लोरव्हॉस १० मि.ली./लिटर या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या सहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत.

आंबा

उन्हाळी हंगामात काळजी घेण्यासारखे तिसरे महत्वाचे फळ पीक आंबा असून पहिल्या वर्षी लावलेल्या कलमांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली करावी. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी वाळलेल्या पालापाचोळ्याने तसेच गवताच्या किंवा उसाचा पाचटाणे झाडाच्या बुध्याभोवती आच्छादन करावे, आंब्याच्या बागांना पाणी देण्याची प्रथा नसली तरी पहिल्या वर्षी उन्हाळ्यात २ ते ३ दिवसांच्या अंतराने, २ ते ५ वर्ष वयाच्या झाडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने तर ५ ते ८ वर्ष वयाच्या झाडांना १o ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्याचप्रमाणे तुडतुड्यापासून मोहोरावर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी कार्बारिल ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून मोहोरावर फवारावे किंवा ३00 मेश गंधक भुकटी + १0 टक्के कार्बारिल भुकटी समप्रमाणात वारा शांत असताना धुरळावी. त्यामुळे मोहोरावरील तुडतुड्यांचे तसेच भुरी रोगाचेही नियंत्रण होईल .

झाडावरील फळांची गळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. १o पी.पी.एम. किंवा दोन ते चार डी.१५ पी.पी.एम. किंवा अलार १00 पीपीएम या वाटाण्याच्या आकाराची असताना तर दुसरी फवारणी फळे बोरा एवढी झाल्यावर करावी.

द्राक्ष

उन्हाळी हंगामात द्राक्ष पिकाची एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी हे करावी. ही छाटणी करताना फक्त खोड, ओलांडे राखून बाकीचा सर्व भाग छाटून टाकावा लागतो. एप्रिल छाटणीनंतर काड्यांची प्रसंगानुरुप विरळणी करणे फायद्याचे ठरते. विरळणी करताना वेलीवरील एकूण काड्या, त्यांची वाढ व जोमदारपणा या गोष्टींचा विचार करावा. विरळणीचे काम शक्य तेवढ्या लवकर करणे फायदेशीर असते. एप्रिल छाटणीपूर्वी बागेस खत पुरवठा केला पाहिजे.

छाटणी पूर्ण होताच रान बांधून बागेस पाणी द्यावे. त्याचप्रमाणे मंडपाच्या तारा ओढून घ्याव्यात आणि सुटलेले ओलांडे बांधून घ्यावेत. तसेच खोडावरील सुटलेली साल काढून टाकावी. खोडावर व ओलांड्याच्या वरच्या भागावर बोडॉपेस्ट लावावी. यामुळे वेलींच्या खोडांचे कडक उन्हापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे द्राक्ष पिकावर येणा-या किडींचा व रोगांचा बंदोबस्त करावा. त्यामध्ये प्रामुख्याने उडद्या कीड, फुलकोडे, पिठ्या ढेकूण या किडींचा बंदोबस्त करावा.

पेरू

पेरुमध्ये स्थानिक बाजारपेठेचा विचार करुन आपणास कोणता बहार धरावयाचा आहे, याचा निर्णय घ्यावा. ज्या शेतकरी बंधूंना मृगबहार धरावयाचा आहे. त्यांनी पेरूच्या बागेस फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत पाणी देऊ नये, हा काळ उन्हाळ्याचा असल्याने पाण्याची देखील टंचाई असते. तसेच या बहाराची फळे हिवाळ्यात तयार होत असल्याकारणाने या बहारातील फळामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. त्याचप्रमाणे फळांची गुणवत्ता ही उत्तम प्रकारची असते.

या कालावधीमध्ये झाडांना पाण्याचा ताण देताना भारी जमिनीस ४o ते ६० दिवसांचा तर हलक्या जमिनीस ३० ते ३५ दिवसांचा ताण पुरेसा होतो. पाणी तोडल्यामुळे झाडांची वाढ थांबते व पानगळ होते. त्यामुळे झाडांना पूर्ण विश्रांती मिळून झाडांमध्ये अन्नद्रव्यांची साठवण होते आणि हे अन्नद्रव्य पुढे पाणी दिल्यानंतर फुलोरा निर्माण करण्यास मदत करते. अर्धवट पानगळतीनंतर बागेतील जमिनीची नांगरष्ट करून मशागत करावी. बागेतील तण पूर्णपणे काढून टाकावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. जास्त पाण्याचा ताण दिल्यास पानगळही जास्त होते. फुले धरणा-या काड्यांची मर होऊन झाडांना हानी होते म्हणून ताण काळजीपूर्वक द्यावा. उन्हाळ्यात जमीन तशीच तापू द्यावी. मे महिन्याच्या शेवटी पूर्ण वाढलेल्या झाडास २५ ते ३० किलो शेणखत व ६oo:३oo:३00 ग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश या खतांची मात्रा प्रती झाड या प्रमाणात द्यावी. नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.

सिताफळ

फेब्रुवारी महिन्यात सीताफळाची हलकीशी छाटणी करून बागेतील जमिनीची नांगरट करावी व जमीन भुसभुशीत करावी. बहार धरण्यापूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वी झाडांना अळे बांधून पूर्ण वाढ झालेल्या झाडास २५ ते ३० किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे. तसेच प्रती झाड २५o:१२५:१२५ ग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी त्यानंतर पहिल्या १-२ पाण्याच्या पाळ्या पाटाने द्याव्यात व त्यानंतर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू करावा. सीताफळावर येणा-या पिठ्या ढेकूण या किडीचा बंदोबस्त करावा. परागीभवन वाढविण्यासाठी बागेत झेंडूची लागवड करावी किंवा मधमाशाच्या पेट्या ठेवण्याची व्यवस्था करावी. कृत्रिमरीत्या परागीभवन केल्यास फळांचा आकार व वजन वाढल्याचे बंगलोर येथील प्रयोगात दिसून आले आहे.

आवळा

बहार धरण्यापूर्वी आवळा बाग तण विरहित ठेवण्यासाठी उभी आडवी नांगरष्ट करावी. त्याचप्रमाणे मे महिन्यात अवेळी येणा-या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उताराच्या दिशेने ठरावीक अंतरावर बांध घालून पाणी अडवावे. ही कामे उन्हाळयातच करावी. उन्हाळ्यामध्ये आवळ्यास फुले लागतात, अशावेळी सुरवातीस दर झाडास २00 ग्रॅम पालाश देऊन एखादे संरक्षित पाणी दिल्यास फलधारणा उत्तम होऊन फळांची गळ कमी होण्यास मदत होते. पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० केिली शेणखत व ५00:२५o:२५0 ग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

फळझाडांच्या लागवडीसंबंधी महत्वाचे मुद्दे

  1. लागवडीसाठी उत्तम नेिचन्याची जमीन नेिवडा.
  2. लागवडीपूर्वी (शक्यतो उन्हाळ्यात) एक-दीड महिना बागेची आखणी, खड्डे खणणे व भरणे इ. कामे करून घ्या.
  3. लागवड शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीस करा.
  4. कृषि विद्यापीठाने संशोधित व शिफारसीत केलेल्या नवीन, सुधारित व चांगले उत्पादन देणा-या जाती निवडा.
  5. अधिकृत, खात्रीलायक व विश्वसनीय ठिकाणाहून कलमे खरेदी करा.
  6. झाड़ांचीं वाढ़ समाधानकारक झाल्यास फाले धरा, स्थानिक परिस्थितीनुसार पाण्याची उपलब्धता व बाजारपेठ या गोष्टी विचारात घेऊन योग्य तो एकच बहार धरा.
  7. खताचे हपते योग्य त्यावेळी व योग्य प्रमाणात द्या
  8. फुले लागल्यापासून फळे निघेपर्यंत पाण्याची टंचाई भासू देऊ नका
  9. रोग व किडींचा वेळीच बंदोबस्त करा.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate