फळबाग लागवड दीर्घ मुदतीची, जास्त गुंतवणुकीची गोष्ट असल्यामुळे सुरवातीला झालेली चूक नंतर भरून काढता येत नाही. म्हणून लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, फळपिकाची निवड, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलमे, रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ- या सर्व गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
फळपिके लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. ज्या जमिनीची खोली 30 ते 45 सें. मी. असते, अशा जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. परंतु 7.5 सें. मी. पेक्षा कमी खोल जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत.
1) मध्यम खोल जमिनीत 45 ते 90 सें. मी. पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.
2) आंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.
3) फळबागेसाठी जमीन शक्यतो सपाट असावी. जमिनीचा उतार 2 किंवा 3 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. ज्या जमिनीचा उतार 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून फळपिकांची लागवड करावी.
4) जमिनीचा उतार दक्षिण-पश्चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगले असते. कारण अशा ठिकाणी हवा उष्ण व कोरडी राहते.
5) जमीन निवडल्यानंतर जमिनीची मशागत करून घ्यावी. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन तपासणी करावी. त्यानुसार खतांचे नियोजन करावे.
6) पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल - मेमध्ये फळझाडांच्या लागवड अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घेऊन हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
7) फळबाग लागवडीसाठी खड्डे काढण्यापूर्वी कोणत्या लागवड पद्धतीने लागवड करावयाची आहे, यानुसार खड्डे खोदून घ्यावेत. प्रत्येक पद्धतीत दोन झाडांतील अंतर आणि दोन ओळींतल्या अंतराप्रमाणे खड्डे काढावेत.
लागवडीच्या पद्धती
फळझाडांची लागवड करताना योग्य लागवड पद्धत निवडावी. कारण याच गोष्टींवर फळझाडांचे उत्पादन, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अवलंबून असतो. लागवड जर जास्त जवळ झाली म्हणजेच दोन झाडांतील अंतर शिफारशीनुसार जर ठेवले नाही तर यामध्ये आर्द्रता वाढते. हवा खेळती राहत नाही. या बागेमध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. उदा.- आता डाळिंब बागेमध्ये काही शेतकरी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत अंतराचा अवलंब न करता झाडे जवळ जवळ लावतात. नंतर या ठिकाणी तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.
चौरस मांडणी पद्धत
1) फळबाग लागवडीच्या चौरस मांडणी पद्धतीत बागेची जमीन चौरसामध्ये विभागण्यात येते. चौरसाच्या चारही कोपऱ्यांवर फळझाडे लावतात. त्यामुळे दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर समान राहते.
2) फळझाडांच्या दोन ओळी परस्परांना काटकोनात छेदतात. या पद्धतीमध्ये बागेची उभी-आडवी मशागत करणे सोपे जाते.
3) दोन्ही दिशांना झाडांना पाणी देता येते.
4) या पद्धतीनुसार आंबा, पेरू, चिकू या फळपिकांची लागवड करणे सोपे जाते.
आयत मांडणी पद्धत
1) या पद्धतीत चौरस पद्धतीपेक्षा थोडा बदल केलेला आहे. कारण दोन झाडांमधील अंतरापेक्षा दोन ओळींतील अंतर काही फळझाडांच्या बाबतीत जास्त ठेवावे लागते.
2) उदा.- फळझाडांच्या दोन ओळींमध्ये 6 ते 8 फूट अंतर, तर ओळीतील दोन फळझाडांमध्ये 3 ते 4 फूट अंतर असते. डाळिंब व द्राक्षाची लागवड कमी अंतर ठेवून आयताकृती पद्धतीने करावी लागते.
3) या पद्धतीत चौरस पद्धतीचे सर्व फायदे मिळतात. मात्र बागेमध्ये मशागत करणे जरा अवघड जाते.
समभुज त्रिकोणी मांडणी पद्धत
1) समभुज त्रिकोणी मांडणी पद्धत ही चौरस पद्धतीप्रमाणेच असते. परंतु पाचवे झाड चौरसाच्या मध्यभागी लावतात. त्या झाडाचे आयुष्य कमी कालावधीचे असते.
2) चौरसातील झाडे मोठी झाल्यानंतर हे पाचवे झाड काढून टाकतात. आंबा, चिकू, लिची अशा सावकाश वाढणाऱ्या झाडांमध्ये हे वेगळ्या प्रकारचे पाचवे झाड लावतात.
3) या पद्धतीत झाडांची संख्या जवळजवळ दुप्पट वाढते. त्यामुळे झाडांची गर्दी वाढते आणि बागेच्या मशागतीला अडथळा येतो. म्हणून काही वर्षांनी मधले झाड काढून टाकावे लागते.
षट्कोन पद्धत
1) षट्कोन पद्धतीमध्ये समभुज त्रिकोणाच्या कोपऱ्यावर झाडे लावतात. त्यामुळे षट्कोनाच्या सहा कोपऱ्यांवर सहा झाडे आणि मध्यभागी एक झाड बसते. या पद्धतीत सर्व झाडांमध्ये समान अंतर असते. 2) मशागत कर्णरेषेवर उभी-आडवी करता येते. या पद्धतीत सुमारे 15 टक्के अधिक झाडे बसतात. पण चौरस पद्धतींमध्ये झाडांची दाटी होते, मशागतीचे काम अवघड होते. सामान्यपणे ही पद्धत फारशी वापरली जात नाही.
समपातळी रेषा मांडणी पद्धत
1) डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी जमीन सपाट नसते, या ठिकाणी फळबाग लागवड करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.
2) जमिनीचा उतार जास्त असला, की मशागत करणे आणि पाणी देणे अवघड असते. मातीची धूप होते. अशा परिस्थितीमध्ये फळझाडांची लागवड सरळ रेषेत न करता समतल रेषेवर (समपातळीवर) करावी लागते.
3) बागेत समतल रेषेप्रमाणे मशागत करावी लागते, पाण्याचे पाट ठेवावे लागतात किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. या पद्धतीमध्ये झाडांतील अंतर समान नसते.
4) दर एकरी झाडांची संख्या इतर पद्धतीपेक्षा कमी असते.
सघन लागवड पद्धत
1) सध्याच्या काळात बरेच शेतकरी ही पद्धत खास करून आंबा व पेरू लागवडीसाठी वापरत आहेत. यामध्ये फरक एवढाच आहे, की पारंपरिक पद्धतीमध्ये आंबा कलमांची 10 मी. × 10 मी. अंतरावर, तर पेरू 6 × 6 मी. अंतरावर लावतात. सघन लागवड करताना हे अंतर दोन्ही पिकामध्ये 3 मी. × 2 मी. अंतर ठेवून लागवड करतात.
2) या लागवड पद्धतीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते, पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी व वळण देणे हे दोन मुद्दे जर शास्त्रोक्त पद्धतीनुसार व्यवस्थित झाले, तरच झाडाची फळधारणा लवकर आणि भरपूर होते. नाहीतर याच्यावर परिणाम होतो.
लागवडीच्या पद्धती निवडताना
1) प्रत्येक फळझाडासाठी समान क्षेत्रफळ मिळावे.
2) फळबागेतील आंतरमशागत, झाडावर फवारणी करणे आणि झाडांना पाणी देणे ही कामे सहज यावीत.
3) बागेचे व्यवस्थापन सहज करता यावे.
4) फळबागेची वाढ करण्यासाठी मोकळी जागा सोडली पाहिजे. या जागेत फळझाडांची लागवड होईपर्यंत भाजीपाला पिके व हंगामी फुलझाडांची लागवड करावी.
लागवडीचे नियोजन -
1) एप्रिल व मे महिन्यात खड्डे खणावेत. खड्डे कमीत कमी 20 दिवस प्रखर उन्हात तापू द्यावेत.
2) कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, शासकीय रोपवाटिका किंवा शासनमान्य खासगी रोपवाटिकेतूनच कलमे विकत घ्यावीत.
फळझाडासाठी खड्ड्यांचा आकार
अ. नं. फळझाडाचे नाव खड्ड्याचा आकार
1) आंबा, संत्रा, मोसंबी, फणस, चिकू, पेरू, नारळ व सुपारी 90 सें. मी. × 90 सें. मी. × 90 सें. मी.
2) कागदी लिंबू 75 × 75 × 75 सें. मी.
3) डाळिंब, काजू, बोर व अंजीर 60 × 60 × 60 सें. मी.
4) केळी, आवळा, सीताफळ व पपई 45 × 45 × 45 सें. मी.
5) द्राक्ष 60 सें. मी. खोल आणि 60 सें. मी. रुंद सलग चर
6) अननस 90 सें. मी. रुंद आणि 22 ते 30 सें. मी. खोल सलग चर
यशवंत जगदाळे - 9923071265
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ :
अॅग्रोवन