आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५टन मिसळावे.
लागवड एप्रिल - मे महिन्यांत पूर्ण करावी. लागवडीसाठी माहीम, रिओ-डी-जानेरो, कालिकत इत्यादि जाती निवडाव्यात. लागवडीसाठी हेक्टरी १८ ते २० क्विंटल बेणे लागते. बेणे २५ते ४५ ग्रॅम वजनाचे असावे, डोळे फुगलेले असावेत. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे. यासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ईसी) +१५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५०%डब्लू.पी.) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून यामध्ये बेणे २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी हेक्टरी दोन टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. लागवड करताना ९० सें.मी. रुंदीचे आणि २५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून २२.५ X २२.५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. हेक्टरी १२० किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये द्यावे. यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर दीड महिन्याने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एक महिन्याच्या अंतराने द्यावा. लागवडीच्या वेळी स्फुरद ७५ किलो आणि पालाश ७५ किलो द्यावे. आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी. आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे. आल्यावर कंदमाशी, पाने खाणारी अळी, रसशोषण करणाऱ्या किडी, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा, तसेच करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड व रोग नियंत्रण करावे. लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यांत आले पीक काढणीला येते. हेक्टरी १५ ते २० टन आल्याचे उत्पादन मिळते.
0233 - 2437275, 2437288
कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली
संचालक, संपदा इंटरप्रीनेरशिप अंड फौंडेशन (सेल्फ)
स्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 8/3/2020
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...