काळीमिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. मे-जून महिन्यामध्ये तुरे येतात. तर साधारणपणे नऊ महिन्यांनंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात. काढणी करताना योग्य तऱ्हेने काळजी न घेतल्यास मिरीच्या प्रतीवर परिणाम होतो. दाण्यांना आकर्षक रंग येत नाही व सहाजिकच बाजारात दर कमी मिळतो. मिरीच्या दाण्याचा रंग हा हिरवा असतो.
पिकल्यानंतर त्यांचा रंग जातीप्रमाणे पिवळा अगर नारंगी होतो. मिरीची काढणी करताना लागलेल्या घोसामधील एक ते दोन दाणे पिवळे अगर नारंगी रंगाचे झाल्यानंतर मिरीवरील सर्व घोस काढतात. या वेळी घोसामधील दाण्याचे काटेकोरपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. कोकीळसारखे पक्षी पिकलेल्या मिरीचे दाणे खातात. हे रंग बदललेले दाणे चटकन लक्षात येत नाहीत.
मिरीचे घोस काढल्यानंतर या घोसामधील दाणे अलग करून काढावे लागतात. घोस काढल्यानंतर ताबडतोब हे दाणे वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास तसे करणे कठीण जाते, कारण दाणे घोसातल्या मधल्या भागाला घट्ट चिकटून राहतात. त्यासाठी मिरीची काढणी दुपारनंतर करावी.
रात्री घोस तसेच ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी या घोसातले दाणे अलग करावेत. हे दाणे उन्हात वाळवावेत. सुमारे सात ते दहा दिवस दाणे उन्हात वाळवावे लागतात. काळी मिरी तयार करण्यासाठी सुधारित पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत मिरी दाणे वाळविण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवून काढतात.
या पद्धतीचे अनेक फायदे आढळले आहेत.
1) मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसांतच वाळतात.
2) दाण्याचा आकर्षक काळा रंग येतो.
3) साठवण करताना दाण्याचे बुरशीमुळे नुकसान होत नाही.
4) मिरी दाण्याची प्रत सुधारते.
शंभर किलो हिरव्या मिरीपासून सुमारे 33 किलो काळी मिरी मिळते. मिरी काढणीचा हंगाम हा शक्यतो हिवाळी असतो. सर्वसाधारणपणे या वेळी भरपूर दव पडते. मिरीचे दाणे वाळवताना ते दवात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. मिरीचे दाणे दवात भिजल्यास ते पांढरट होतात व अशा मिरीला किंमत कमी मिळते.
हिरवी मिरी गुजरात व राजस्थानमध्ये लोणचे तयार करण्यासाठी वापरतात. हिरव्या मिरीसाठी मिरीची काढणी दाणे पूर्ण तयार झाल्यावर म्हणजे ज्या वेळी काळी मिरीसाठी काढणी करतात त्याच वेळेस करावी लागते. म्हणजेच मिरी काढणीनंतर त्यावर वाळविण्याची अथवा वाफवण्याची प्रक्रिया न करता त्याचे थेट विपणन केले जाते. हिरवी मिरी साठवायची असल्यास दोन टक्के मिठाच्या द्रावणात घडासहित साठवावी लागते.
संपर्क -(02358) 282108
उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात आले या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे....
काळी मिरीची काढणी कधी करावी याबाबतची माहिती येथे द...
आले पीक लागवडीपूर्वी पूर्वमशागत करताना जमीन भुसभुश...
नारळ, सुपारीच्या बागांमधील नवीन लागवड केलेल्या तसे...