भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध देश आहे. खाण्याच्या पदार्थाची रुची, स्वाद, सुगंध व खमंगपण वाढविणारे मसाल्याचे पदार्थामध्ये जिरे, ओवा, जायफळ, दालचिनी, लवंग, यासोबतच बडीसोपचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. स-हास लहान वयाच्या मुलांपासून ते वयस्कर मंडळींमध्ये बडीसोप हि लोकप्रिय असून जेवण, चहापाणी, नंतर बडीसोप खाण्याची विशेष प्रथा दिसून येते. बडीसोपचे दाणे किंवा त्याचे भुकटीचा वापर विविध पदार्थाच्या सूप, लोणचे, सॉस, चॉकलेट आणि प्रामुख्याने मांसाहारी जेवणामध्ये होतो. बडीसोप हि पाचक, वायुनाहक असल्यामुळे जेवणानंतर बडीसोप खाण्याची प्रथा आहे. फुप्फुस, पित्ताशय व मूत्राशय यांच्या रोगावर बडीसोप गुणकारी आहे तसेच ती कृमीनाशकसुद्धा आहे.
बडीसोपचे मूळस्थान भूमध्य समुद्राजवळील प्रदेशात आहे. भारत,इजिप्त, चीन ह्या देशात बडीसोप या पिकाची लागवड करतात. भारतात उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली, कर्नाटक,हरियाना, व महाराष्ट्रात लागवड करतात. महाराष्ट्र या राज्यांत २२८९० हेक्टर क्षेत्रफळावर बडीसोपची लागवड केली जाते व त्यापासून २७६०० टन बडीसोपचे उत्पादन होते. बडीसोपची निर्यात अमेरिका, जपान,इंग्लंड,मलेशिया, द. आफ्रिका आणि सौदी अरेबिया या देशात होते व त्यापासून सन २००६-०७ या वर्षात भारतास २१४३ लक्ष रुपयांची गंगाजळी प्राप्त झाली आहे.
शेतात उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या सहाय्याने ढेकळे फोडून घ्यावीत. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन माती मऊ करून घ्यावी.शेवटच्या मशागतीच्या वेळेला चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.सर्व कडी कचरा, तण व धसकटे वेचून जमिनीचा उतार व ओलीतास सोयीस्कर असे सपाट वाफे तयार करून घ्यावे. साधारणपणे ३ मीटर लांब २ मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करून घ्यावे.
विदर्भातील हवामानात साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात सपाट वाफ्यात दोन ओळीत ६०-७५ से.मी. अंतर ठेऊन टोकण पद्धतीने लागवड करावी. यासाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे होते. एक एकर पेरणीस साधारणपणे ५-६ किलो बियाणे पुरेसे आहे.
१) आर.एफ.१०१ :- हा वाण राजस्थान कृषी विद्यापीठाने सन १९९५ मध्ये विकसित करून संपूर्ण देशभर लागवड करण्याकरिता प्रसारित केला आहे. या वाणाचा पिक कालावधी १५०-१६० दिवस एवढा असून प्रती हेक्टरी १५.५ क्विटल एवढे उत्पादन मिळते.
२) को-१ :- हा वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठाने १९८५ साली प्रसारित केला आहे. हा उशिरा तयार होणारा वाण असून पिकाचा जीवन कालावधी २१० ते २२० दिवस एवढा आहे. मिश्र शेतीसाठी हा उत्तम वन असून प्रती हेक्टरी ६ क्विंटल एवढे उत्पादन मिळते.
३) गुजरात सौफ -२ :- हा वन जुनागड कृषी विद्यापीठाच्या ( गुजरात) अंतर्गत जागुदान, जि.मेहसाना संशोधन केंद्रातून १९९९ मध्ये प्रसारित केला आहे. या वाणाचे दर हेक्टरी उत्पादन १५ ते १६ क्विंटल एवढे मिळते. या वाणाच्या बडीसोपमध्ये तेलाचे प्रमाण २.४ टक्के एवढे असल्यामुळे सुगंधी तेल निर्मितीच्या कारखान्यात यास भरपूर मागणी आहे.
बडीसोपच्या अधिक आणि चांगल्या उत्पादनांसाठी हेक्टरी १५ ते २० टन सेंद्रिय खाते लागवडीपूर्वी शेवटच्या वखराच्या पाळीसोबत जमिनीत मिसळून द्यावी तसेच रासायनिक खतानासुद्धा बडीसोप हे पिक अधिक चांगला प्रतिसाद देते असे सिद्ध झाले आहे. हेक्टरी ९० किलो ग्रॅम नत्र ४० किलो ग्रॅम स्फुरद आणि जमिनीच्या आवश्यकतेनुसार पालाश यांची मात्रा विभागून पिकाला दिल्यास उत्पादनावर अतिशय चांगला परिणाम दिसून येतो. नत्रयुक्त खतांची अर्धी व स्फुरदयुक्त खताची पूर्ण मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि उरलेली नत्राची आर्धी मात्र लागवडीपासून ६० दिवसांनी पिकला द्यावी.
बडीसोपला पाणी व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. लागवडीच्या वेळेस जर जमिनीत ओलावा कमी असेल तर हलके ओलीत करावे. यानंतर जमिनीचा मगदूर आणि वातावरण लक्षात घेऊन १०-१२ दिवसांच्या अंतराने पिकाला पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
बडीसोपच्या दाण्याच्या आकारावरून त्याची चव ठरत असते. साधारणपणे पूर्ण परिपक्व दाण्याच्या आकाराच्या निम्म्या आकाराची बडीसोप चवीला गोड व स्वादिष्ट असते. त्यामुळे अशा प्रकारची बडीसोप काढणीस, फुले येणा-या दिवसापासून ३०-४० दिवसांनतर तयार होते. यावेळी पिक पिवळे होण्यास सुरुवात होते. अशा वेळेस उपरोक्त अवस्थेतील फांद्या, त्यावरील अंबेल काढून त्यांना सावलीत बांदल बांधून सुकवतात. चांगल्या प्रतीची बडीसोप उत्पादनाकरीता परीपक्कतेच्या आधारावर पिकाचे ५-६ तोडे घेणे गरजेचे असते.
साधारणपणे वरीलप्रमाणे शास्त्रीय पद्धतीचा वापर करून बडीसोपची जिरायती शेती केल्यास हेक्टरी १५-१७ क्विंटल उत्पन्न मिळू शकते. लखनवी बडीसोपचे म्हणजे स्वादिष्ट आणि गोड चवीच्या बडीसोपचे प्रती हेक्टरी ५-७.५ क्किंटल एवढे उत्पादन मिळू शकते.
बडीसोपवर मोठ्या प्रमाणावर कीड किवा रोगाचे अतिक्रमण होत नाही. परंतु दमट हवामान व अतिशय थंडी यामुळे मावा या किडीचा पिकावर उपद्रव होऊ शकतो. या किडीच्या नियंत्रणाकरिता डायमेथोएट ३५ टक्के प्रवाही १० मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. तसेच थंडीच्या कालावधीत दहिया या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी २० टक्के तीव्रतेची २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावी.
लेखक :-डॉ.प्रमोद यादगीरवार,
प्रमुख शास्त्रज्ञ :- कृषी विज्ञान केंद्र , यवतमाळ
संपर्क:- ९३७१४५९०६१
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...