অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिरी

प्रस्‍तावना

काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्‍कृष्‍ट दर्जा असल्‍यामुळे जाग‍तिक काळी मिरीच्‍या 90 टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणा-या एकुण परकीय चलनापैकी 70 टक्‍के परकीय चलन एकटया काळा मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते.

भारतात उत्‍पादन होणा-या एकूण काळी मिरीपैकी 98 टक्‍के उत्‍पादन एकटया केरळ राज्‍यात होते. त्‍याखालोखाल कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो. महाराष्‍ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड आढळते. कोकण किनारपटटीतील हवामान या पिकाच्‍या लागवडीस अनुकूल असल्‍याने आणि काळी मिरीच्‍या वेलास आधाराची आवश्‍यकता असल्‍यामुळे सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या नारळ सुपारी झाडांवर वेल चढवून मिरी लागवड करता येते.

परसागेतील आंबा फणस यासारख्‍या कोणत्‍याही झाडावर वेल चढवून मिरी लागवड करता येते. त्‍यामुळे घरातील सांडपाण्‍याचा योग्‍य उपयोगही केला जातो. आणि घरातील काळी मिरीची गरज भागवून आपल्‍या काही प्रमाणात बाजारातही काळी मिरी विकता येईल आणि त्‍यातुन आर्थिक फायदासुध्‍दा होईल. नारळ सुपारीच्‍या बागा नसतील परंतु पाण्‍याची सोय असेल अशा ठिकाणी पानमळयाच्‍या धर्तीवर पांगारा लागवड करुन त्‍यावरही स्‍वतंत्रपणे मिरी वेल लावून उत्‍पन्‍न घेता येईल.

हवामान व जमीन

उष्‍ण दमट व सम हवामानात या पिकाला अनुकूल आहे.  कडक उन्‍हाळा किंवा अति थंड हवेत हे पिक येत नाही. हवेमध्‍ये आद्रतेचे प्रमाण जास्‍त असल्‍यास हया वेलीची वाढ चांगली होवून भरपूर पीक मिळते.

मध्‍यम ते भारी जमीन तसेच पाण्‍याच्‍या निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. थोडक्‍यात ज्‍या हवामानात नारळ, सुपारी यासारख्‍या फळझाडांची लागवड होते किंवा होवू शकते. येथे मिरीची लागवड अगदी सहजरीत्‍या करता येते. मसाल्‍याच्‍या इतर पिकांप्रमाणे या पिकास सावलीची आवश्‍यकता असते.

सुधारीत जाती

केरळ राज्‍यातील पेयुर मिरी संशोधन केंद्राचे पेयुर -1 ते पेयूर-4 हया नवीन जाती विकसि‍त व प्रसारीत केल्‍या आहेत. तसेच राष्‍ट्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कालीकत येथून शुभंकारा, श्रीकारा, पंचमी आणिर पौर्णिमा या जाती विकसित व प्रसारीत करण्‍यात आल्‍या आहेत.

कोकण कृषि विद्यापीठाने पन्‍नीयूर संशोधन केंद्रातून पन्‍नीयूर -1 ही जात संकरीकरण करून तयार केलेली जात आणून कोकणच्‍या भौगोलिक परिस्थितीत त्‍या जातीचा निकष आजमावून सदर जात कोकणासाठी प्रसारीत केली आहे. सदर जाती पूर्ण वाढीच्‍या एका वेलापासून सरासरी सात किलो हिरव्‍या मिरीचे उत्‍पन्‍न मिळते. पन्‍नीयूर-1 जात गावठी मिरीपेक्षा जवळजवळ 3 पट पीक देते. पन्‍नीयूर-2 ते पन्‍नीयूर -5 तसेच श्रीकारा, शुभकारा, पंचमी आणि पौर्णिमा या जाती अभ्‍यासही कोकण कृषी विद्यापीठाच्‍या विविध संशोधन केंद्रावर चालू आहे.

पूर्वमशागत

मिरीची लागवड परसबागेतील आंबा फणस यासारख्‍या झाडांवर स्‍वतंत्ररित्‍या पांगा-यावर तसेच नारळ सुपारीच्‍या बागांमध्‍ये प्रत्‍येक झाडांवर दोन वेल चढवून करता येते. यासाठी प्रथम आधाराच्‍या झाडापासून 30 सेमी अंतरावर 45×45×45 सेमी आकाराचे खडडे पुर्व व उत्‍तर दिशेला खोदावेत आणि ते चांगली माती 2 ते 3 घमेली कंपोस्‍ट किंवा शेणखत व एक किलो सुपर फॉस्‍फेट किंवा हाडांचा चूरा तसेच 50 ग्रॅम बीएचसी पावडर यांच्‍या मिश्रणाने भरुन ठेवावेत.

स्‍वतंत्ररित्‍या पांगा-यावर मिरी लागवड करावयाची असल्‍यास मिरीवेल लागवड करण्‍यापूर्वी एक वर्ष अगोदर ऑगस्‍ट ते सप्‍टेबर महिन्‍यात पांगा-यात खुंटाची लागवड करावी लागते. अशावेळी योग्‍य जमिनीची निवड केल्‍यानंतर 3×3 मीटर अंतरावर  60×60×60 सेमी आकाराचे खडडे घेऊन ते खडडे चांली माती 2 ते 3 घमेले, शेणखत किंवा कंपोस्‍ट व एक किलो सुपर फॉस्‍फेटने भरुन घ्‍यावेत. अशा खडयामध्‍ये 1.5 ते 2 मीटर खोलीच्‍या पांगा-याच्‍या खुंटाची लागवड करावी.

पांगा-यामध्‍ये प्रत्‍येक झाडाजवळ  वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे पुर्व व उत्‍तर दिशेस एक एक असे दोन वेल लावावेल. हया पध्‍दतीत पांगा-याच्‍या खुंटाची लागवड करतानाच लाल वेलची सारख्‍या उंच जाती केळयांच्‍या मुनव्‍यांची पांगा-याच्‍या दोन झाडांमधील जागेत लागवड केल्‍यास मिरीवेलास सुरुवातीच्‍या काळात सावली मिळते. तसेच केळीपासून पहिली तीन वर्ष उत्‍पन्‍नही मिळते

लागवड

ज्‍यावेळी सुपारीमध्‍ये आंतरपीक घ्‍यावयाचे असेल त्‍यावेळी सपारीच्‍या दोन झाडांमधील अंतर 2.7 ते 3.3 मीटर असावयास पाहिजे. मात्र घटट लागवड असल्‍यास फार सावलीमुळे मिरीच्‍या उत्‍पन्‍नावर विपरीत परिणाम होतो.

अशा वेळी बागेच्‍या चोहीकडेच्‍या फक्‍त दोन रांगातील सुपारीच्‍या झाडांवर मिरीचे वेल चढवावेत. लागवड करताना तयार केलेल्‍या खडडयात मधोमध मुळया असलेली मिरीची रोपे लावावीत. वेल आधाराच्‍या झाडावर चढण्‍यासाठी वेलास आधार द्यावा.

खते

तीन वर्षापासून पुढे प्रत्‍येक वेलास 20 किलो शेणखत/ कंपोस्‍ट, 300 ग्रॅम युरीया 250 ग्रॅम म्‍युरेट ऑफ पोटॅश व 1 किलो सुपर फॉस्‍फेट द्यावे. ही खताची मात्रा दोन समान हप्‍त्‍यात द्यावी. पहिला हप्‍ता सप्‍टेबरच्‍या पहिल्‍या आठवडयात व दुसरा जानेवारी महिन्‍यात द्यावा.

ही खते वेलापासून 30 सेमी अंतरावर चर खणून त्‍यामध्‍ये द्यावीत लागवडीच्‍या पहिल्‍या वर्षी खताचा 1/3 हप्‍ता, दुसरा वर्षी 2/3 हप्‍ता, तिस-या वर्षी आणि पुढील प्रत्‍येक वर्षी संपूर्ण हप्‍ता द्यावा. आठ वर्षानंतर मिरीचे भरपूर पीक मिळू लागल्‍यानंतर जरूरीप्रमाणे खतांची मात्रा वाढवावी.

आंतरमशागत आणि निगा

काही मिरीचे लहान वेल आधाराच्‍या झाडावर चढेपर्यंत अधुनमधून त्‍यांना आधार देणे आणि झाडावर चढण्‍यासाठी दोरीच्‍या साहाय्याने बांधणे जरूरीचे असते.  वेल 4 ते 5 मिटरहून जास्‍त वाढू देऊ नये. वेल आधाराच्‍या पांगा-याच्‍या फांद्या काही प्रमाणात कापून सावली योग्‍य प्रमाणात ठेवावी. वर्षातून दोनवेळा ऑगस्‍ट-सप्‍टेबर आणि नोव्‍हेंबर-डिसेंबर मध्‍ये वेलाभोवतीची जमीन खोदून भुसभूशीत करावी.

मिरीच्‍या वेलांना जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे हिवाळयात व उन्‍हाळयात 4 ते 6 दिवसांनी पाणी घालावे.

काढणी, उत्‍पन्‍न व प्रक्रिया

हिरव्‍या घडातील एक दोन दाण्‍यांचा रंग तांबडा-लाल होताच घड तोडावेत. एका पेयूर-1 या जाती वेलापासून सुमारे 5 ते 6 किलो हिरवी मिरी मिळते आणि मिरी वाळविल्‍यानंतर दीड ते दोन किलो होते. किलो होते. नंतर त्‍या घडातील मिरीचे दाणे हातानी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्‍या जमिनीवर घडांचे ढीग करून स्‍वच्‍छ पायाने तुडवावेत. ही पध्‍दत मोठया प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात.

हिरव्‍या मिरीपासुन काळी मिरी तयार करण्‍यासाठी दाणे बांबूच्‍या करडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्‍यात गुंडाळावेत. त्‍यानंतर एका स्‍वतंत्र भांडयात पाणी उकळत ठेवावे. पाण्‍याला उकळया येण्‍यास सुरुवात झाल्‍यानंतर ती करंडी अगर फडक्‍यात गुंडाळलेली मिरी त्‍या उकळत्या पाण्‍यात बुडवून काढावी. अशा रीतीने उकळत्‍या पाण्‍यातून बुडवून काढलेली मिरी उन्‍हामध्‍ये चटई अगर स्‍वच्‍छ फडके अंथरून त्‍यावर वाळत ठेवावी.

साधारणपणे 7 ते 10 दिवस उन्‍हामध्‍ये वाळवावी. म्‍हणजे काळी कुळकूळीत न सुरकुतलेली उत्‍तम प्रतीची काळी मिरी तयार होईल. परंतु हिरवी मिरी उकळत्‍या पाण्‍यात न बुडविता तशीच जर वाळविली तर ती चांगल्‍या प्रकारे काळया रंगाची होत नाही. त्‍यामध्‍ये काही दाणे भुरकट, तपकिरी रंगाचे होतात व त्‍यामुळे भेसळ असल्‍याचा भास होतो. अशा मालाला बाजारभाव कमी मिळतो. म्‍हणूनच ही प्रक्रिया फार महत्‍वाची आहे. नंतर चांगली वाळलेली काळी मिरी काचेच्‍या बरणीत अगर घटट झााकण असलेल्‍या भांडयात ठेवून झाकण घटट लावावे. काही मिरीच्‍या दाण्‍यात 12 टक्‍क्‍यापेक्षाही जास्‍त ओलावा असता कामा नये. म्‍हणजे ती साठविण्‍याच्‍या कालावधीत चांगली राहू शकते.

किडी व रोग

मिरीच्‍या पिकांवर जास्‍त हानीकारक किड व रोग आढळून येत नाही. परंतु पोलभूंगें मिरीची फळे दाणे हिरवी असताना त्‍यातील गर खावून मिरीचे दाणे पोकळ बनवून नुकसान करतात.

हया किडीच्‍या बंदोबस्‍तासाठी मॅलेथियान किंवा कांर्बरिल औषधांचा फवारा जूलै व ऑक्‍टोबर महिन्‍यात वेली व फळांवर द्यावा. वेलाच्‍या खालील जमीन खणुन घेतल्‍यास हया किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

मर व इतर रोगांपासुन वेलींची हानी होवू नये हयासाठी पावसाळा सुरु होण्‍यापूर्वी मे महिन्‍यात व नोव्‍हेंबर महिन्‍यात 1 टक्‍का बोडोमिश्रण वेलीवर फवारावे.

योजना

काळी मिरीची रोपे शेतक-यांना क्षेत्र विस्‍तावर आणि आंतरपिक कार्यक्रमासाठी 50 टक्‍के अनुदानावर रुपये 0.75 प्रती कलम या दराने देण्‍यात येतात.

नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार होण्‍याच्‍या दृष्‍टीने मिरीचे अधिक उत्‍पन्‍न देणा-या व चांगली प्रतीक्षा व गुणधर्म असलेल्‍या जातीचे व 100 कलमांचे प्रात्‍याक्षिक प्‍लॉट स्‍थापन करण्‍यासाठी शेतक-यांना तीन वर्षापर्यंत अनुक्रमे रू. 225 रू. 140 व रू. 150 असे अनुदान देण्‍यात येते.

काळी मिरीची आंतरपीक म्‍हणून चांगली लागवड करणे प्रकारची लागवड करण्‍यासाठी नारळ / सुपारीची कमीत कमी सात वर्षाची झाडे असणा-या काळी मिरीची कमीत कमी 30 त जास्‍तीत जास्‍त 200 रोपे विनामुल्‍य पुरविण्‍यात येतात.

 

स्त्रोत: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate