वेलीची उंची १० मी. अगर त्याहून जास्त असते. फांद्या मजबूत असून तिच्या पेऱ्यांतून हवाई मुळे फुटतात.
पिंपळी नागवेल कबाबचिनी इ. पायपरेसी कुलातील (मिरी कुलातील) असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. पाने नागवेलीपेक्षा मोठी, साधी, सु. ७·५ सेंमी. लांब, अंडाकृती, एकाआड एक, चिवट ५–९ शिरांची, खालील बाजूस आनील (निळसर हिरवी) व वरील बाजूस गर्द हिरवी असतात. फुले लहान, बहुधा विभक्तलिंगी (पुं-पुष्पे आणि स्त्री-पुष्पे वेगवेगळ्या वेलींवर असतात), काही प्रमाणात द्विलिंगी, सु. १० ते १८ सेंमी. लांबीच्या नतकणिशावर येतात. प्रत्येकात सु. ५० फुले असतात.
फळे अश्मगर्भी (आठळी फळे), लाल, लहान (५–६ मिमी. व्यासाची) व एकबीजी असतात. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास सु. सहा महिने लागतात. तयार परंतु पूर्ण पिकण्यापूर्वी काढून वाळवलेली फळे ‘काळी मिरी’ आणि पूर्ण पिकलेली व फलावरण काढलेली फळे ‘पांढरी मिरी’ या नावाने बाजारात ओळखली जातात.
जगात मिऱ्याची लागवड करणाऱ्या देशात भारत, इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील व श्रीलंका हे प्रमुख आहेत. पैकी भारताचा प्रथम क्रमांक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंडोनेशियात मिऱ्याचे सर्वांत जास्त उत्पादन होत असे; परंतु युद्धामुळे तेथील मळे उद्ध्वस्त होऊन उत्पादन निम्म्याने घटले. जगातील एकूण सु. १,५०,००० टन उत्पादनापैकी २०–२५ % उत्पादन भारतात होते. भारतातील या पिकाखालील क्षेत्र इतर सर्व देशांपेक्षा जास्त असले, तरी हेक्टरी उत्पादन मात्र सर्वांत कमी आहे. १९८०–८१ मध्ये भारतातील सरासरी हेक्टरी उत्पादन २४८ किग्रॅ. होते.
इ.स. १९८०–८१ मध्ये मिऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र सु. १,१०,६४० हे. होते, त्यांपैकी १,०७,०९० हे. केरळ राज्यात व बाकीचे मुख्यतः कर्नाटक व तामिळनाडूत होते. देशातील मिऱ्याचे एकूण वार्षिक उत्पादन ३०,००० ते ३५,००० टन आहे. त्यांपैकी २५,००० टनापेक्षा जास्त उत्पादन केरळमध्ये होते. कर्नाटक व तमिळनाडू मिळून ४% उत्पादन होते. आसाम, प. बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार बेटे आणि महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत (सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांत) मिऱ्याची सुयोग्य भागात लागवड करण्याचे प्रयत्न चालू आहेत. केरळमध्ये बहुतेक सर्व जिल्ह्यांत मिऱ्याची लागवड होते; परंतु सु. ४४% उत्पादन एकट्या कननोर जिल्ह्यात होते. कर्नाटकात उत्तर व दक्षिण कारवार आणि तामिळनाडूत निलगिरी आणि कन्याकुमारी हे जिल्हे मिऱ्याच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.
भारतातील मिऱ्याखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ८० टक्के क्षेत्र लहान शेतकऱ्यांकडे असून त्यांच्याकडे तीन हेक्टरांपेक्षा कमी क्षेत्र असते. एकट्या केरळ राज्यात मिऱ्याची लागवड २२ लक्ष लहानमोठ्या बागांतून होते व बहुतेक भागांत मिरवेलीचे पीक दुय्यम म्हणून घेण्यात येते.
बहुसंख्य लहान बागांतून वेलींची संख्या १०० च्या आतच असते; परंतु त्यांची योग्य निगा राखली जात नसल्यामुळे आणि रोग व किंडीमुळे उत्पन्नात घट दिसून येते. आणखी एक कारण म्हणजे भारतात मिरवेलीचे सर्वसाधारणपणे ६० वर्षे (काही अपवादात्मक वेलींचे १०० वर्षे) उत्पादन काढण्यात येते; परंतु मिरवेलीचे फायदेशीर उत्पन्न २५ वर्षांपर्यंच मिळते. जगातील मिरवेलीच्या लागवडीच्या इतर प्रमुख देशांत वेलींचे उत्पादक आयुष्य १५–२० वर्षांपेक्षा जास्त ठेवत नाहीत (जुन्या वेली उपटून नव्यांची लागण करतात).
भारतात मिरवेलीचे ७५ पेक्षा अधिक प्रकार लागवडीत आहेत. केरळात कल्लुवल्ली, बालनकोट्टा, करिमुंडा आणि कोट्टानड हे जुन्या प्रकारांपैकी जास्त उत्पन्न देणारे प्रकार आहेत. पण्णिआर – १ या नवीन संकरित प्रकाराचे उत्पन्न जुन्या स्थानिक प्रकारांपेक्षा ३ ते ४ पट अधिक मिळते. शिवाय त्यात रोग व किडींना प्रतिकार करण्याची शक्ती आहे; लागणीनंतर तिसऱ्या वर्षात फुले व फळे धरतात आणि त्यांची प्रतही चांगली असते.
(सर्वसाधारणपणे मिरवेलीला लागण केल्यानंतर ४ अगर ५ वर्षांत फुले व फळे येतात). मात्र जास्त सावली असल्यास हा संकरित प्रकार चांगला वाढत नाही. महाराष्ट्रातही सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत या प्रकाराची लागवड सुरू झाली आहे.
तेल्लिचेरी बोल्ड हा मिऱ्याचा प्रकार मलबार भागात लागवडीत असून त्याला फार मागणी असते व मिऱ्याच्या सर्व प्रकारांत हा जास्त महाग आहे. मल्लीगसरा, डोड्डीम्या व अरीसीना मोरट्टा हे कर्नाटकातील सुधारित प्रकार आहेत.
या पिकाला जांभा खडकापासून तयार झालेली तांबडी, निचऱ्याची अथवा सेंद्रीय पदार्थ भरपूर प्रकाणात असलेली गाळाची जमीन मानवते. पावसाळ्यात जमिनीत फार पाणी साठल्यास व कोरड्या महिन्यात जमीन वाळून भेगाळल्यास वेली मरतात.
स्वतंत्र पीक म्हणून लागवड करण्यासाठी लागवडीपूर्वी वेलींना सावली व आधारासाठी आधारवृक्षांची लागवड करणे आवश्यक असते. यासाठी निवड केलेल्या जमिनीत २·५ मी. ते ३ मी. अंतरावर खड्डे खणून ते खतमिश्रित मातीने भरून त्यांत एप्रिल-मे मध्ये पांगाऱ्यासारखी झाडे लावतात. दुय्यम पीक म्हणून लागवड करावयाची असल्यास उन्हाळ्यात ४५ सेंमी. खोल खड्डे झाडांच्या बुंध्यापाशी खणून खतमिश्रित मातीने भरून काढतात.
लेखक - प्र. भ. वैद्य / शं. आ. परांडेकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/7/2023
पावसाचा अनियमितपणा मागील काही वर्षांत कमालीचा वाढ...
जमीन हे पीकवाढीचे माध्यम आहे. आपल्या सर्वांची उपजी...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्रकाश सीताराम पाटील...