অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योग्य पद्धतीने करा दालचिनीची काढणी...

दालचिनीच्या झाडापासून साल आणि तमालपत्र मिळते. लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मेच्या दरम्यान दालचिनीचे झाड तोडून साल काढावी. साल सावलीत वाळवावी.

दालचिनीची साल काढणीचे वर्ष आणि हंगाम

  1. दालचिनीचे झाड तोडून त्यापासून साल काढावी लागते. त्यासाठी लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मेच्या दरम्यान दालचिनीचे झाड तोडून साल काढावी.
  2. त्यानंतर चौथ्या वर्षात झाड तोडणीस येत नाही. त्यानंतर मात्र, पुढील प्रत्येक वर्षी झाडाच्या तयार फांद्या काढून त्यांची साल काढता येते.

दालचिनी साल काढायला तयार आहे हे ओळखण्याची पद्धत

  1. तिसऱ्या वर्षी साल काढताना झाड तोडण्यापूर्वी दालचिनीची खोडापासून सहज सुटी होते की नाही ते चाकूच्या सहायाने पाहावे. त्यासाठी धारदार चाकूने छोटासा त्रिकोनी अगर चौकोनी काप घेऊन खात्री करावी.
  2. साल सहज निघत असेल अशाच वेळी झाड तोडावे. झाड तोडताना साल सहज सुटत नसेल, तर साधारणपणे आठवड्याच्या अंतराने तपासणी करत राहावे. त्यानंतर साल काढावी.

प्रत्यक्ष साल काढण्याची पद्धत

  1. खोडावरून साल सहजगत्या सुटते अशी खात्री झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी साल काढताना खोडाचा 20 सें.मी. भाग ठेवून करवतीच्या/ कोयत्याच्या सहायाने कापावा.
  2. त्यानंतर फांद्याचे आवश्‍यकतेनुसार दोन ते अडीच फुटांचे तुकडे करावेत. सदर फांद्यांच्या तुकड्यावरील खडबडीत साल हलक्‍या हाताने चाकूच्या सहायाने खरवडून काढावी म्हणजे आतील पिवळसर तुकड्यावर दोन उभे काप एकमेकांच्या विरुद्ध दिशेला द्यावेत.
  3. यानंतर चाकूच्या बोथट बाजूचा वापर करून साल सैल करून काढावी. फांद्या तोडल्यापासून शक्‍यतो ताबडतोब साल काढावी.
  4. झाड तोडल्यानंतर शिल्लक असलेल्या बुंध्यावर असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे साधारण दोन वर्षांचे (लागवडीपासून पाचव्या वर्षी) झाले, की काढण्यायोग्य होतात.
  5. झाडावरील अंगठ्या इतक्‍या जाड व भुरकट रंगाच्या जून झालेल्या फांद्या धारदार कोयत्याने/ करवतीने खोडाचा थोडा भाग शिल्लक ठेवून तोडाव्यात.

साल वाळविण्याची पद्धत

  1. साल सावलीत वाळवावी. साल काढलेल्या फांद्या उन्हात वाळवाव्यात. ज्या फांद्यावरून साल काढलेली असते, अशा फांद्या नंतरची साल बांधण्यास वापराव्यात.
  2. पहिल्या दिवशी साल बांधणीसाठी फांद्या उपलब्ध होणार नाहीत. म्हणून घरी असलेल्या काठ्या (वाळलेल्या) अथवा प्लॅस्टिक पाइप घेऊन त्यावर साल बांधावी. त्यामुळे साल मिटत नाही. त्याची प्रत खराब होत नाही. साल अशीच वाळवली तर त्याची गुंडाळी होते. त्यामुळे आतील भाग वाळत नाही, त्या ठिकाणी बुरशी येते. त्यामुळे त्याची प्रत खराब होते.
  3. साल चढवलेल्या काठ्या सावलीत ज्या ठिकाणी भरपूर प्रकाश आहे, अशा ठिकाणी उभ्या करून ठेवाव्यात. पाच ते सहा दिवसांनी काठ्यावरून साल सोडून घ्यावी. त्यानंतर उन्हामध्ये 10 ते 15 मिनिटे वाळवल्यानंतर मग हवाबंद डब्यात ठेवावी.

दालचिनीची पाने वाळविण्याची पद्धत

  1. झाडे तोडल्यानंतर फांद्यावरची पाने अलग करावीत आणि ती सावलीत वाळवावीत. त्यांचा तमालपत्र म्हणून उपयोग करावा.
  2. सदर पानांपासून कारखान्यामध्ये तेल काढता येते. तेलाचा उपयोग लवंगाच्या तेलासारखा करता येतो. त्यामध्ये युजेनॉल हा घटक असतो.
  3. एका झाडापासून सुमारे 1.5 ते 2 किलो दालचिनीची पाने मिळतात.

 

संपर्क - 02352- 255077 
(लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate