मोसंबी व केशर आंब्यातून घेताहेत लाखोंचे उत्पादन
उस्मानाबाद जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर फळबागेचा एक पर्याय म्हणून समोर आला आहे. "शिराढोण" ( ता.कळंब ) येथील युवा व प्रगतशील शेतकरी राजेंद्र मुंदडा यांनी आपल्या ११० एकर माळरान जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ठिबक द्वारे पाण्याचे नियोजन करून मागील चार-पाच वर्षांपासून लाखोंचे उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची राज्य सरकारने नोंद घेऊन त्यांना शेतीनिष्ठ "उद्यान पंडित " पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिराढोणच्या कुसळ्या माळरानावर उत्पादन झालेल्या न्यू शेलार जातीच्या मोसंबीने २०१३ च्या दुष्काळात दिल्लीची बाजारपेठ काबीज करीत ४० लाखाहून अधिकचे उत्पादन घेतले आहे.
सध्याही दरवर्षी त्यांना मेहनत्तींबरोबरच नशिबाची साथ मिळत असून, ते मोसंबी च्या उत्पादनातून लाखोंची कमाई करताहेत. राजेंद्र मुंदडा यांनी शिराढोणच्या माळरानावर असलेल्या हलक्या प्रतिच्या ३० एकर जमिनीवर २००९ मध्ये मोसंबीच्या ५६०० झाडांची लागवड केली.सेंद्रिय व गांडूळ खतांचा वापर करीत त्यांनी ही भलीमोठी बाग जोपासली.ठिबक सिंचन योजनेद्वारे त्यांनी या बागेत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्याचे नियोजन केले. यासाठी त्यांनी बागेत १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले.गेल्या तीन-चार वर्षापासून या भागातील शेतकरी हा दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना त्यांनी दरवर्षी या मोसंबीच्या बागेतून ऊस व द्राक्ष पिकाला लाजवेल असे भरघोस उत्पादन घेतले आहे.
सध्या त्यांच्याकडील मोसंबीने दिल्लीची बाजारपेठ काबीज केली आहे.मुंदडा यांच्याकडील न्यू शेलार जातीच्या या मोसंबीला दोन वेळेस बहार येतो.नोव्हेंबर मध्ये आडकणी बहार तर मार्च मध्ये मृग बहार येतो.
राजेंद्र मुंदडा कडे केशर आंब्याची ८० एकर बाग असून ,यामध्ये ७२०० झाडे ही आंब्याची आहेत.या आंबा बागेतूनही त्यांना सध्या दरवर्षी लाखोंचे उत्पादन मिळत आहे.सेंद्रिय खतावर जोपासलेल्या त्यांच्याकडील केशर आंब्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यांच्याकडील आंब्यानी युरोप बाजारपेठ पर्यंत मजल मारली आहे.जिद्द, चिकाटी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याच्या बळावर त्यांनी हे यश संपादित केले आहे. आता त्यांनी याच माळरानावर काळीपत्ती या जातीच्या चिकुची व सीताफळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, यातूनही त्यांना लाखोंचे उत्पादन अपेक्षित आहे.
राजेंद्र मुंदडा यांची फळबाग पाहण्यासाठी परिसरतीलच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील शेतकरी आवर्जून भेट देत आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. फळबागेतील अचूक तंत्र व ज्ञान त्यांनी अवगत केल्यामुळे व मुंदडा यांच्याप्रयत्नांना यशही लाभत असल्याने या परिसरातील शेतकरी राजेंद्र मुंदडा याना फळ बागेतील " डॉक्टर " म्हणूनच संबोधित आहे. ऊस व द्राक्ष या पिकांच्या मागे शेतकऱ्यानी न लागता फळबागेकडे लोकांनी आकर्षित व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
लेखक - मोतीचंद बेदमुथा,
उस्मानाबाद ( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/19/2020