शास्त्रीय नाव - Nelumbo nucifera (निलुम्बो न्युसिफेरा)
कुळ - Nelumbonaceae (निलूम्बोनेसी)
स्थानिक नावे - पद्मकमळ, सूर्यकमळ, लक्ष्मीकमळ
संस्कृत नावे - अरविंद, पंकज, पद्म
इंग्रजी नावे - चायनीज वॉटर लिली, इजिप्शियन वॉटर लिली, पायथॅगोरीअन बीन, इंडियन सॅक्रेड लोटस
तळे, तलावामध्ये अनेक प्रकारची कमळे आढळतात. ही वनस्पती उष्ण प्रदेशात भारतात सर्वत्र तलाव-तळ्यात वाढते. महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर, हिंगोली, चंद्रपूर विदर्भात मुबलकपणे आढळून येते. कमळाच्या प्रत्येक भागास वेगवेगळी नावे असून, व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची आहेत. बियांना संस्कृतमध्ये "पद्मबीज' म्हणतात, तर गुजराथीमध्ये "पबडी' म्हणतात. बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात, तर संस्कृतमध्ये कंदास शालूक म्हणतात. कंदाचे सुकविलेले तुकडे "भिशी' या नावाने मुंबईत विकतात. कंदापासून तयार केलेल्या पिठास मुंबईच्या बाजारपेठेत मखाण म्हणतात, तर फुलांतील पुंकेसरास किंजल्क म्हणतात.
पद्मकमळ या वनस्पतीचे कंद, पाने, फुले, बिया व पुष्पस्थली औषधात वापरतात.
कमळकाकडी भाजी करण्यासाठी वापरतात. अत्यंत थंड व पौष्टिक असल्याने शरीरातील ताकद वाढविण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त मानतात. या भाजीमुळे रक्तातील उष्णता कमी होते. या भाजीने बाळंतीणीचे दूध वाढते. कमळकाकडीच्या भाजीने पित्तामुळे होणारा त्रास, लघवीची जळजळ इ. लक्षणे कमी होतात. ताप येऊन गेल्यानंतर उष्णतेचा परिणाम कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे.
- कमळकाकडीची भाजी काश्मीर व गुजरातमध्ये अगदी आवर्जून खातात, तर सिंधी खाद्यसंस्कृतीत या भाजीला विशेष महत्त्व आहे.
1 - साहित्य - कमळकाकडी, मटार दाणे, कांदा, लसूण, हळद, टोमॅटो, खोबरे, गरम मसाला किंवा खडा मसाला, आले, कोथिंबीर, लाल मिरच्या, पुदिना, धने, मीठ इ.
कृती - कमळकाकडी चांगली सोलून घ्यावी. कुकरमध्ये कमळकाकडीच्या फोडी आणि मटार दाणे उकडून घ्यावेत. कमळकाकडी फार मऊ होऊ नये, यासाठी शिजवताना पाण्यात अर्धा चमचा मीठ घालावे. कांदा, खोबरे, धने, मिरच्या, खडा मसाला असल्यास तव्यावर तेल टाकून भाजून घ्यावा. तेल गरम करून त्यावर वाढलेला मसाला, हळद घालून सुगंध येईपर्यंत परतावे, मग त्यात शिजवलेली कमळकाकडी व मटार दाणे व चिरलेला टोमॅटो घालावा, नंतर चांगले परतून घ्यावे. मग कमळकाकडी शिजवून राहिलेले पाणी न फेकता भाजीत घालावे. नंतर मीठ व कोथिंबीर टाकून पाच मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
2 - साहित्य - कमळकाकडी, तिखट, सुंठूपूड, बडीशेप, घुसळलेले दही, मीठ, तेल, जिरे, हिंग पावडर इ.
कृती - कमळकाकडी सोलून दोन इंची तुकडे करावेत. हे तुकडे तेलात तांबूस तळावेत. तेलात हिंग टाकून थोड्या पाण्यात तिखट, बडीशेप, सुंठ पूड मिसळून ते तेलात घालावे. जिरे व दही घालावे. उकळून त्यात मीठ व कमळकाकडीचे तुकडे घालावेत. मंद आचेवर शिजवावे. या पाककृतीस "रोगनजोश' म्हणतात.
डॉ. मधुकर बाचूळकर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ ...
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभ...
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आ...
करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत...