অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रानभाजी - भारंगी

भारंगी

ओळख रानभाज्यांची - भारंगी


शास्त्रीय नाव - Clerodendrum serratum (क्‍लेरोडेंड्रम सिरेटम)
Family : Verbenaceae (व्हर्बेनेसी)

 

भारंगी ही वनस्पती "व्हर्बेनेसी' म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.

ओळख भारंगीची...


फांद्या - चौकोनी.
पाने - साधी, समोरासमोर किंवा तीन पाने मंडलामध्ये, 10 ते 15 सें.मी. लांब, 5 ते 8 सें.मी. रुंद, लंबवर्तुळी, दोन्ही टोकांकडे निमुळती, टोकदार कडा कातरलेल्या.
फुले - निळसर-पांढरी, फांदीच्या टोकांवर, मोठ्या पुष्पसंभारात. पुष्पकोश 5 दलांनी बनलेला, दले एकमेकास चिकटलेली, ओष्ठाकृती, पुष्पमुकुटनळी केसाळ, पाकळ्या निळसर-पांढऱ्या पण खालचा ओठ गर्द निळा, बोटीच्या आकाराचा, त्यावर दोन लांबट पांढरट-हिरव्या ग्रंथी. पुंकेसर 4, दोन लांब व दोन खुजे. केसरतंतू वाकलेले, तळाशी केसाळ, खाली पाकळ्यांना चिकटलेले. बीजांडकोश दोन ते चार कप्प्यांनी बनलेला. परागवाहिनी टोकाकडे वाकलेली, परागधारिणी दुभागलेली, फळे गोल, चकचकीत, चार गोलाकार भागात विभागलेली. पिकलेली फळे काळसर-जांभळी. बिया 2 ते 4, मांसल, काळसर रंगाच्या.

आढळ

- भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते.

औषधी उपयोग -

- भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
- दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
- पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
- पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
- भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.

* भारंगीच्या पानांची भाजी -


पाककृती -
साहित्य - भारंगीची कोवळी पाने (देठ काढून टाकावेत.) अर्धी वाटी चिरलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मीठ, तिखट, गूळ, तेल, हिंग, मोहरी, हळद इ. कृती - जास्त तेलावर कांदा-लसूण परतून घ्यावे, त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा हबका मारावा. तिखट, मीठ, हळद, थोडा गूळ व हिंग घालून शिजवून उतरवावे. भारंगीची भाजी कडू असल्याने शिजवून पाणी काढून करतात.

* भारंगीच्या फुलांची भाजी -


साहित्य - दोन वाट्या भारंगीची फुले, एक वाटी चिरलेला कांदा, मूगडाळ, तिखट, मीठ, गूळ, तेल, मोहरी, हळद, हिंग इ.
कृती - फुले चिरून घ्यावीत व 2-3 वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. यामुळे कडवटपणा निघून जातो. तेलाच्या फोडणीत कांदा परतावा. त्यात मूगडाळ नुसती धुऊन घालावी. मग चिरलेली फुले घालावीत, परतावे. मग तिखट घालावे. मंद गॅसवर परतावी. प्रथम फुलांमुळे भाजी जास्त वाढते. नंतर शिजून कमी होते. पूर्ण शिजल्यानंतर मीठ घालावे. नंतर गूळ घालून परतून उतरावे. गुळाऐवजी साखर वापरू शकता. बेसन पेरूनही भाजी छान लागते. भाजलेले डाळीचे कूट, तीळ भाजून पूड, खसखस, किसलेले खोबरे घालूनही भाजी चवदार बनविता येते.

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. मधुकर बाचूळकर

स्त्रोत: अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate