हादगा

शास्त्रीय नाव- sesbania grandiflora (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा)

कूळ - Fabaceae (फॅबेसी)

हादग्याच्या लहान वृक्षांची लागवड मंदिर परिसरात, तसेच शेतात बांधावर करतात. हादग्याचा वृक्ष ३० फुटांपर्यंत सरळसोट वाढतो. हा वृक्ष जलद वाढतो, पण त्याचे आयुष्यमान कमी असते. खोड व फांद्या नाजूक व ठिसूळ. फांद्या खोडाच्या वरील भागात, पसरणाऱ्या व खाली झुकलेल्या असतात. हादग्याला ‘अगस्ता’ असेही म्हणतात.

हादग्याची पाने -

संयुक्त, एकाआड एक, १५ ते ३० सें. मी. लांब. पर्णिकेच्या १० ते ३० जोड्या.
फुले - लंबगोलाकार आकारांनी मोठी, अनियमित, द्विलिंगी, पांढरी, पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची, पानांच्या बेचक्यातून येणाऱ्या लहान पुष्पमंजिरीत येतात. पुष्पकोश ५ संयुक्त दलांनी बनवलेला. पाकळ्या ५, असमान व अनियमित. मोठी पाकळी ६ ते १० सें. मी. लांब, दोन पाकळ्या मध्यम आकाराच्या व दोन पाकळ्या लहान, तळाशी साधारण चिकटलेली. पुंकेसर १०, एकमेकांस चिकटून दोन पुंकेसर नलिका तयार होतात. बीजांडकोष लांब, गोलाकार, चपटा, एककप्पी.
शेंगा - शेंग फूटभर लांब, चारकोनी. एका शेंगेत १५ ते २० बिया, तपकिरी रंगाच्या. हादग्याला सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात फुले व फळे येतात. फुलांची व कोवळ्या शेंगांची भाजी करतात.

औषधी उपयोग -

- हादग्याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरतात. साल फार ग्राही आहे. पाने अानुलोमिक व शिरोविरेचन आहेत. मूळ उष्णवीर्य, वातहर, कफघ्न व शोथघ्न आहे. फुले दीपन व आनुलोमिक आहेत.
- अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे असतात, अशा वेळी हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात, त्यानंतर घाम येतो व कफ पडावयास लागतो.
- पाने ठेचून व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते.
- ज्वर, डोळेदुखी, धुंदी यामध्ये पानांच्या रसाचे नस्य करतात. त्याने पुष्कळ पाणी वाहते. ठेचाळलेल्या भागावर पानांचा लेप करतात.
- दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात. संधिशोथात मुळाचा लेप करतात.

हादग्याची भाजी

- हादग्याची फुले चवीला थोडी कडवट, तुरट असतात. त्याचा पाक तिखट असतो. फुले गुणाने थंड आहेत, त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
- चार-चार दिवसांनी थंडी वाजून येणाऱ्या तापावर हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे.
- वरचेवर होणाऱ्या सर्दीचा त्रास या भाजीच्या तिखट गुणधर्माने कमी होतो.
- भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यासही हादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो.
- ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते, अंगावरून कमी जाते, पाळीच्या दिवसांत कंबर, ओटीपोटी दुखते अशा तक्रारी या भाजीच्या सेवनाने कमी होतात.
- ‘अ’ या जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा निर्माण होतो. यामध्ये रोग्यास संध्याकाळ झाली की दिसावयाचे पूर्णपणे बंद होते, अशा वेळी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो.
- हादग्याच्या फुलांच्या भाजीने जेवणात रुची निर्माण होते. शेंगांचीही भाजी करतात.

पाककृती

हादगा फुलांची भाजी

१) साहित्य - हादग्याची फुले, कांदा, लसूण, ओली मिरची, हिंग, जिरे, तेल इ.
कृती - फुले स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन चिरलेला कांदा त्यात भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, जिरे किंवा जिरे पावडर, ओली मिरची घालून परतणे आणि नंतर चिरलेली भाजी घालून परतणे व शिजवून घेणे.
२) साहित्य - हादग्याची फुले, भिजवलेली मूगडाळ, कांदा, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, गूळ, तिखट, भाजलेले खोबरे व खसखस इ.
कृती - फुले स्वच्छ धुऊन ती बारीक चिरावीत. फोडणीत भिजवलेली मूगडाळ, चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. नंतर त्यावर चिरलेली फुलं टाकून परतावीत. शिजत आल्यानंतर मीठ, गूळ, तिखट, खोबरे घालून तीन-चार वाफा आणाव्यात. कांदा आवडीनुसार घालावा. तयार झालेल्या भाजीत भाजलेले खोबरे व थोडी भाजलेली खसखस घालावी.
हीच भाजी शिजवल्यानंतर वरून थोडे डाळीचे पीठ लावून परतूनही तयार करतात.

फुलांचे भरीत

साहित्य - हादग्याची फुले, दही, मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर, तूप, जिरे इ.
कृती - प्रथम फुले चिरून उकडून घ्यावीत. फुलांमध्ये मीठ, साखर घालावी व वरून फोडणी द्यावी. फोडणीत मिरची तुकडे घालावेत.

फुलांच्या देठाचे सांडगे

साहित्य - हादग्याच्या फुलांचे देठ, दही, धने-जिरपूड, मीठ इ.
कृती - हादग्याच्या फुलांचे देठ काढावेत. या देठांचे सांडगे छान होतात. आंबट दह्यात धने- जिरेपूड व मीठ घालून ते चांगले कालवावेत व त्यात देठे बुडवून ती उन्हात वाळवावीत. पुन्हा दोन दिवसांनी तशीच दोन वेळा पुढे घ्यावीत व ती कडक वाळवून तळण्यासाठी वापरावीत. फुलांची भजीही करतात.

शेंगांची भाजी -

साहित्य - हादग्याच्या कोवळ्या शेंगा, चिरलेला कांदा, तेल, मीठ, तिखट, ओले खोबरे, कोथिंबीर इ.

कृती - कोवळ्या शेंगांचे लहान तुकडे करावेत. ते नीट निवडावेत. कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यावा. निवडलेल्या शेंगांचे तुकडे, मीठ, तिखट घालावे व परतावेत. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालवून शिजवावे. गरज वाटल्यास मसाला घालावा. भाजी तयार झाल्यानंतर त्यावर किसलेले ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.

(क्रमशः)
डॉ. मधुकर बाचुळकर

स्त्रोत - अग्रोवन