हिंदी नाव : महुवा
संस्कुत नाव : मधुक
इंग्रजी नाव : Butter tree
वनस्पतिशास्त्रीय नाव : Madhuka indica / Bassica latifolia
मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. तो जंगली वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातल्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. कमी पावसाच्या कोरड्या व उष्ण हवामानात मोह वाढतो. समशीतोष्ण हवामानातही तो वाढतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, ओरिसा या राज्यांतील अरण्यात मोहाची झाडे आहेत. हिमालयातील टेकड्यांच्या पायथ्यालाही मोह वृक्ष दिसतात. रावी पासून गंडकी नदीच्या खोर्यापर्यंत मोहाची झाडे आढळतात. कमीत कमी १ ते ८ डिग्री सेंटिग्रेड व जास्तीत जास्त ४१ ते ४८ सेंटिग्रेडपर्यंतचे तापमान मोहाचे झाड सहन करू शकते. ७५० मिलिमीटर ते १८७५ मिलिमीटर पावसात मोहाची झाडे चांगल्या रीतीने वाढतात. मध्य व उत्तर प्रदेशात आंब्यांच्या झाडांच्या खालोखाल मोहाची झाडे वाढलेली दिसतात. दक्षिण भारतात ही मोहाची झाडे आहेत. मात्र भारतातील वाळवंटी प्रदेशात मोह आढळत नाही. कारण वाळवंटी भागातील उष्णता त्याला सहन होत नाही.
मोह डेरेदार वृक्ष आहे. तो ४० ते ६० फुट उंच वाढतो. मोहाचे झाडं ६०/७० वर्षापर्यंत जगते. त्याच्या खोडाचा घेर मध्यम असतो. साल धुरकट-राखत रंगाची असते. तिच्यावर उभे पापुद्रे असतात किंवा आडव्या खाचा असतात. साल १.२ सेंटीमीटर जड असते. त्याच्या गाभ्यातले लाकूड लालसर तपकिरी असते. मोहाचे लाकूड खूप कठीण व सरळ असते. जाड व टिकाऊ असते. त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही. मात्र त्याला कीड लागते. काष्ठकण खूप जवळ जवळ असल्याने करवतीने कापणे खूप अवघड जाते. प्रत्येक क्युबिक फुटास लाकडाचे वजन २५० किलो भरते. मोहाचे पाने लांबोळी असतात. गुळगुळीत असतात. फांदीच्या शेंड्यांवर पानांचा झुपका उगवतो. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मोहाची पाने झडतात. त्या वेळी मोह फुलू लागतो. फुलांचा रंग फिका बदामी असतो. त्यांचा बाह्य कोश मनुक्याच्या रंगासारखा दिसतो फुले अर्धा इंच आकाराची असतात. फुले रात्री फुलतात. सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. फुलांचा बहार ओसरल्यावर मोहाच्या झाडास फळे येऊ लागतात. त्याच बरोबर लाल पालवीने मोह बहरतो. फळांच आकार बोरासारखा वाटोळा असतो. फळांचा रंग हिरवा असतो. फळे रसाळ असतात. जून-जुलैत फळे पिकतात व खाली गळून पडतात. दक्षिण भारतात ऑगस्ट-सप्टेंबरात फळे गळून खाली पडतात.
कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह सातपुड्यातल्या आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग बनवितात. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत ‘बटर ट्री’ म्हणतात.
मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ब जीवनसत्त्व असते. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की ठाकर, कातकरी, कोरकू, गोंड, माडिया या आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.
फुलात साखरेबरोबरच कॅल्शियम व इतर जीवनसत्वे असतात. कार्बोहैड्रेटस्, प्रोटीन्स, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्ये फुलात असतात. आदिवासी तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. इतर कोणत्याही टॉनिक पेक्षा अशा प्रकारचे अन्न हे उत्तम टॉनिक आहे. त्याचा आदिवासींच्या शरीरपोषणास उत्तम उपयोग होतो.
एक टन फुलांपासून ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. इंजिनचे इंधन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो. व्हिनेगर बनवण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. अहमदाबादच्या फूड क्राफ्ट संस्थेने मोहाच्या फुलांपासून जॅम आणि जेली बनवण्याचा गृहउद्योग सुरु केला आहे. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी वाढत आहे.
फेब्रुवारी-मार्च मध्ये मोहाची फुले फुलतात. फुलण्यासाठी त्यांना कमी प्रकाश लागतो. ही फुले बहुतेक वेळा रात्री फुलतात. सकाळी खाली पडतात. आदिवासी फुले गोळा करून वाळवतात. बाजारात विकतात. एका झाडापासून त्याच्या वयोमानानुसार ५ पासून ३० किलो पर्यंत फुलांचे उत्त्पन्न मिळते. विसाव्या वर्षी ३० किलो, तिसाव्या वर्षी ६० किलो, चाळीसाव्या वर्षी ७५ किलो, पन्नासाव्या वर्षी १३५ किलो व साठाव्या वर्षी १४० किलो फुलांचे उत्पन्न मोहाच्या एका झ्दापासून मिळते. भारताच्या मोहाच्या फुलांचे एकूण उत्पन्न २० लाख टन आहे.
जून-जुलैत मोहाची फळे पिकतात. फळे गोल असतात. फळात भरपूर रस असतो. फळे पिकल्यावर खाली पडतात. आदिवासी व खेड्यापाड्यातील लोक फळे गोळा करतात. फळे तशीच वा शिजवून त्याची भाजी करून खातात. फळातही भरपूर प्रमाणात साखर असते. अल्कॉहालचे प्रमाणही चांगले असते. एक टन फळांपासून ११० लिटर शुध्द अल्कोहोल मिळते. याशिवाय फळात तेल, इथिल, टर्पेंटाईन ओईल असते. सर्वात जास्त प्रमाणात ६७.९% अल्कोहोल असते.
मोहाच्या बियांत २० ते २५% तेल असते. तसेच इतर रसायने असतात. क्रूड, प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, राख, पोटाश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियांत असतात. लाकडाच्या घाणीत या बियांचे तेल काढतात. आदिवासी भाज्यांत व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे. या तेलाचा चार्म रोग व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो. तसेच मेणबत्ती व कन्फेक्शनरी बनवण्यासाठी मोहच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. धुण्याचा साबण बनवण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोहाचे तेल तुपासारखे दिसत असल्याने शुद्ध तुपात भेसळ करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. धुण्याचा साबण बनवण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. साबण बनवणार्या कारखान्यांकडून या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अल्कोहोल व स्टॅटिक अॅसिड बनवण्यासाठी मोहाच्या बियांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. कार्बन व डिंक बनवण्यासाठीही मोहाच्या बिया वापरतात.
बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत आहे.
मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, घराजवळ येत नाहीत असा आदिवासींचा विश्वास आहे. सर्पदंशावरही ते पेंडीचा उपयोग करतात. पाण्यातल्या माशांना भुलवण्यासाठी आदिवासी पाण्यात पेंडीचा भुसा टाकतात.
एका मोहाच्या झाडापासून आकारमानानुसार ५ ते २५ किलो वाळलेल्या बिया मिळतात.
मोहाच्या सालीत टॅनिन असते. सालींचा उपयोग रंगासाठी करतात. मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दुध देतात. असा त्यांचा अनुभव आहे. ज्या भागात जनावरांच्या चार्याची टंचाई भासते त्या भागात मोहाची पाने चार्याची गरज भागवण्यास उपयोगी पडतात.
पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते. ५ ते १० रुपये शेकडा भाव मिळतो.
मोहाचे लाकूड सागापेक्षाही कठीण असते. परंतु किडीमुळे त्याचा टिकाव लागत नाही, हा मोठा दोष मोहाच्या लाकडात आहे. मोहाच्या झाडात १७% टॅनिन असते. त्याचा रंगासाठी उपयोग होतो. ०.१६ एम्.एम्. आकाराचा फायबरचा धागाही लाकडापासून मिळतो. पेपर बनवण्यासाठी लागणारा लगदाही या लाकडाचा बनवितात. फर्निचर, नावा, बैलगाड्यांची चाके, छोटे छोटे लाकडी पूल, चहाची खोकी, घरांचे खांब व तुळ्यांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो. परंतु या कारणासाठी मोहाचे झाड सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे पाने, फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे हे इतर उत्पन्न अधिक महत्वाचे आहे.
आदिवासी मोहाच्या झाडाला पवित्र मानतात. आपला अन्नदाता मानतात. म्हणून ते मोहाचे झाड तोडत नाहीत. जन्म, मृत्यू, विवाह, सणांच्या दिवशी मोहाच्या झाडाची पूजा करतात. लग्नाच्या दिवशी गाणी म्हणत मोहाच्या झाडाची फांदी तोडून आणतात. फांदी मांडवात रोवतात. नवरा-नवरी या फांदीची पूजा करतात. आपल्या सुखी संसारासाठी मोहाच्या झाडाची प्रार्थंना करतात.
अनेक आयुर्वेदीय औषधांत मोहाचा उपयोग केला जातो. मोहाच्या लाकडातील टॅनीनचा जखमेवरील उपचारासाठी उपयोग केला जातो. मोहाच्या खोडातून व फुलांतून पांढरा चीक निघतो. या चिकाचा उपयोग संधिवातावर उपचार करताना होतो. बियांपासून निघणारे तेल सांधेदुखी, डोकेदुखी व इतर दुखण्यांवर वापरतात. गोवर, कांजण्या, फोड यांवरही आदिवासी तेलाचा उपयोग करतात.
माहिती लेखन : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 8/25/2020
तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा ...
तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमी...
जंगले ही मृद्संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्क...
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड...