सध्याच्या काळात वनशेतीमध्ये विविध वृक्षांचे बियाणे गोळा करणे, वृक्षाची छाटणी आणि वणव्यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. वृक्षांची छाटणी केल्यास नवीन फांद्या येण्यास मदत होऊन झाडाची प्रतसुद्धा सुधारते.
सध्याच्या काळात वनवृक्षांचे बियाणे गोळा करावे. बियाणे योग्य पद्धतीने वाळवावे. बियाण्याची गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी. लागवडीपर्यंत बियांची ओळख ठेवणे आवश्यक असते. वनीकरण कार्यक्रमासाठी सातत्याने योग्य मात्रेत बी मिळवणे आवश्यक आहे. बियांची मात्रा निश्चित करून पुरेशा मात्रेत बी गोळा करून साठवणूक केली तरच वेळेवर बीपुरवठा करणे शक्य होते. चांगले बीजधारण काही ठरावीक वर्षाच्या अंतराने होत असते. वृक्ष फुलोऱ्यावर असताना येणारे रोग, कीड, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होतो हे लक्षात घेऊन चांगले पीक ज्या वर्षी आले असेल, त्या वर्षी जास्तीत जास्त बियाणे गोळा करून चांगले प्रकार संग्रहित करून ठेवावे.
1) वृक्षावरून आपोआप जमिनीवर पडलेल्या बिया एकत्रित करणे कमी खर्चाचे व सोपे काम आहे.
2) वृक्षाखालील जागा साफ करून वृक्षावरून पडलेल्या व तोडलेल्या फळाचे बी गोळा करावे.
3) या पद्धतीने साग, शिवण, आवळा, हिरडा, बेहडा इत्यादी वृक्षाचे बी गोळा करता येऊ शकते. मात्र बियाणे जर ताबडतोब एकत्र केले नाही तर बियांना किडे, पशु-पक्ष्यांपासून हानी होते.
4) बांबू, तीक्ष्ण चाकू लावलेला दांडा इत्यादी साहित्याच्या साह्याने उभ्या वृक्षापासून बी एकत्र करता येते. वृक्षावर चढून बीज तोडायचे असल्यास लोखंडी शिडी, दोरांच्या शिड्यांचा वापर करून बियाणे गोळा करावे. जर वृक्षाचे बी 10 टक्क्यांपेक्षा जास्त किडलेले, पोकळ असेल तर ते बियाणे गोळा करू नये.
1) वनसंपत्तीचे वणव्यापासून संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. जानेवारी ते मे या महिन्यात वने, वनशेती किंवा बागांना आग लागण्याची शक्यता जास्त असते.
2) आपल्या बागेला किंवा वनक्षेत्राला आग लागू नये, यासाठी वनक्षेत्राच्या चारही बाजूने गवत, काडी-कचरा इत्यादी जाळून नष्ट करावा. जेणेकरून आग लागल्यास ती आतील भागापर्यंत पोचणार नाही.
3) साधारणपणे 10 ते 20 फूट पर्यंतचा सलग पट्टा साफ केल्यास आग पसरण्याचे प्रमाण खूप कमी होते. तसेच वनक्षेत्राच्या आतील बाजूचे संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्राच्या मध्यभागापासून एक उभा व एक आडवा 10 ते 20 फूट पर्यंतचा पट्टा साफ केल्यावर आतील भागाचा वणव्यापासून बचाव होऊ शकतो. एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये वणवा पसरण्याची भीती राहत नाही.
4) वनक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी फायर लाइन काढायची आहे, अशा ठिकाणचे गवत, झुडपे कापून, पालापाचोळा जमा करून 10 ते 15 दिवस ठेवावा. हे सर्व वाळल्यानंतर त्याला नियंत्रितपणे आग लावल्यास फायर लाइन तयार होईल. या प्रकारात खर्चसुद्धा होतो. ही पद्धत दीर्घवेळ वणव्यापासून संरक्षण देते.
1) शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत, वनशेतीत वृक्षांची छाटणी जानेवारी ते मार्च दरम्यान केल्यास फायदेशीर ठरते.
2) वृक्षांची छाटणी केल्यास नवीन फांद्या येण्यास मदत होऊन झाडाची प्रतसुद्धा सुधारते.
3) छाटणी करताना रोग, किडी किंवा वणव्यामुळे तुटलेल्या सर्व फांद्या तोडाव्यात.
4) 2-3 वर्षं वयाच्या वृक्षाची छाटणी करता येऊ शकते. छाटणी करताना वृक्षाला कोणत्याही प्रकारची इजा किंवा जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. अत्याधुनिक व धारदार अवजारांच्या मदतीने वृक्ष छाटणी करावी.
अ. क्र. वृक्ष प्रजाती गोळा करण्याचा हंगाम
1) आपटा जानेवारी ते मार्च
2) आवळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी
3) ऑस्ट्रेलियन बाभूळ डिसेंबर ते फेब्रुवारी
4) कवठ नोव्हेंबर ते मार्च
5) कळम नोव्हेंबर ते जानेवारी
6) काळा शिरस जानेवारी ते मार्च
7) कांचन डिसेंबर ते जून
8) धावडा जानेवारी ते फेब्रुवारी
9) पांढरा शिरस जानेवारी ते एप्रिल
10) बिजा जानेवारी ते एप्रिल
11) बिब्बा डिसेंबर ते मार्च
12) बेहडा नोव्हेंबर ते फेब्रुवारी
13) लिंबारा जानेवारी ते फेब्रुवारी
14) लेंडिओ डिसेंबर ते फेब्रुवारी
15) शिरस जानेवारी ते फेब्रुवारी
16) शिसम डिसेंबर ते जानेवारी
17) सागवण नोव्हेंबर ते जानेवारी
18) सुबाभूळ जानेवारी ते जुले
10) हिरडा जानेवारी ते मार्च
संपर्क - डॉ. सतीश नारखेडे
9422863027
(लेखक वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्ण...
पीक संरक्षण हा शैती व्यवसायातील महत्त्चाचा घटक आहे...