অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनीकरणासाठी बेहडा आणि हिरडा

बेहडा आणि हिरडा हे पर्णझडी वृक्ष भारतात बहुतांश ठिकाणी आढळतो. या वृक्षांचे औषधी उपयोग तर आहेतच, शिवाय त्याच्या लाकडाचेही उपयोग होतात. इतर वनवृक्षांच्या मानाने या वृक्षाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे वनीकरणासाठी या वृक्षांची लागवड करावी.
हा उंच वाढणारा पर्णझडी वृक्ष आहे. भारतामध्ये सखल भागात अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून, समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, शुष्क पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळून येतो. साल व साग वृक्षांच्या जंगलात हा वृक्ष प्रामुख्याने आढळतो. सुमारे 10-12 मीटर वाढणाऱ्या या वृक्षाच्या खोडाच्या तळास "बट्रेस'मुळे असतात. फांद्यांच्या टोकाला घोळक्‍याने पाने आलेली असतात. काहीशी अंडाकृती, गोलाकार पाने असतात. फुले पिवळसर-पांढरट गुच्छात बिनदेठाची असतात. फळे गोलाकार परिपक्व झाल्यानंतर बदामी होतात.

लागवड

परिपक्व फळे रोगविरहित मध्यम वयाच्या झाडापासून गोळा करून ती सावलीत वाळवावीत. फळांवरील आवरण पक्षी, माकडे, खारूताई, प्राणी आवडीने खातात, असे बियाणे जमा करून पेरल्यास रोपे चांगली येतात. एका किलोत 50-60 ताजी फळे असतात. फळावरील आवरण काढून टाकल्यास 400 ते 500 बिया एका किलोत असतात. आवरण काढून बियाणे चांगले वाळविल्यास ते एक वर्षापर्यंत साठविता येते. आवरण काढण्यासाठी फळे 24 तास पाण्यात ठेवल्यास ते काढण्यास सोपे जाते. साठवून ठेवलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता 85 ते 95 टक्केपर्यंत मिळते, परंतु रोपेनिर्मितीसाठी ताजे बियाणे वापरले असता रोपे दर्जेदार होतात. त्यामुळे ज्या वर्षीचे बियाणे त्याच वर्षी वापरावे. बियाणे गादीवाफ्यावर पेरताना दोन ओळींतील अंतर 20 सें.मी. व दोन बियांतील अंतर पाच सें.मी. ठेवून पेरावे. साधारणतः 21 दिवसांनंतर बियाणे उगवण्यास सुरवात होते. रोपांना आवश्‍यकतेनुसार पाणी देणे आवश्‍यक असते. तणकाढणी, खते, कीडनाशकांची फवारणी रोपांच्या वाढीनुसार करावी. सुरवातीला रोपांवर पाने कुरतडणारी अळी आढळून येते. रोपे एक महिन्याची झाल्यानंतर पिशवीत इजा न होता टाकून घ्यावी.
बेहडा वृक्षाची लागवड बियांपासून, रोपे तयार करून, खुंटांपासून केली जाते. खुंटनिर्मितीसाठी 12 ते 15 महिन्यांची रोपे वापरावीत. लागवडीसाठी 2 x 2 x 2 फुटांचा खड्डा घेऊन 7 x 7 मीटर अंतराने लागवड करावी. मध्यम निचरा होणारी जमीन या वृक्षास चांगली मानवते. रोपे वनशास्त्र महाविद्यालय येथे प्रति रोप सात रुपयेप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उपयोग

यामध्ये च्युबुलॅजिक ऍसिड, इलाजिक ऍसिड, इथिल ईस्टर, गॅलिक ऍसिड; ग्लुकोज, मॅनीटॉल, रामनोज हे रासायनिक घटक असतात. फळांचा उपयोग मुख्यत्वे करून त्रिफळा चूर्णामध्ये एक घटक म्हणून केला जातो. अतिसार, जुलाब, तापविकार, कफ, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार इत्यादींवर केला जातो. विभितक तेल, त्रिफळा चूर्ण, लवंगादी वटी इ. मध्येही फळांचा व बियांच्या मगजाचा वापर केला जातो. फळांचे टरफल जुलाब व कफ कमी करणारे आहे, तसेच सर्दी, पडसे, खोकला, दमा विकारात उपयुक्त असते. स्वरभंगावरती बेहडा फळे भाजून चघळतात. लाकडाचा उपयोग इमारत व मोटारीचे साटे, फळांसाठी खोके, प्लायवूड, ब्लॅकबोर्ड तयार करण्यासाठी केला जातो.
काढणी ः लागवडीनंतर सुमारे आठ ते दहा वर्षांनंतर फळे मिळण्यास सुरवात होते. चांगल्या मोठ्या वाढलेल्या झाडापासून 50 ते 100 किलोपर्यंत फळे मिळतात.

नवजीवन देणारा हिरडा

हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्‍चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष नैसर्गिकरीत्या आढळून येतो. उंच डेरेदार वाढणारा हा वृक्ष आहे. नव्याने येणारी पालवी, फांद्या इत्यादी भागांवर मऊ चमकणारे चांदीसारखे केस असतात. नवीन येणारी पालवी बदामी लालसर रंगाची असते. पाने अंडाकृती किंवा काहीशी आंब्याच्या पानांसारखी, एकाआड एक 8-20 सें.मी. आकाराची असतात. पाने थंडीच्या वेळी गळून पडतात. फुले मंद, पांढरट, सुवासिक, देठविरहित असतात, फळे अंडाकृती आकाराची असतात. फळांवर कधी कधी पन्हाळीसारख्या पाच रेषा असतात. कोवळ्या वाळलेल्या फळांस "बाळहिरडा', तर परिपक्व फळास "सुरवारी हिरडा' या नावांनी संबोधले जाते.

आयुर्वेद व इतर पारंपरिक औषध पद्धतींमध्ये या वनस्पतींचा उपयोग रसायन म्हणून केला जातो. त्रिफळा चूर्णामध्ये आवळा आणि बेहडा या फळांसोबत हिरड्याच्या फळांच्या चूर्णाचा समावेश असतो. फळांमुळे शरीरातील सर्व क्रिया सुधारतात असे शास्त्र सांगते. अतिसार, आव, आतड्याची शिथिलता, नेत्ररोग, मुखरोग, सूज, हिरड्याचे विकार, मूळव्याध, अर्धशिशी, बद्धकोष्ठता इ. विकारात फळांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चूर्ण, आसव, आरिष्ट, काढे, क्वाथ, गुटी, अर्क, मलम, भस्म, घृत इ. औषधे यांपासून बनविली जातात. कफज त्वचाविकार, अर्श, कृमी या विकारांसाठी 200 हिरडे 11 लिटर पाण्यात शिजवून त्यातील दोन हिरडे रोज मधाबरोबर खाण्याची शिफारस वैद्य करतात. चावून खाल्लेले हिरडे भूक व पचनशक्ती वाढवितात. वाटून खाल्ले असता हिरडे मलवृद्धी करतात. शिजवून खाल्लेले हिरडे मळाला बांधांतून अतिसार थांबवितात. एरंड तेलाबरोबर किंवा इतर तेलाबरोबर भाजून खाल्ले असता रोगांचा नाश होतो असे शास्त्रात दिले आहे.

रोपनिर्मिती व लागवड

हिरडा वनस्पतीची रोपेनिर्मितीसाठी परिपक्व फळे गोळा करून सावलीत वाळवावी. उन्हात वाळविलेली फळे कमी उगवणक्षमता दाखवितात, त्यामुळे फळे सावलीतच वाळविणे आवश्‍यक आहे. चांगल्या वाळलेल्या फळांचा मगज काढून बिया बाजूला करणे आवश्‍यक असते. यासाठी लाकडी ठोकळा किंवा दगड याने फळाचा मगज काढावा. एका किलोत साधारणतः 40-80 फळे आणि मगज काढलेल्या 60-120 बिया असतात. बियांना रोपवाटिकेत वाफ्यावर पेरण्याआधी कोमट पाण्यात चार-सहा दिवस ठेवून वाफ्यावर पेरणी करावी. दोन बियांतील अंतर पाच सें.मी. व दोन ओळींतील अंतर दहा सें.मी. ठेवावे. 21 ते 30 दिवसांत बियाणे उगवते. 60 टक्के उगवण टक्केवारी संस्करण केल्याने आपणास मिळते. उगवलेल्या रोपांना ऊन, पाऊस, कडाक्‍याची थंडी इ. पासून संरक्षण करणे आवश्‍यक असते. यासाठी शेडनेटचे आच्छादन करावे लागते. बियाणे जानेवारी- फेब्रुवारीमध्ये मिळाल्यास रोपे जूनपर्यंत तयार होतात. गादीवाफ्यावर बियाणे उगविल्यानंतर ती पिशवीमध्ये टाकून घ्यावीत. दोन ते चार फूट वाढलेली रोपे लागवडीसाठी वापरावीत. काही ठिकाणी कलमे करून या वनस्पतींची लागवड केली जाते.
लागवडीसाठी 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. दोन झाडांमधील अंतर 4 x 4 मीटर आणि दोन ओळींतील अंतर 7 x 7 मीटर ठेवून लागवड करावी. शेताच्या बांधावर पूर्व-पश्‍चिम लागवड केल्यास शेतातील मुख्य पिकाबरोबर या वनस्पतीपासूनही आपणास उत्पन्न मिळू शकते.
फळामध्ये अथ्रोक्‍यूनान, ग्लुकोसाईड, च्युबेलिनिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, टारचेबिन, व्हिटॅमिन "सी', च्युबेलीन, गॅलिक ऍसिड ही रासायनिक द्रव्ये असतात. लागवडीनंतर 8 ते 12 वर्षांनी उत्पादन सुरू होते. कलमे तयार करून लागवड केल्यास रोपे लवकर फळे देतात. साधारणतः पंधरा वर्षे वयाचे झाड 20 किलो बाळहिरडा किंवा 50 किलो मोठा हिरडा देते. अशा या बहुगुणी आणि नवजीवनदायी वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे अत्यंत गरजेचे आहे.

संपर्क : (02358) 283655
(लेखक वनशास्त्र महाविद्यालय, दापोली येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate