অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चंदन लागवड तंत्रज्ञान

चंदन लागवड तंत्रज्ञान

प्रस्तावना

चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे 12 ते 15 मिटर असून घेर 2 ते 2.5 मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा-समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस-जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण 1 ते 6% असते. चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियांपासून रोपे तयार केली जातात.

रोपे तयार करणे

लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. ताजे बियाणे 2 महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत असते. त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. याकरिता जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लि. पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्तावस्था नष्ट होऊन 1 ते 1।। महिन्यात अंकूरताना दिसतात. एरवी 3 महिन्यापर्यंत देखील अंकुरलेली दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही.

गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत

गादीवाफे 2 प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे 10 मिटर x 1 मीटर आकाराचे करून 15 सेंमी उंची ठेवावी. यामध्ये लालमाती व चाळलेली वाळू 2:1 प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेंमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट 50%) करावी. बी उगविल्यानंतर गवताचे अच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर-जानेवारीत पेरावे.

पिशवीत रोपे लावणे

बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकवी व रोपांच्या पिशव्या अधून मधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडीयोग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियापासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.

लागवड

मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात 16'x12' अंतरावर 1.5 x 1.5 x 1.5 फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व कल्पतरू सेंद्रिय खत (250 ग्रॅम) ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते.

चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत 'शर्विलक' म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड 2-3 वर्षांनी मरते. पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी 1 लि. जर्मिनेटर चे 100 लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना 50 ते 100 मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा जर्मिनेटरचे वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी.

यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा, लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते.

यजमान मध्यम आयुषी झाडे: हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, बकुळ, बारतोंडी इ.

यजमान फळझाडे: सिताफळ, रामफळ, डाळिंब आवळा, बोर.

यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.

आंतरपिक

चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले 4-5 वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिके घेता येतात.

जमीन

लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त, उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा 6.5 ते 8.2 असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते.

हवामान

चंदनाने झाड हे 600 ते 1,600 मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व 12 ते 45 डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते.

पाणी

चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकने द्यावे. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी द्यावे.

आंतरमशागत

लागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये 1 मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने 15 सेमी. पर्यंत खोदून कल्पतरू सेंद्रिय खत 250 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आवश्यकतेनुसार झाडाच्या वयाप्रमाणे तसेच सुगंधी गाभ्याची अधिक वाढ होण्यसाठी सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्याला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.

लेखक: डॉ. स्नेहल दातारकर, प्रा. अमोल नागमोते

स्रोत- कृषी जागरण© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate