ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या प्रमुख अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची मात्रा वाढीच्या अवस्थेनुसार चार वेळा विभागून द्यावी. मातीचे परीक्षण करून खतमात्रा देणे पीक वाढीसाठी फायदेशीर ठरते. ऊस पिकासाठी शिफारशीप्रमाणे एकरी आठ ते 10 टन शेणखत किंवा कंपोस्टचा वापर करावा. शेणखत किंवा कंपोस्ट उपलब्ध होत नसल्यास ऊस लागणीअगोदर ताग किंवा धैंचासारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत. याशिवाय कारखान्यातील मळीपासून तयार केलेले बायोअर्थ कंपोस्ट, गांडूळ खत, कोंबडी खत, मासळी खत, हाडाचा चुरा, गळीत धान्याच्या पेंडी, तसेच खोडव्यात पाचटाचे आच्छादन याद्वारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. ऊस पिकासाठी खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. यामुळे पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
उसासाठी रासायनिक खतमात्रा
लागण हंगाम +खत देण्याची वेळ +खतमात्रा (किलोग्रॅम/एकरी) +रासायनिक खते (प्रतिएकरी गोण्या)
+ + +पद्धत - सरळ खते
+ +नत्र +स्फुरद +पालाश +युरिया +सिंगल सुपर फॉस्फेट +म्युरेट ऑफ पोटॅश
आडसाली +लागवडीच्या वेळी (बेसल डोस) 6 ते 8 आठवड्यांनी 12 - 14 आठवड्यांनी मोठी बांधणीच्या वेळी +16 64 16 64 +35 -- -- 35 +35 -- -- 35 +1 3 1 2 +4.5 -- -- 4.0 +1.25 -- -- 1.0
+एकूण +160 +70 +70 +7 +8.5 +2.25
टीप - 1) को-86032 या ऊस जातीसाठी वरीलप्रमाणे शिफारशीत खतमात्रेच्या 25 टक्के मात्रा वाढवून द्यावी.
2) तक्त्यात दिलेली रासायनिक खते उदाहरण म्हणून दिली असून, शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि प्रत्यक्ष पिकाला द्यावयाची मात्रा लक्षात घेऊन खतांचा वापर करावा.
खते देण्याची वेळ महत्त्वाची
1) उसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते, तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यासाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते.
2) ऊस लागण करताना एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाश देणे फायद्याचे ठरते. फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची गरज जास्त असते, म्हणून सहा ते आठ आठवड्यांनी 40 टक्के नत्राची मात्रा द्यावी. जोमदार वाढीच्या अवस्थेच्या वेळी सर्वच अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी 40 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाशची खतमात्रा द्यावी. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही.
3) गंधकाचा वापर - गंधक हे जरी दुय्यम मूलद्रव्य असले तरी उसासाठी त्याचा वापर महत्त्वाचा आहे. लागणीच्या वेळी एकरी 24 किलो मूलद्रव्यी गंधक शेणखतात मिसळून द्यावे. चुनखडीयुक्त विम्ल जमिनीत मूलद्रव्यी गंधक वापरावा, तर हलक्या प्रतीच्या आणि कमी चुनखडीच्या जमिनीत फॉस्फोजिप्सम किंवा कारखान्यातील प्रेसमड केकचा वापर करावा.
4) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - उसासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे आहे. माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास लागणीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रांबरोबर प्रतिएकरी फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट आठ किलो, मॅंगेनीज सल्फेट 10 किलो व बोरॅक्स दोन किलो शेणखतात मिसळून द्यावे.
5) उसासाठी सिलिकॉनचा वापर - जमिनीत सिलिकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी बहुतांशी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. सिलिकॉनची मोनोसिलिसिक आम्ल स्वरूपातील संयुगे क्रियाशील असतात आणि याच स्वरूपात पिकाकडून शोषण होते. शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकाच्या पेशीद्रव्यात सिलिका जेल स्वरूपात साठविले जाते. त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पानांतून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन अवर्षण परिस्थितीत पानांत पाणी टिकून राहते. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वाढ होते, जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते. परिणामी ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होते. यासाठी महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत उसाच्या लागण आणि सलग दोन खोडव्यांचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी एकरी 160 किलो सिलिकॉन बगॅसची राख किंवा कॅल्शिअम सिलिकेट शेणखतात मिसळून ऊस लागणीच्या वेळेस एकदाच देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मल्टिमॅक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी -
1) सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकाची गरज जरी कमी असली तरी या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे आवश्यक असते. यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानावर दोन फवारण्या कराव्यात म्हणजे ऊस उत्पादनात आठ ते 10 टक्के वाढ होते.
2) पहिली फवारणी - लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर 60 दिवसांनी प्रति एकरी दोन लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक दोन लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति 200 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.
3) दुसरी फवारणी - लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर 90 दिवसांनी प्रति एकरी तीन लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक तीन लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति 300 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.
खते देताना घ्यावयाची काळजी
सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30 टक्के, स्फुरद 15 ते 20 टक्के व पालाश 50 ते 60 टक्के पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
1) खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावीत.
2) युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर 6 - 1 या प्रमाणात मिसळून द्यावीत.
3) हलक्या प्रतीच्या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा.
4) जमिनीमध्ये वाफसा असताना खते द्यावीत. जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत.
5) ऊस लागणीअगोदर बेणेप्रक्रिया - एक लिटर ऍसिटोबॅक्टर डायझोट्रॉफिक्स हे जिवाणू खत प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे 10 मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर 60 दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत 50 टक्के बचत होते.
6) स्फुरदयुक्त खते शेणखतात मिसळून मुळांच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. जमिनीत स्फुरदाची अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही. सेंद्रिय खतातील सेंद्रिय आम्लामुळे स्फुरदाची अविद्राव्य संयुगे विरघळतात. एकरी एक लिटर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खत प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून वाफसा स्थितीत जमिनीत आळवणी केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. शिफारशीत स्फुरद खतमात्रेत 25 टक्के बचत करता येते.
7) हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास उसासाठीचा स्फुरद खताच्या पहिल्या हप्त्यापैकी 50 टक्के हिरवळीच्या पिकास द्यावा. उरलेला 50 टक्के ऊस लागणीच्या वेळी सरीमध्ये द्यावा.
8) पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा एकरी 50 किलो वाढवून द्यावी.
9) शिफारशीप्रमाणे एकरी 24 किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते.
10) पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खतेदेखील सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
11) नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मात्रा युरिया, डायअमोनिअम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या ब्रिकेटच्या माध्यमातून वाफसा स्थिती असताना पहारीने भोके घेऊन मुळांच्या सान्निध्यात दिल्यास रासायनिक खताची कार्यक्षमता चांगलीच वाढते.
12) ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीत युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ठिबक सिंचनाद्वारे सात ते आठ महिन्यांपर्यंत 12 ते 13 हप्त्यांत पिकाच्या गरजेप्रमाणे विभागून दिल्यास 30 टक्के खतमात्रेत बचत होऊन 10 ते 15 टक्के उत्पादनातही वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे दिलेली खते मुळांच्या सान्निध्यात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे देता येतात आणि निचऱ्याद्वारे होणारे अन्नद्रव्यांचे नुकसान टाळता येते.
संपर्क - डी. बी. फोंडे - 9850552552
(लेखक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन